पणजीत दोघे चोरटे जेरबंद एटीएम फोडण्याचा प्रयत्न उधळला

0
81

येथील शहरातील बँक ऑफ महाराष्ट्राच्या एटीएम केंद्रातील चोरीची घटना ताजी असताना कदंब बसस्थानकाजवळील एका इमारतीतील एक्सिस बँकेच्या एटीएम फोडण्याचा प्रयत्न उधळून लावत पोलिसांनी दोघा संशयितांना अटक केली. मंगळवारी मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली. संशयितांची नावे गौरीशंकर गजारे (१९) व सुखदेव जमादार (१९) अशी असून दोघेही गुलबर्गा (कर्नाटक) येथील आहेत. त्यांच्याकडून हातोडी व इतर हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कदंब बसस्थानकाजवळील एका इमारतीमधील एक्सिस बँकेच्या एटीएममध्ये चोरटे घुसल्याची माहिती एक्सिस बँकेच्या मुंबई येथील मुख्यालयातून सुरक्षा रक्षकांनी पणजी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस पथकाने त्वरित एटीएम केंद्रात जाऊन पाहणी केली असता दोघे चोरटे केंद्रात चोरीचा प्रयत्न करीत असल्याचे आढळून आले. येथील शहरातील बँक ऑफ महाराष्ट्राचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेमुळे फसला होता. आता पुन्हा एकदा एटीएममध्ये चोरीचा प्रयत्न झाल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. एक्सिस बॅँक एटीएममध्ये चोरी करण्यात गुंतलेल्या संशयितांची महाराष्ट्र बॅँक एटीएम चोरी प्रकरणात चौकशी केली जाणार आहे. या एटीएम चोरी प्रकरणात एका संशयिताचे रेखाचित्र पोलिसांनी यापूर्वी जाहीर केलेले आहे. या चोरट्यांचा अनेक चोरी प्रकरणात सहभाग असण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी व्यक्त केली आहे. या दोघा संशयितांचे आणखीन साथीदार असण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी व्यक्त केली.