अननुभवी गोलंदाजी हीच भारताची कमकुवत बाजू

0
107

– अनिरुद्ध राऊळ
क्रिकेटचा ‘महाकुंभ’ मानल्या जाणार्‍या एकदिवशीय विश्व चषक स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन गुरुवार १२ रोजी दिमाखार सोहळ्यात झाले असून १४ फेब्रुवारी ते २९ मार्च दरम्यान रंगणार्‍या या महाकुंभात भारतीय संघ आपले जेतेपद राखण्यासाठी सज्ज झाला असला तरी कमकुवत आणि अनुनभवी गोलंदाजी ही भारतीय संघाच्या वाटचालीत चिंतेची बाब ठरणार आहे हे मात्र निश्‍चित.
कँलेंडर वर्षांत अतिक्रिकेटमुळे भारतीय खेळाडूंना रग्गड पैसा मिळत असला, तरी त्यांना शारीरिक थकव्याला सामोरे जावे लागते. हेच खरे खेळाडूंच्या दुखापतींचे उगम स्थान आहे. विश्व चषक स्पर्धेसारख्या महाकुंभाला सामारे जाण्यापूर्वी खेळाडूंना प्रयाप्त विश्रांती देऊन ताजे तवाना करणे तेवढेच महत्त्वाचे असते.ज्या प्रमाणे एखादी मोठी स्पर्धा जिंकण्यासाठी दमदार फलंदाजांची आवश्यकता असते, त्याच प्रमाणे भेदक गोलंदाजांचीही. विश्व चषक जेतेपद राखण्याच्या इराद्याने गेला दीडेक महिना भारतीय संघ ऑस्ट्रेलियन भूमीत आहे. यादरम्यान भारतीय संघाने कसोटी व तिरंगी वन-डे मालिका आणि दोन विश्व चषक सामने खेळला. परंतु अफाघाणिस्ताविरुद्धचा सराव सामना सोडल्यास उर्वरीत एकाही लढतीत भारतीय संघाला विजयाची चव चाखता आलेली नाही आणि या अपयशात भारताची अनुभवहीन आणि कमकुवत गोलंदाजीचा महत्त्वाचा वाटा होता. आणि आता तेच गोलंदाज विश्व चषक जेतेपद पुन्हा भारताकडे राखण्यासाठी लढणार आहेत. परंतु ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलँडमधील उसळत्या खेळपट्ट्यांवर आग ओतणारे गोलंदाज सध्या तरी भारताकडे नाही आहेत. भारतीय गोलंदाजीची धार बोथट बनेलेली असून त्याला कारण अतिक्रिकेटचा मारा आणि अनुभवाची कमतरता आहे.
सध्या भारतीय संघात रवींद्र जडेजा हा एकमेव गोलंदाज असा आहे की जो शंभर सामने (१११) खेळलेला गोलंदाज आहे. त्यानंतर रविचंद्रन अश्विन ८८, भुवनेश्वर कुमार ४४, मोहम्मद शामी ४०, उमेश यादव ४०, अक्षर पटेल १३, मोहित शर्मा १२ आणि स्टुअर्ट बिन्नी ९ यांचा क्रम लागतो. या सर्वांची आकडेवारी बघितल्यास भारतीय गोलंदाजी केवढी अननुभवी आहे त्याचा प्रत्यय येतो.
विश्व चषक स्पर्धेच्या अभियानाची सुरुवात करण्यापूर्वीच भारतीय गोलंदाजीच्या बुरुजाला जोरदार हादरा बसला तो तेज गोलंदाज ईशांत शर्मा याच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडण्याने. गुडघ्याच्या दुखापतीमुळे ईशांत शर्माला स्पर्धेला मुकावे लागले आहे. ईशांत हा एकमेव गोलंदाज असा होता ज्याच्याकडे वेग गती होती आणि दबावाच्या क्षणी अंतिम हाणामारीच्या षट्‌कांत गोलंदाजी करण्याची क्षमता होती. परंतु त्याच्या बाहेर पडण्याने भारतीय अभियानाला मोठा हादरा बसला आहे हे मात्र निश्‍चित. त्याच्या जागी मोहित शर्माची निवड करण्यात आली असली तरी विश्व चषकासारख्या महाकुंभात गोेलंदाजी करण्यासाठी अनुभवाची शिदोरी प्रत्येक गोलंदाजाकडे असणे अत्यावश्यक असते. त्यातच भुवनेश्वर कुमार आणि रवींद्र जडेजा दुखापतीतून सावरून विश्व चषकासाठी सज्ज झालेले असले तरी ते शंभर टक्के तंदुरुस्त असतील हे सांगणे कठीण. रवींद्र जडेजाची अष्टपैलू म्हणून कामगिरी गेल्या काही सामन्यात उजवी ठरावी अशी झालेली नाही आहे. भूवनेश्वरची वेगमर्यादा सुरुवातीला १२५च्या आसपास असते आणि त्यानंतर धिमी होत जाते. मोहम्मद शामी बळी मिळविण्याय यशस्वी ठरत असला तरी त्यासाठी तो मोठ्या धावाही मोजत आहे. अष्टपैलू म्हणून आश्‍चर्यकारक निवड झालेला अक्षर पटेल एकदमच नवखा आहे. तो गोलंदाजीत काही प्रमाणात प्रतिस्पर्धी फलंदाजांना रोखण्यात यशस्व ठरत असला, तरी फलंदाजीत मात्र पार निराशा केलेली आहे. उमेश यादव आणि स्टुअर्ट बिन्नी यांची कामगिरी मात्र सरस ठरण्याची शक्यता आहे. उमेशकडे वेग आहे आणि स्टुअर्टकडे चेंडूस्विम करण्याची क्षमता आहे. परंतु शेवटी प्रश्न येतो तो अनुभवाचा.
अनुभवहीन आक्रमणाचा भारताच्या जेतेपद राखण्याच्या अपेक्षांवर पाणी फेरू शकते. २०११च्या विश्व चषकात झहीर खान, ईशांत शर्मा, मुनाफ पटेल, हरभजन सिंग अशी अनुभवी गोलंदाजांची फळी होती. युवराज सिंह, सचिन तेंेडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग हे पार्टटाइम गोलंदाज होते. या विश्व चषकात झहीर खान आणि युवराज सिंह यांची उणीव निश्‍चित जाणवेल. गेल्या विश्व चषकासारखा भारतीय संघ यावेळी मात्र संतुलित नाही हे स्पष्ट जाणवतेय. त्यावेळी झहीर खानला श्रीसंत आणि मुनाफ पटेलकडून पूर्ण सहकार्य मिळाले होते. झहीर असा एक गोलंदाज आहे, ज्याने १००च्या आसपास कसोटी सामने खेळलेले आहेत आणि अंतिम हाणामारीच्या षट्‌कांत त्याच्याकडे दबावाखाली अचूक टप्प्यावर गोलंदाजी करण्याची क्षमता आहे. हरभजनही संघात होता, ज्याकडेही अनुभवाची मोठी शिदोरी होती. युवीकडे पार्टटाइम गोलंदाजीबरोबर फलंदाजीतही आपला धडाका दाखविताना प्रतिस्पर्धी गोलंदाजांची धुलाई करण्याची क्षमता होती. आणि नेमकी तीच उणीव विद्यमान भारतीय विश्व चषक संघात जाणवत आहे.