झरे नष्ट होण्याची कारणे शोधण्यासाठी शास्त्रज्ञांची समिती

0
131

राज्यात एकेकाळी १९०० झरे होते व पाण्याच्या बाबतीत गोवा ‘सुजलाम सफलाम्’ अशी स्थिती होती. आज केवळ ७०० ते ८०० झरेच अस्तित्वात असून अन्य झरे नष्ट झाले आहेत असे जलसंसाधन मंत्री विनोद पालयेकर यांनी सांगितले. हे झरे नष्ट कसे झाले त्याचा अभ्यास करण्याची सूचना आपण भूगर्भ शास्त्रज्ञांना दिली असल्याचे त्यांनी सांगितले.
नष्ट झालेले झरे जर पुन्हा पुनरुज्जीवीत करता आले तर गावा गावात पाण्याची समस्या सुटू शकणार असल्याचे पालयेकर म्हणाले. हे झरे म्हणजे एका प्रकारे गोव्याचा नैसर्गिक वारसाच होय हे समजून घ्यायला हवे, असेही ते म्हणाले.
पथकाची स्थापना झरे नष्ट होण्याची कारणए शोधून काढण्यासाठी दोघा भूगर्भ शास्त्रज्ञांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करण्यात आली असल्याचेही पालयेकर यांनी सांगितले.
‘नितळ गोंय नितळ बांय’
योजना कार्यान्वित
दरम्यान, गावागावातील पडीक विहिरींचा पुनर्वापर केला जावा यासाठी सरकारने ‘नितळ गोंय नितळ बांय’ योजना सुरू केली आहे. गावातील सार्वजनिक तसेच खाजगी पण सार्वजनिकपणे वापरल्या जाणार्‍या विहिरींची दुरुस्ती व त्या उपसून पाणी पिण्यालायक बनवण्यासाठी विहिरीमागे या योजनेखाली ५० हजार रुपये अनुदान देण्यात येत असल्याचे पालयेकर यांनी सांगितले.