गोवा मराठी अकादमीचे डिसेंबरमध्ये साहित्य महासंमेलन

0
100

गोवा मराठी अकादमीच्या कार्यकारी मंडळाच्या सोमवारी झालेल्या बैठकीत अनेक महत्वपूर्ण उपक्रम करण्याचे निश्‍चित करण्यात आले आहेत. त्यात डिसेंबरच्या दुसर्‍या आठवड्यात राज्यस्तरीय मराठी साहित्य महासंमेलन, कथा, कविता, निबंध, लघुचित्रपट (शॉर्ट फिल्म) स्पर्धा, पुस्तक प्रकाशन योजना, दीर्घ मुदतीची डॉ. अजय वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन कार्यशाळा, शिक्षक व पालकांसाठी कार्यशाळा, युवा संमेलन आदींचा समावेश आहे.

गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्राचार्य अनिल सामंत यांच्या अध्यक्षतेखाली अकादमीच्या कार्यालयात ही बैठक झाली. राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन दोन दिवसांचे असणार. यात साहित्य विशेषांक विद्यार्थी, विशेषांक, ग्रंथ प्रदर्शन राहील. दरम्यान, मराठी अकादमीच्या तिसवाडी, सासष्टी, सत्तरी, फोंडा, डिचोली, मुरगाव तालुका समित्या स्थापन होऊन त्यांचे उद्घाटनही झाले आहे व पेडणे, मांद्रे, साखळी, सांगे, बार्देश समित्यांचे उद्घाटन लवकरच होणार असून सर्व तालुका समित्यांचा महामेळावा लवकरच पणजीत होणार असल्याची माहिती प्राचार्य सामंत यांनी दिली.
गोमंतक मराठी अकादमीच्या
कर्मचार्‍यांना लवकरच सामावणार
गोवा मराठी अकादमीसाठी अकादमीच्या कार्यालयाशेजारी तिसर्‍या मजल्यावर (जुनी शिक्षण खात्याची इमारत) लघुसभागृह उपलब्ध झाले असून छोटे साहित्यिक कार्यक्रम या सभागृहात सातत्याने होणार आहेत असे प्रा. सामंत यांनी सांगितले. मराठी अकादमीच्या कर्मचार्‍यांना सेवेत सामावून घेण्याची प्रक्रीया सुरू असून त्यात त्यांना लवकरात लवकर सामावून घेतले जाईल, असे प्रा. सामंत म्हणाले.