नाती-भिंती

0
166
  • रमेश सप्रे

प्रेम जिव्हाळ्याशिवाय असलेल्या नात्यांना काय किंमत आहे? सध्या आपली वेलङ्गर्निश्ड घरं अशी निर्जीव, भावशून्य व्यवहारांनी युक्त झाली आहेत का? भाषेतल्या खास शब्दप्रयोगात, वाक्यप्रचारात खूप अर्थ भरलेला असतो. ज्याचा संदेश कधी सकारात्मक, तर कधी नकारात्मक असतो; पण असतो मात्र कल्याणकारी!

‘नाती-भिंती’ तुम्हाला वाटेल हा कसला विचित्र शब्दप्रयोग! की काहीतरी मुद्रणदोष (छपाईतली चूक)? कारण ‘नातीगोती’ हा नेहमीचा शब्द किंवा मुलगा-बिलगा, मुलगी बिलगी अशी ‘बि’ची भाषाही कानाला परिचित आहे. यानुसार ‘नाती-बिती’ असा शब्दही चालला असता. म्हणजे हल्ली काही ट्रेंडी वाक्यं ऐकायला मिळतात ना, त्यातलंच एक – ‘ती नातीबिती काही मी मानत नाही.’ या निरर्थक (खरं तर तुसड्या) वाक्याची तुलना ‘राजाला नाती नसतात किंवा ‘न्यायदेवता नातीबिती जाणत नाही’ अशा उदात्त वाक्यांशी होऊच शकत नाही.

एका प्रसिद्ध कवितेतले हे दोन शब्द निराळ्या क्रमानं इथं जोडले आहेत एवढंच. ही कविता अनेक घरात पहायला मिळते. गुळगुळीत कागदावर अनेक रंगात छापलेली. –
‘घर असावं घरासारखं नकोत नुसत्या भिंती
तिथं असावा प्रेमजिव्हाळा नकोत नुसती नाती’
काही गाणी – कविता इतक्या गाजतात की त्यांचे मुखडेच (आरंभीच्या १-२ ओळी) लोकांच्या लक्षात राहतात. उरलेलं गाणं किंवा कविता अनेकांना माहितही नसते. या अप्रतिम कवितेचं भाग्य काहीसं असंच आहे. नंतरची कविताही या आरंभीच्या ओळीतील भावाशी समरस झाली आहे; पण ते असो.
गंमत (की दुर्दैव) म्हणजे अनेक भिंतीवर विराजमान झालेली ही कविता अनेकांच्या घरात जमिनीवर उतरलेली दिसत नाही. या कवितेला समांतर अशी एक हृदयस्पर्शी कथा आहे. एक मध्यमवर्गीय सधन कुटुंब. घरातील गृहिणी नव्हे गृहनिर्माती (होम मेकर) हिला स्वच्छतेची, टापटीपपणाची एका खूप आवड. घर स्वच्छ करताना नि ते स्वच्छ राखताना तिचा जो जीवाचा आटापिटा व्हायचा, त्याचा परिणाम घरातल्या शांततेवर, घरातील मंडळींच्या मनःशांतीवर व्हायचा. बाकीची कामं दुय्यम समजली जात. उदा.- सकाळी एकदाच स्वयंपाक करायचा. डबे भरून दिले जायचे. रात्री तेच शिळे पदार्थ गरम करून घ्यायचे. घरातील आजीचं म्हणणं कधी गंभीरपणे घेतलं गेलं नाही की प्रत्येक वेळी ताजं, गरम जेवण वाढलं जावं. सकाळी नाईलाज असतो; कारण डबे काही तासांनी खाल्ले जातात. पण रात्री? त्यासाठी त्या गृहनिर्मातीला वेळच नसायचा अन् शक्तीसुद्धा.

