विद्यार्थ्यांच्या संकल्पना प्रदर्शित करण्यासाठी स्पर्धांचे आयोजन करा

0
102

डी. डी. कोसंबी विचार महोत्सवात कुमार गुप्ता यांचा सल्ला
पुढील वर्षी आयोजित करण्यात येणार्‍या डी. डी. कोसंबी विचार महोत्सवात विद्यार्थ्यांना त्यांच्या नवीन संकल्पना प्रदर्शित करण्यासाठी स्पर्धा आयोजित करा, असे सांगून अशा स्पर्धांतून वेगवेगळ्या समस्यांवर उपाय निघू शकेल, असे अनिल कुमार गुप्ता यांनी सांगितले.
‘अर्थपूर्ण भविष्यकाळासाठी मनाची मशागत’ या विषयावर ते व्याख्यान देत होते. ज्ञान नाही असा एकही माणूस या जगात नाही. प्रत्येकाला कोणत्या तरी विषयाचे ज्ञान असतेच. ज्या कामाला बाजारात विशेष किंमत मिळत नाही. ते काम करणार्‍यांना आपण अकुशल म्हणतो. परंतु प्रत्यक्षात ते कुशलच असतात, असे ते म्हणाले. समस्येतून गरजेतून नवनिर्मिती होत असते. ग्रामीण भागातील लोकांनीही आपल्या गरजा भागविण्यासाठी अनेक शोध लावल्याचे ते म्हणाले. आपल्या समस्येवर अन्य कोणीही उपाय काढतील म्हणून आपण वाट बघतो. मनाची मशागत केली तर उपाय शोधणे सर्वांनाच शक्य होते. शाळांमध्ये इन्होवेशन क्लब तयार करून स्पर्धा घेण्याची गरज आयोजित केली. स्पर्धा घेतल्यास प्रत्येकजण मनाची मशागत करून नवनिर्मितीसाठी प्रयत्न करण्यास पुढे येतात, असेही त्यांनी सांगितले. इन्होवेशन क्लबमधून कल्पकतेला वाव मिळेल. आपल्या पिढीने समस्या घेऊन जगणे पसंत केले. नवीन पिढी ते करण्यास तयार नाही, त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे, असे सांगून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपले प्रश्‍न सोडविण्यासाठी शोधून काढलेल्या अनेक उपायांची गुप्ता यांनी माहिती दिली. संस्कृती तंत्रज्ञान व संस्थानी एकत्रपणे काम करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. लहान मुले आपले प्रश्‍न सोडविण्यास समर्थ असतात. त्यांना संधी दिली पाहिजे, असेही ते म्हणाले. निसर्गही शिक्षकच असतो, असेही त्यांनी सांगितले.