अबकारी महसुलात १६.७१ टक्के वृद्धी

0
77

अबकारी खात्याच्या महसुलात चालू आर्थिक वर्षातील पहिल्या सहा महिन्यांत साधारण १६.७१ टक्के एवढी वाढ झाली आहे. अबकारी खात्याला ऑक्टोबर २०१७ अखेर १९०.२० कोटी रुपयांचा महसूल जमा करण्यात यश प्राप्त झाले आहे. गतवर्षी ऑक्टोबर २०१६ अखेर १५८.४१ कोटी रुपयांचा महसूल गोळा करण्यात आला होता. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत ३१.७९ कोटी रुपयांचा जास्त महसूल मिळविण्यात यश प्राप्त झाले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

महामार्गापासून ५०० मीटर अंतरावरील दारूची दुकाने बंद करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे अबकारी खात्याच्या महसुलावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. प्रत्यक्षात खात्याच्या महसुलावर जास्त परिणाम झालेला दिसून येत नाही. न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार रस्त्याच्या बाजूच्या दारूच्या दुकानांच्या परवान्यांचे नूतनीकरण करण्यात आले आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे नूतनीकरण न झालेल्या दारूच्या दुकानांना अन्य ठिकाणी स्थलांतर करण्यासाठी सरकारने तीन वर्षांची मुदत दिलेली आहे.

अबकारी खात्याच्या महसुलात दरवर्षी साधारण दहा ते पंधरा टक्के वाढ होते. गत वर्षी २०१६ – १७ या आर्थिक वर्षात खात्याच्या महसुलात पूर्व वर्षाच्या तुलनेत थोडीशी घट आढळून आली होती. या वर्षी अंदाजे २८० कोटींचा महसूल जमा करण्यात यश प्राप्त झाले आहे. २०१५-१६ या आर्थिक वर्षात अंदाजे ३१८ कोटी रुपयांचा महसूल गोळा केला होता.