अमित शहांच्या सभेप्रकरणी विमानतळ संचालकांना घेराव

0
70

>> कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी विचारला जाब

दाबोळी विमानतळ संकुलातच भाजपाध्यक्ष अमित शहा यांची जाहीर सभा घेऊ दिल्याप्रकरणी कॉंग्रेस नेते व कार्यकर्ते यांनी काल विमानतळाचे संचालक बी. सी. एच. नेगी यांना त्यांच्या केबिनमध्ये घेराव घालून जाब विचारला. याप्रकरणी संबंधितांविरुद्ध तक्रार दाखल करण्याचे आश्‍वासन मिळाल्यानंतरच नेगी यांची सुटका करण्यात आली. शहा यांच्या सभेसाठी परवानगी कोणी दिली या प्रश्‍नावर नेगी यांनी अनभिज्ञता दर्शवली.
भारतीय विमानतळ प्राधिकरणाने ही सभा आयोजित करण्यास परवानगी दिली होती का, याची चौकशी करण्यासाठी कॉंग्रेस नेत्यांनी काल सकाळी दाबोळी विमानतळ संचालक बी. सी. एच. नेगी यांना विचारणा केली असता त्यांनी याविषयी आपणास माहिती नसल्याचे सांगून आपण याची चौकशी करून दस्तावेज तपासून पाहणार असल्याचे उत्तर उपस्थित कॉंग्रेस नेत्यांना दिले. विमानतळ संचालकांच्या परवानगीशिवाय कुठलाही कार्यक्रम आखणे बेकायदेशीर आहे, असे त्यांनी यावेळी श्री. नेगी यांना सांगून त्यांना बरेच धारेवर धरले. तसेच कायद्याचा दुरुपयोग केल्याप्रकरणी सभेच्या आयोजकांविरुद्ध तक्रार दाखल होणे आवश्यक असल्याचे निदर्शनास आणून दिले.
देशातील विमानतळाच्या जागेत सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणालाही तेथे जमाव करण्यास मनाई असताना अमित शहा यांची आयोजित केलेली सभा ही कायद्याचे उल्लंघन करणारी आहे. त्यादृष्टीने कायद्याचा दुरुपयोग केल्याप्रकरणी सभेच्या आयोजकांविरुद्ध तक्रार दाखल होणे आवश्यक आहे. याकडे नेगी यांचे लक्ष वेधण्यात आले.
दाबोळी विमानतळ हा नौदलाच्या अखत्यारित असून तो संरक्षण मंत्रालयाच्या कक्षेत येतो. त्या ठिकाणी पोलिस यंत्रणाही तैनात होती. मात्र, या सभेसाठी आवश्यक असलेला परवाना घेण्यात आला आहे की नाही याची चौकशीही पोलिसांनी केली नसल्याचे श्री. नेगी यांना कॉंग्रेस नेत्यांनी सांगितले. घेरावात अखिल भारतीय कॉंग्रेस सचिव गिरीष चोडणकर, गोवा प्रदेश सचिव संकल्प आमोणकर, प्रवक्ता प्रतिमा कुतिन्हो, प्रदेश सचिव जनार्दन भंडारी, प्रदीप नाईक, स्वाती केरकर व इतर उपस्थित होते. या सर्वांनी सभेच्या परवानगी विषयी संचालक नेगी यांना विचारणा करून त्यांची प्रत दाखवण्यास सांगितले असता याविषयी मला माहीत नसल्याचे त्यांनी सांगितले व ते या नेत्यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्‍नावर निरुत्तर झाले.