दिल्लीने रोखल्यामुळे गोव्याच्या आशांना धक्का

0
69

पण नऊ मिनिटे बाकी असताना नायजेरियाच्या कालू उचे याने नोंदविलेल्या गोलमुळे हीरो इंडियन सुपर लीगच्या चौथ्या मोसमात बाद फेरी गाठण्याच्या एफसी गोवा संघाच्या अपेक्षांना बुधवारी मोठा हादरा बसला. घरच्या मैदानावर गोव्याला तळातील दिल्ली डायनॅमोजने १-१ असे बरोबरीत रोखले. उत्तरार्धात मोरोक्कोच्या ह्युगो बौमौसने गोव्याचे खाते उघडले होते, तर नायजेरीयन कालू उचे याने दिल्लीला बरोबरी साधून दिली. यामुळे गोव्याला घरच्या मैदानावर केवळ एका गुणावर समाधान मानावे लागले.

दिल्लीला अंतिम टप्यात बदली गोलरक्षक अर्णब दास शर्मा याने तारले. त्याने भरपाई वेळेत गोव्याच्या फेरॅन कोरोमीनास याचा फटका विलक्षण चपळाईने थोपविला. नियमानुसार मैदानावर पाच परदेशी खेळाडू खेळविता येतात. दिल्लीचे प्रशिक्षक मिग्युएल पोर्तुगाल यांना भारताच्या रोवील्सन रॉड्रीग्ज याच्याऐवजी नेदरलँड्‌सच्या जेरॉन लुमू याला बदली खेळाडू पाठवायचे होते. त्यामुळे एक परदेशी खेळाडू मैदानावरून परत बोलाविणे आवश्यक होते. त्यासाठी ६५व्या मिनिटाला स्पेनच्या झेबीयर इरुतागुएना याला माघारी बोलाविण्यात आले आणि भारताच्या अर्णब दास शर्मा याला बदली गोलरक्षक म्हणून पाठविण्यात आले होते. हाच निर्णय अखेरीस महत्त्वाचा ठरला. दिल्लीला बरोबरी साधून देणारी चाल लुमू यानेच रचली.
गोव्याला १५ सामन्यांत तिसरी बरोबरी पत्करावी लागली. सहा विजय व सहा पराभव अशी त्यांची कामगिरी आहे. त्यांचे २१ गुण झाले. त्यांचे सहावे स्थान कायम राहिले.दिल्लीने एक क्रमांक प्रगती केली. १५ सामन्यांत हा त्यांचा तिसरा विजय आहे. तीन बरोबरी व नऊ पराभव अशी त्यांची कामगिरी आहे. त्यांचे १२ गुण झाले. आता नॉर्थईस्ट युनायटेड ११ गुणांसह तळात आहे.

मध्यंतराची गोलशून्य बरोबरीची कोंडी उत्तरार्धात आठव्या व एकूण ५३व्या मिनिटाला सुटली. ह्युगोने मध्य क्षेत्रातून आगेकूच केली. त्याने मारलेला चेंडू रोखण्यासाठी दिल्लीच्या गॅब्रीएल चिचेरोने पाठ केली, पण चेंडू त्याच्या पाठीला लागून नेटमध्ये गेला. चिचेरोच्या चुकीमुळे दिल्लीचा गोलरक्षक झेबीयर इरुतागुएना हा सुद्धा चकला. ८१व्या मिनिटाला दिल्लीने बरोबरी साधली. लुमूने डावीकडून लालियनझुला छांगटे याला पास दिला. छांगटेने चेंडू पुरविताच कालूने फिनीशिंग अचूक केले.