एकदा दिवाळीचे उरलेले पदार्थ घेऊन ती गृहिणी रस्त्यापलीकडच्या झोपडीतील गरीब मंडळींना द्यायला गेली. घरातली स्त्री पांगळी, नवरा एक पाय नसलेला ङ्गुगेवाला, घरातील इतर मंडळी या सार्‍यांना गरम जेवण आग्रहानं खाऊ घालण्याची त्या स्त्रीची आर्तता पाहून ही गृहिणी मनातल्या मनात ओशाळली. तिथंच निर्धार करून ती परतली नि घराच्या भिंतीची स्वच्छता – सजावट करण्यापेक्षा विविध नात्यांनी जोडलेल्या मंडळींच्या सुख-स्वास्थ्याला अधिक महत्त्व देऊ लागली. खरंच आहे, प्रेम जिव्हाळ्याशिवाय असलेल्या नात्यांना काय किंमत आहे? सध्या आपली वेलङ्गर्निश्ड घरं अशी निर्जीव, भावशून्य व्यवहारांनी युक्त झाली आहेत का? भाषेतल्या खास शब्दप्रयोगात, वाक्यप्रचारात खूप अर्थ भरलेला असतो. ज्याचा संदेश कधी सकारात्मक, तर कधी नकारात्मक असतो; पण असतो मात्र कल्याणकारी!
उदा. ‘गणगोत’ या शब्दात एकाच कुटुंबातील विविध नात्यांनी जोडलेल्या व्यक्तींचा समावेश होतो. यातल्या ‘गण’ शब्दाचा अर्थ आहे समूह; पण ‘गोत’ म्हणजे गोत्र. प्रत्येकाच्या कुटुंबाचा मूळ पुरुष असतो. जसे अत्री भारद्वाज, वत्स, कौंडिण्य इ. ‘नातीगोती’, म्हणताना हाच अर्थ अभिप्रेत असतो; पण या सामासिक (जोड) शब्दाचा एक अर्थ ‘गोत्यात’ म्हणजे अडचणीत आणणारी नाती, असाही व्यवहारातील अनुभवावरून केला जातो.

दुसरी एक म्हण ङ्गार अर्थपूर्ण आहे. ‘कुर्‍हाडीचा दांडा, गोतास काळ’, कुर्‍हाडीच्या नुसत्या पात्यानं कोणती कामं नीट करता येतील? पण त्याला लाकडाचा दांडा लावला, तर तो आपल्याच गोतातील (म्हणजे वंशातील) इतर वृक्षवनस्पतींचा संहार करायला मदत करतो नाही का?
आज शहरी, तथाकथित सुधारलेल्या कुटुंबातील संबंध नि व्यवहार असेच झाले आहेत का? ‘ऋणानुबंधाच्या इथून पडल्या गाठी’ अस म्हणताना बंध-संबंध महत्त्वाचे असतात. ‘बंधू’ शब्दात हेच बंध सुचवले आहेत; पण आता बंधापेक्षा ‘भाऊबंदकी’ नाही का महत्त्वाची होऊन बसलीय? प्रकरणं थेट कोर्टात जातात. पैसे, शक्ती, वेळ सारं खर्च होतं; पण घराचं घरकुल करायचा प्रयोग करायचा असेल, तर प्रेमाचा – त्यागाचा – सेवेचा उपयोग अधिकाधिक करावा लागेल. ‘घरात रामायण हवं का महाभारत’ या प्रश्‍नाचं सोपं सरळ उत्तर ‘रामायण’ हेच असेल; कारण तिथं शत्रू आहेत रावणासारखे परके; पण महाभारत युद्धात समोरासमोर कोण होतं याचं वर्णन विनोबांच्या गीताईमध्ये ङ्गार मार्मिक आहे –

  • आजे काके तसे मामे सासरे सोयरे सखे॥
  • गुरुबंधू मुले नातू दोन्ही सैन्यात सारखे॥
    कोणतं नातं एकमेकांशी युद्ध करताना उरलंय? कसं उभारणार घरकुल नि राष्ट्रकुल?
    गीतेतच पंधराव्या अध्यायाच्या आरंभी भगवंतांनी अर्जुनासमोर (म्हणजे आपल्यासमोर) एक शब्दचित्र उभं केलंय – ‘ऊर्ध्वमूलं अधःशाखम् अश्‍वत्थं प्राहुरव्ययम्‌|’
    संसाराचा जो अश्‍वत्थवृक्ष आहे त्याचं मूळ वरती आहे आणि ङ्गांद्या – पानं – ङ्गुलं – ङ्गळं हा विस्तार खाली आहे. उदा. वंशवेल (ङ्गॅमिली ट्री) काढताना पणजोबा-पणजी सर्वात वर असतात, तर आजोबा- आजी, पिता-माता, मुलं, नातवंड अशी ही वंशवेल खाली विस्तारत जाते. यासाठी पूर्वजांचं केवळ श्राद्ध करण्यापेक्षा त्यांच्या गुणांचं श्रद्धापूर्वक स्मरण करून त्यांच्यासारखं सदाचरण करण्याचं अभिवचन त्यांना त्यांच्या स्मृतिदिनी देऊन त्यानुसार प्रत्यक्ष जीवन जगलं तर कुटुंबातील नात्यात भिंतीकुंपण उभारण्याऐवजी मार्ग आणि सेतु बांधले जातील. मगच बनतील घरांची घरकुलं!