निनादल्या मनभावन श्रावणसरी

0
267

मठग्राममधील गोवा मराठी अकादमी आयोजित दुपारी ३ ते रात्री ९.३० पर्यंत ‘मनभावन श्रावण’ हा कार्यक्रम कवी पुष्पाग्रज यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रित कवींच्या काव्यमैफलीने, शालेय विद्यार्थ्यांनी वर्षाऋतुवर आधारित रंगवलेल्या चित्रांच्या प्रदर्शनाने, गोवा मराठी अकादमी अध्यक्ष प्रा. अनिल सामंत यांच्या हस्ते मराठी विषयांत प्रावीण्य संपादन केलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणगौरवाने, वर्षाऋतुवर बेतलेल्या नृत्यरंगाने आणि गीतश्रावण या संगीत मैफलीने साजरा झाला. एकूण कार्यक्रमातील उत्कर्षबिंदू ठरलेल्या स्वरयात्रेची ही एक शब्दमैफल…

जागून ज्याची वाट पाहिली ते सुख आलें दारी
जिथे तिथे राधेला भेटे आता श्याम मुरारी
माझ्याही ओठांवर आलें नाव तुझेच उदारा
श्रावणात घननिळा बरसला रिमझिम रेशीमधारा…
१४ आणि १५ ऑगस्टला लागोपाठ येणार्‍या जन्माष्टमी आणि सत्तराव्या स्वातंत्र्यदिनाचे आसमंताला वेध लागलेले असताना १३ ऑगस्ट अर्थात जन्माष्टमीच्या पूर्वसंध्येला मठग्राम नगरीतील गोमंत विद्या निकेतनच्या गोविंद (बाबा) कारे सभागृहात गोवा मराठी अकादमी आयोजित मनभावन श्रावण या कार्यक्रमात गीतश्रावणाच्या सरींवर सरी बरसल्या आणि श्रवणोत्सुक रसिकांची तंत्री लागली. श्रावणमासी हर्ष मानसी.. ही अनुभूती रसिकांना देणार्‍या योगिता रायकर, अक्षय नाईक आणि निनाद आजगावकर यांनी वेधक आणि वेचक वर्षागीतांचा स्वरधुंद शिडकावा करीत मराठी जगताचे लाडके कवी आणि गीतकार मंगेश पाडगावकर यांच्या वरील ओळी सार्थ ठरवल्या.
मूळ गोव्याची नव्हे दस्तुरखुद्द मठग्रामनगरीची पण सध्या कुडाळला स्थायिक योगिता रायकर ही सर्वप्रथम रसिकांना सामोरी आली. ‘‘घन बरसत बरसत आले’’ हे मल्हारधून आळवणारे मंगेश पाडगावकर रचित भावगीत. ज्येष्ठ आणि श्रेष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांनी या गीताला चालीचे कोंदण बहाल केलेलं. पाडगावकर-खळे या दोन्ही प्रतिभावंतांनी एकमेकांच्या शब्द आणि स्वरलाघवाला माउलीच्या शब्दांत ‘‘अलंकारिले कवणे कवणा’’ असा गहन तरीही निखळ आनंददायी पेच रसिकांसमोर ठेवलेला. निरुत्तर करणार्‍या या प्रश्‍नाचे जोखड झुगारून रसिकांनी या सलामीच्या भावगीताला मनभावन दाद दिली. या भावगीताचा बाज शास्त्रीय संगीताचा आणि म्हणून खळेकाकांनी के वीणा सहस्रबुद्धे यांच्याकडून गाऊन घेतलेलं. गेल्या वर्षीच वीणाताई यांचं दुःखद निधन झालं. त्यांच्या आठवणींनी मी मनातल्या मनात गदगदलो. माणसाच्या निर्भेळ सुखाला दुःखाची किनार हवीच या नियतीच्या अलिखित नियमाला आपण शरण आहोत. खळेकाका, पाडगावकर आणि वीणाताई यांनी याच क्रमाने जगाच्या रंगभूमीवरून एक्झिट घेऊन नियतीच्या चेष्टितासमोर शरणागती पत्करली आहे.
