दीनदयाळ आरोग्य योजनेचा आतापर्यंत १२६ रुग्णांना लाभ

0
82

>> १२६ जणांवर २६ लाख खर्च 

>> ३५ रुग्णांना गोमेकॉत लाभ

>> ३१ जणांना मणिपालमध्ये

>> १ लाख ८० हजारांना आतापर्यंत कार्डे वितरित

गेल्या २४ रोजीपर्यंत राज्यातील १२६ रुग्णांनी दीनदयाळ आरोग्य विमा योजनेचा लाभ घेतला व त्यांच्या उपचारांवर ४७ लाख रु. खर्च करण्यात आले, अशी माहिती गोवा इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचे चेअरमन दत्तप्रसाद नाईक यांनी काल येथे पत्रकार परिषदेत दिली.
यापैकी सर्वांत जास्त म्हणजे ३५ रुग्णांनी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेतले. तर त्या पाठोपाठ ३१ रुग्णांनी मणिपाल इस्पितळात उपचार घेतले. त्या खालोखाल १९ रुग्णांनी मडगांव येथील अपोलो इस्पितळात उपचार घेतल्याचे नाईक यांनी सांगितले. दरम्यान, आतापर्यंत १ लाख ८० हजार कुटुंबांना या आरोग्य विमा योजनेसाठीची कार्डे वितरित करण्यात आली असून त्यामुळे ७ ते ८ लाख लोक या योजनेखाली आले असल्याचे ते म्हणाले. लाभधारकांची सर्वांधिक ५००५ एवढी संख्या काणकोण मतदारसंघात आहे. ७९०७ लोकांनी योजनेसाठीचे अर्ज नेले होते. पैकी ५००५ जणांना कार्डे वितरित करण्यात आली आहेत. आतापर्यंत सर्वांत कमी कार्डधारक सासष्टी तालुक्यात असल्याची माहितीही त्यांनी
दिली.
या योजनेसाठी दररोज साडेतीन हजार कार्डे वितरित करण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. राज्यातील विशेष लोक व अंथरूणाला खिळलेल्या लोकांना या योजनेसाठीची कार्डे देण्याच्या कामी भाजपचे आमदार पुढाकार घेणार असल्याचेही दत्तप्रसाद नाईक यांनी यावेळी सांगितले.