पणजीसाठी ७१.२० टक्के मतदान

0
87
पणजीतील मतदानाची ठळक झलक : केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर हेही अन्य मतदारांसमवेत मतदानासाठी रांगेत उभे होते. समोर नगरसेविका वैदेही नाईकही दिसत आहेत. त्यानंतरच्या दोन छायाचित्रांमध्ये प्रमुख उमेदवार अनुक्रमे सुरेंद्र फुर्तादो व सिध्दार्थ कुंकळ्येकर मतदानासाठी प्रतीक्षेत असताना. (छाया : नंदेश कांबळी)

अनुचित घटनेची नोंद नाही : भाजप-कॉंग्रेसचा विजयाचा दावा
पणजी मतदारसंघासाठी काल झालेल्या पोटनिवडणुकीत ७१.२० टक्के एवढे मतदान झाले. मतदारसंघातील २२०५७ मतदारांपैकी एकूण १५७०४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पुरुषांच्या मतदानाची टक्केवारी महिलांपेक्षा किंचित जास्त असून ती ७१.५२ टक्के एवढी आहे. तर महिलांच्या मतदानाची टक्केवारी ७०.९० टक्के एवढी आहे.एकूण मतदान अत्यंत शांततापूर्णरित्या पार पडले व कुठेही कोणत्याच प्रकारचा अनुचित प्रकार घडल्याचे वृत्त नसल्याचे संयुक्त मुख्य निवडणूक अधिकारी नारायण नावती यांनी काल सांगितले.
सर्वांत जास्त मतदान केंद्र क्र. २१ वर ८३ टक्के एवढे झाले. त्या पाठोपाठ मतदान केंद्र क्र. ११ वर ८०.२१ टक्के एवढे मतदान झाले. तर सर्वांत कमी ६१.५४% मतदान केंद्र क्र. २८ वर झाले आहे.
मतदान केंद्र क्रमांक १६ वरही चांगले मतदान झाले. तेथे झालेल्या मतदानाची टक्केवारी ७७.८८ एवढी आहे.
भाजप-कॉंग्रेसचा विजयाचा दावा
दरम्यान, जास्त मतदानाचा लाभ आपणालाच मिळणार असून आपलाच विजय होणार असल्याचा दावा भाजप व कॉंग्रेस पक्षाने केला आहे. भाजपचे उमेदवार सिध्दार्थ कुंकळ्येकर तसेच कॉंग्रेसचे उमेदवार सुरेंद्र फुर्तादो या दोघानीही काल मतदानानंतर आपलाच विजय होणार असल्याचा दावा केला.
कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संपूर्ण पणजी मतदारसंघात कडक पोलीस पहारा ठेवण्यात आला होता. निम लष्करी दल व इंडिएन रिझर्व्ह बटालिएनच्या जवानानी निवडणुकीच्या दरम्यान चोख कामगिरी बजावली.
पणजी मतदारसंघातील पोटनिवडणुकीमुळे काल शहरातील सर्व सरकारी कार्यालये व बँक बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे काल शहरात गर्दी बरीच कमी होती.
मतदान यंत्रे जुन्या गोमेकॉ इमारतीत ठेवण्यात आलेली असून मतमोजणी येत्या १६ रोजी होणार आहे. सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे. मतदान यंत्रे जुन्या गोमेकॉ इमारतीत ठेवण्यात आली असल्याने या इमारतीबाहेर सशस्त्र पोलीस पहारा ठेवण्यात आला आहे.