‘श्रावणात घननिळा बरसला’ हे पाडगावकरांचे अवीट गोडीचे भावगीत पुन्हा खळेकाकांच्याच स्वररचनेचे अवघे मार्दव आणि कौशल्य सिद्ध करणारे. लता दीदींच्या साक्षात्कारी कंठाचा परीसस्पर्श लाभलेले हे भावगीत योगिताने आत्मविश्‍वासाने आळवताना या भावगीताच्या प्रत्येक कडव्याची वेगळी स्वररचना तिचा मूळ गोडवा हरवू न देता इमानदारीने आणि समझदारीने पेश केली आणि रसिकांचा दुवा घेतला.
अक्षय नाईक याच्या अदाकारीवर प्रख्यात गायक सुरेश वाडकर यांचे संस्कार आहेत. श्रीधर फडके यांनी स्वरबद्ध केलेलं भावगीत त्याने ज्या अंदाजाने आणि तन्मय नजाकतीनं मैफलीत ऐकवलं त्यामुळे मैफल स्वरचिंब झाली. ‘‘कधी रिमझिम झरणारा आला ऋतू आला..’’ या भावगीताने तो आम्हा रसिकांना सामोरा आला आणि सुरेश वाडकर आणि श्रीधर फडके यांच्या तोडीस तोड प्रतिभेलाच जणू अक्षयने मानवंदना दिली. कवी सौमित्र अर्थात किशोर कदम यांची उत्कट भावकविता आणि मिलिंद इंगळे यांच्या संगीत आणि गायनाने विनटलेला ‘‘गारवा’’हा अल्बम लोकप्रियतेच्या शिखरावर आरूढ झालेला. या अल्बममधील गाणी उजवी की किशोर कदम यांची.. ऐकणार्‍याचे काळीज विद्ध करणारी अमोघ, घनव्याकुळ, विरहार्त एकप्रकारे स्वतःचीच समजूत काढणारी स्वगते उजवी याचा निवाडा ज्याने त्याने आपापल्या परीने करावा. दुःखाची गाणीच अवीट गोडीची असतात ही म्हण सार्थ ठरवणारा हा अल्बम. या अल्बममधील सलामीचे ‘‘गारवा’’ हे भावगीत अक्षयने समरसून आळवले एवढे खरे.
निनाद आजगावकर ज्येष्ठ भावगीत-भक्तिगीत गायक वसंत आजगावकर यांचे सुपुत्र. ‘‘दिवस तुझे हे फुलायचे’’ या भावगीताने त्यांनी आपल्या स्वरलाघवाची प्रचिती आणून दिली. गीतकार पाडगावकर, स्वररचना यशवंत देव यांची आणि मूळ गायक अरुण दाते या त्रिकुटाची असंख्य गाणी ऐकत आणि ओठांवर खेळवीत आमची पिढी चांगल्या अर्थाने वयात आली. सुरेलपणाचे संस्कार या एकसे बढकर एक अशा प्रतिभावंतांनी आमच्या पिढीवर केले. हाच पिढीजात संस्कार निनाद यांच्या गायकीवर झाला तो त्यांच्या पिताश्रींकडून आणि तत्सम गुणी गुरुजनांकडून. सुरेलपणा आणि त्याच्या जोडीला शब्दांचा आशय पेलणारा दर्द गळ्यांत असेल तर दुधात साखर. निनाद अशा समझदारीने रसिकांना सामोरा आला.
ग्रेस हा अनवट, गूढ, स्वतःच्याच धुंदीत आपले अनुरागी आणि विरागी एकटेपण जपणारा अवलिया कवी. ‘ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता’ या त्यांच्या रचनेची भुरळ हृदयनाथ मंगेशकर यांच्यावर पडली आणि त्यांनी ही रचना स्वरबद्ध केली आणि गायली. ‘निवडुंग’ या चित्रपटात या गीताचा दृक्‌श्राव्य अनुभव अंगावर येतो. हा शहारा – चटका न विसरता येणारा. तर निनाद यांच्या स्वरांत तो मैफलीत निनादला आणि मन सैरभैर झालं. ‘‘ती आई होती म्हणुनी घनव्याकूळ मीही रडलो’’ हे शब्द ऐकताना मला नेहमीच आठवतात प्रसिद्ध जाझ गायक लुई आर्मस्ट्रॉंग यांनी गायलेली अशीच एक ओळ… ‘‘समटाईम्स आय् फील् लाईफ् अ मदरलेस चाइल्ड’’, असो. ‘‘आली कुठूनशी कानी टाळ, मृदंगाची धून नाद विठ्ठल विठ्ठल, उठे रोमारोमांतून|’’ ही भक्तिरचना कवी सोपानदेव चौधरींची आणि मूळ संगीतकार आणि गायक वसंत आजगावकर. यंदा १२ ऑगस्टला त्यांनी वयाच्या ८४ व्या वर्षांत पदार्पण केलं असं निनादनीचं मैफलीत सुतोवाच केलं. पिताश्रींची ही मर्मबंधातली ठेव त्यांनी मैफलीत ऐकवून आम्हा रसिकांना भक्तिरसांत सचैल भिजवलं.
