नव्या जुवारी पुलाची पूर्तता २०१९ अखेरपर्यंत शक्य

0
87

जुवारी नदीवर बांधण्यात येत असलेल्या नव्या आठपदरी केबल स्टेड पुलाचे बांधकाम सर्व काही व्यवस्थित जुळून आल्यास ठरल्याप्रमाणे डिसेंबर २०१९ पर्यंत पूर्ण होऊ शकेल अशी माहिती सार्वजनिक बांधकाम खात्यातील सूत्रांनी काल दिली.
पुलाच्या खांबांचा पाया घालण्याचे काम येत्या नोव्हेंबर महिन्यापर्यंत पूर्ण होणार आहे. त्यासाठीचे काम सध्या युध्द पातळीवर सुरू आहे. या पुलाच्या उभारणीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असून पुलाच्या कामाला विलंब होऊ नये यासाठी अतिरिक्त साधनांचा वापर केला जात आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या पुलावर एक रेस्टॉरन्ट व दर्शनस्थान (ऑर्ब्जर्व्हेटरी) उभारण्यात येणार असले तरी त्यासाठीची अंतिम मान्यता केंद्रीय भूपृष्ठ मंत्रालयाकडून अजून मिळाली नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. पण याचा अर्थ हे रेस्टॉरन्ट व दर्शनस्थान उभारण्यात येणार नाही असा अर्थ कुणी काढू नये, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.
भोपाळस्थित दिलीप बिल्डकॉन लिमिटेड या कंपनीला हा पूल उभारण्याचे कंत्राट मिळाले आहे. १३ किमी एवढ्या लांबीचा हा पूल असून तो गोव्यातील सर्वात लांब पुल ठरणार आहे. बांबोळीपासून तो दक्षिणेच्या बाजूने वेर्णेपर्यंत असेल. या पुलावर एकूण २७०० कोटी रु. खर्च होणार आहे.
जुन्या पुलाची ९ वर्षांपासून
दुरुस्ती नाही
दरम्यान, जुन्या जुवारी पुलाची दुरुस्ती २००८ साली करण्यात आली होती. त्यानंतर गेल्या ९ वर्षांत एकदाही या पुलाची दुरुस्ती करण्यात आली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. ८३ साली या पुलाच्या शुभारंभ करण्यात आला होता. त्यामुळे हा पूल जुना आहे याची साबांखात्याला कल्पना आहे आणि त्यामुळेच १२ टनपेक्षा जास्त वजन वाहणार्‍या ट्रकांना या पुलावरून प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली असून वेगमर्यादा ३० असल्याचे सूत्रांनी सांगितले.