निझामुद्दीन एक्स्प्रेसमधून पाठविलेले ६०० किलो गोमांस वास्कोत जप्त

0
102
रेल्वेतून पाठविलेल्या गोमांसाची तपासणी करताना रेल्वे प्रशासनाचे अधिकारी. (छाया : गणादीप शेल्डेकर)

गोमांस तस्करीचा पर्दाफाश
निझामुद्दीन-वास्को, गोवा एक्स्प्रेसमधून आलेले सुमारे ६०० किलो गोमांस काल वास्को पोलिसांनी जप्त केले. मांगोरहिल येथील शिवसेना कार्यकर्त्यांच्या जागरूकतेमुळे तस्करीचा हा मोठा डाव हाणून पाडण्यात पोलिसांना यश आले. नवी दिल्लीहून आलेली गोवा एक्स्प्रेस काल सकाळी पावणे आठच्या सुमारास वास्कोत दाखल झाली असता त्या ट्रेनमधून गोमांसाची तस्करी होत असल्याची खबर राज्य प्रमुख रमेश नाईक यांनी दक्षिणेतील सर्व शिवसैनिकांना दिली होती. हे मांस मडगाव रेल्वे स्थानकावर उतरविण्यात येणार असल्याची माहिती शिवसैनिकांना देण्यात आली होती. सदर रेल्वे सकाळी झाडे पाच वाजता मडगाव रेल्वे स्थानकावर पोचते तेव्हा सकाळी सकाळीच दक्षिणेतील बरेच शिवसैनिक मडगाव रेल्वे स्थानकावर दाखल झाले होते. याची चाहूल तस्करी करणार्‍यांना लागल्याने त्यांनी गोमांस मडगावात न उतरविता वास्कोत उतरविण्याचा बेत आखला. त्यानुसार पार्सल बोगीतून गोमांस भरलेले १५ मोठे बॉक्स उतरविण्यात आले. या बोगीमध्ये खव्याचेही बॉक्स होते.वास्कोत रेल्वे पोहचताच शिवसेनेच्या वास्कोतील पुढार्‍यांनी पोलिसांना गोमांस आल्याची माहिती देताच ते जप्त करण्यात आले. पुण्याहून पाठविलेले मोठमोठे बॉक्स मडगाव येथील कमाल या व्यक्तीच्या नावाने पाठविले होते. मिळालेल्या माहितीनुसार प्रत्येक बॉक्समध्ये सुमारे ४० किलो गोमांस होते. दरम्यान, गोमांसची वाहतूक करणार्‍या बोगीमध्ये मिठाईसाठी वापरण्यात येणार्‍या खव्यांचे बॉक्स पण होते. ही खबर अन्न आणि औषध विभागाला कळताच सदर विभागाचे शिवदास नाईक यांच्या नेतृत्वाखाली विभागाने वास्को रेल्वे स्थानकावर त्वरित जाऊन पाहणी केली. तद्नंतर सदर सर्व गोमांसचे १५ बॉक्स मडगाव येथील रेल्वेच्या पार्सल यार्डात पाठविण्यात आले. परंतु संध्याकाळी उशिरापर्यंत या मांसावर दावा सांगणारे कोणीच आले नव्हते, असे रेल्वेच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.