योगिता रायकर दुसर्‍यांदा रसिकांना सामोरी आली. आरती प्रभू, हृदयनाथ मंगेशकर आणि आशा भोसले यांनी अजरामर केलेल्या ‘‘ये रे घना ये रे घना न्हाऊ घाल माझ्या मना’’ या गाण्याने. यानंतर गुड्डी या चित्रपटातील ‘‘बोले रे पपीहरा’’ हे गाणे तिने ठसक्यात ऐकवले. संगीतकार वसंत देसाई, गीतकार गुलझार आणि मूळ गायिका वाणी जयराम यांची सय या सादरीकरणाने जागवली नसती तरच नवल. ‘‘असा बेभान हा वारा’’ या वर्षागीताने योगिताने रसिकांचा निरोप घेतला. पाडगांवकर, हृदयनाथ आणि लतादिदी यांना योगिताने या गीताद्वारे मानवंदना दिली.
अक्षय नाईक संगीत सौभद्र नाटकांतील ‘‘नभ मेघांनी आक्रमिले..’’ हे नाट्यगीत छान गायला. ‘‘रिमझिम गिरे सावन’’ हे चित्रपटगीत किशोरकुमार यांनी गायलेले. चित्रपट मंझील, गीतकार योगेश आणि संगीतकार आर. डी. बर्मन अर्थात पंचमदा. अक्षयने किशोरदांच्या अंदाजाने ते ऐकवून आपल्या वैविध्यपूर्ण अदाकारीचा परिचय घडवला. ‘‘कानडा राजा पंढरीचा’’ या भक्तिरचनेने त्याने रसिकांचा सुरेल निरोप घेतला. ग.दी.मां.चे शब्द, बाबुजी अर्थात सुधीर फडके यांची स्वररचना, बाबुजी आणि डॉ. वसंतराव देशपांडे यांचे गायन आणि चित्रपट ‘‘झाला महार पंढरीनाथ’’ ही प्रतिभावंतांची मांदियाळी इति हे भक्तिगीत.
या धुवाधार मैफलीची सांगता अर्थातच निनाद यांच्या वैविध्यपूर्ण गाण्यांनी झाली. ‘‘आला आषाढ श्रावण आल्या पावसाच्या सरी| किती चातक चोचीने प्यावा वर्षा ऋतू तरी’’ ही रचना बा.सी. मर्ढेकर यांची. वसंत आजगावकर यांची चाल आणि स्वर. ‘‘अजून त्या झुडपांच्या मागे सदाफुली दोघांना हसते’’ हे भावगीत वसंत बापट यांचे आणि गायक व संगीतकार दशरथ पुजारी. ‘‘निजरूप दाखवा हो, हरीदर्शनास द्या हो’’ हे गदिमा रचित भक्तिगीत-गायक व संगीतकार बाबुजी. ‘‘जिंदगीभर नही भुलेगी वो बरसात की रात’’ हे रोशन यांनी स्वरबद्ध केलेलं, साहीर यांनी लिहिलेलं आणि महंमद रफी यांनी गायलेलं ‘बरसात की रात’ चित्रपटातील अविस्मरणीय गाणे आणि मैफलीच्या शेवटी ‘गीतरामायणा’तील ‘‘त्रिवार जयजयकार’’ या भैरवीने निनाद यांनी गीतश्रावण या कार्यक्रमाची सांगता केली.
धनराज मडकईकर (संवादिनी), यतीन तळावलीकर (तबला), बाळकृष्ण मेस्त (की-बोर्ड), शैलेश साळगावकर (साइड रीदम्) यांच्या साथसंगतीने ही मैफल रसोत्कट झाली. आपापल्या परीने सर्वांनी ही मैफल रंगतदार केली. गायक आणि साथसंगत करणारे सगळे कलाकार यांची जुळवाजुळव, मोट बांधण्याची जबाबदारी निभावताना या मैफलीचे सूत्रसंचालन मी केले.