कार्निव्हल जल्लोषासाठी गोवा सज्ज

0
211
पणजी येथे कार्निव्हल १५ ची आकर्षक सजावट. (छाया : किशोर स. नाईक)

राज्यात पारंपरिक कार्निव्हलची धूम प्रमुख शहरांबरोबर खेड्यापाड्यातही जल्लोषात चालू रहाणार असून सर्वत्र या उत्सवाच्या सजावटीचे काम जोरात चालू असल्याचे चित्र ठिकठिकाणी दिसून येत आहे.पणजीत दि. १४ ते १७ फेब्रुवारी दरम्यान विविधांगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा व्हॅलेंटाईनच्या मुहुर्तावर कार्निव्हलचा प्रारंभ व महाशिवरात्रीला समाप्तीचा योग आहे. पणजीसह मडगाव, वास्को, म्हापसा, फोंडा येथे ठिकठिकाणी कार्निव्हलचे आकर्षक कटआऊटस् व सजावट उभी राहिली आहे. विद्युत रोषणाईचाही यात सहभाग आहे. सजावटीच्या कामात अनेक कलाकार गुंतले असून त्यावर ते अंतिम हात फिरवित आहेत. पणजी येथील महापालिका उद्यानातही खास आकर्षक व लक्षवेधी सजावट करण्यात आली आहे. पताका, लक्षवेधी विविध प्रकारचे मुखवटे लोकांचे लक्ष वेधून घेतात. सांस्कृतिक व स्पर्धात्मक कार्यक्रमांचीही रेलचेल सर्वत्र होईल. चित्ररथांवर अखेरचा हात कलाकार मंडळी फिरवित आहे.
गोवा पर्यटन विकास महामंडळ, गोवा पर्यटन खाते यांनी यंदाच्या कार्निव्हल उत्सवाची जबाबदारी स्वीकारली आहे. आकर्षक बक्षिसांचीही खैरात होणार असून पहिल्या तीन क्रमांकांसाठी बरीच रस्सीखेच स्पर्धकामध्ये राहिले. प्रमुख शहरातील चित्ररथ स्पर्धेचा आणि मिरवणुकीचा आनंद लुटण्यासाठी खेड्यापाड्यातील लोकही ठिकठिकाणी गर्दी करणार असल्याने प्रत्येक ठिकाणी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त असेल. लोकांना चित्ररथ मिरवणूक अडथळ्याविना पाहता यावी यासाठी रस्त्याच्या कडेला कठडे उभे केले आहेत. अतिमहनीय व्यक्तींसाठी खास आसन व्यवस्था करण्यात आली आहे. एकंदरीत कार्निव्हलच्या किंग मोमोच्या स्वागतासाठी गोवा सज्ज असून दि. १४ पासून कार्निव्हलची धूम, जल्लोष राज्यात सर्वत्र दिसून येणार आहे.