चिंधी बांधते द्रौपदी …

0
581

ओंकार व्यंकटेश कुलकर्णी (खडपाबांध-फोंडा)

 

झालेला प्रकार नारदांच्या तोंडून ऐकून आणि नारदांच्या हातातली चिंधी पाहून कृष्णालाही अतीव आनंद झाला. मुनींनी मग कृष्णाच्या बोटावरील जखमेवर तो लेप लावला व त्यावर द्रौपदीने दिलेली तिच्या शेल्याची फाडलेली चिंधी बांधली. आणि काय आश्चर्य!! रक्ताच्या धारा वाहणं थांबलं! 

‘ना ऽ रा ऽ य ण… ना ऽ रा ऽ यण!’
चिपळ्यांच्या नादात हे शब्द ऐकून कृष्णाच्या चेहर्‍यावर स्मितहास्य खुललं. ‘‘नारदमुनी!’’ दीर्घ श्वास सोडत कृष्णानं अंथरुणावर पडल्या पडल्यात नारद मुनींना हाक मारली. बर्‍याच दिवसांनंतर बलरामासोबत कृष्णानं शस्त्रांचा अभ्यास केला होता. अभ्यासामुळे शिणलेलं शरीर कृष्णानं अंथरुणावर झोकून दिलं होतं. शरीरावर अनेक जागी शस्त्रांचे वार झेलल्यामुळे झालेल्या जखमा दिसत होत्या. शेजारीच उभ्या असलेल्या गोपिका कृष्णाच्या जखमा पुसत होत्या आणि त्या जखमांवर राजवैद्य औषधांचा लेप लावत होते. पण या छोट्याशा जखमांवर उपचार करत असताना मात्र वैद्यबुवांच्या चेहर्‍यावरची चिंता नारदमुनींना स्पष्ट दिसत होती.
‘‘काय झालं वैद्यबुवा?’’ नारद मुनींनी विचारलं.
‘‘अहो संपूर्ण विश्वाचं रक्षण करणार्‍या कृष्णाचे उपचार करतोय. ज्या कृष्णाच्या केवळ नामोच्चाराने अनेक व्याधी दूर पळतात अशा कृष्णाची ही जखम मात्र मला त्रास देत आहे. या जखमेवर कुठलंही औषध सापडत नाही.’’ असं म्हणत राजवैद्यांनी कृष्णाच्या बोटाकडे खूण केली.
बालपणी आपल्या इवल्याशा बोटावर गोवर्धन पर्वत उचलून धरणार्‍या कृष्णाच्या त्याच बोटाला जखम झाली होती. अखंड रुधिरांच्या धारा त्यातून वाहात होत्या.
‘‘नारायणा, ही कसली लीला? तुमच्या त्या जखमेने राजवैद्यांची बघा कशी भंबेरी उडाली आहे!’’ नारदमुनी म्हणाले.

‘‘मुनीवर, लीला कसली? अहो, ज्या सुदर्शन चक्राच्या भयानं तिन्ही लोकांत भीतिचं सावट पसरतं, ज्या सुदर्शन चक्रामुळं अनेक दानव मला शरण आले, त्याच सुदर्शन चक्रामुळं ही जखम झाली आहे. या सुदर्शनाला जगात कुणाकडेच उत्तर नाही! ह्याच्या जखमेवर जगातील कुठल्याच वैद्याकडे औषध नाही?’’ कृष्ण उत्तरला.
‘‘मग, ही जखम काय अशीच ठेवणार? रक्त असंच वाहू देणार?’’ नारद मुनींनी लगेच दुसरा प्रश्न विचारला.
राजवैद्यांकडे पाहून नारद म्हणाले, ‘‘अहो, निदान ती जखम बांधा तरी. रक्त वहायचं थांबेल!’’
‘‘सगळे उपचार करून थकलो. काहीही उपयोग नाही’’, एका वाक्यात राजवैद्यांनी खुलासा केला.
‘‘नारायणा, आता तूच मार्ग दाखव.’’ मुनी म्हणाले.
सुदर्शनाच्या जखमेनं कंटाळलेल्या कृष्णानं एक दीर्घ श्‍वास सोडला आणि नारद सोडून सर्वांना बाहेर जाण्यास सांगितले. खोलीत आता फक्त कृष्ण आणि नारदच होते.
‘‘मुनीवर, तुळशीची पाने ही सर्वोत्तम. अनेक जखमांवर, अनेक रोगांवर तुळस हे उत्तम औषध आहे. सुभद्रेच्या घरी जा. तिथे मला प्रिय असलेली कृष्णतुळस आहे. तिचा लेप माझ्या जखमेवर लावून त्यावर एक चिंधी बांधा. कदाचित त्यामुळे रक्त वाहायचं बंद होईल.’’ कृष्ण म्हणाला, ‘‘आणि… तिथं तुळस मिळाली नाही तर द्रौपदीकडे जा.’’
कृष्णाचे हे शब्द कानी पडताच नारदमुनी लगेचच सुभद्रेच्या महालाकडे निघाले. थोरल्या भावाची वार्ता ऐकून सुभद्रेला वाईट वाटलं. ताबडतोब तिनं दासीला निरोप धाडला. क्षणाचाही विलंब न करता दासीनं तुळशीच्या पानांचा लेप तयार केला. लेप लावून बांधण्यासाठी नारदांनी चिंधी मागितली. सुभद्रेनं लगेच दुसर्‍या दासीला फर्मान सोडलं. काही क्षणानंतर दासी रिकाम्या हातानेच परतली व सुभद्रेच्या कानात पुटपुटली.

काहीशा निराशेच्या सुरात सुभद्रेनं नारदांना सांगितलं, ‘‘सगळ्याच शालू आणि पैठण्या. चिंधी कुठेही नाही. आणि एवढ्याशा जखमेवर बांधण्यासाठी एवढं उंची वस्त्र कशी देऊ?’’ नारदमुनी थोडेसे हिरमुसले. तो लेप तसाच तिथेच ठेवून नारद मुनींनी द्रौपदीच्या घरची वाट धरली.

सुभद्रेप्रमाणेच द्रौपदीलाही नारदांनी सर्व गोष्ट कथन केली. कृष्णाला जखम झाली हे ऐकताच द्रौपदी तातडीने बागेत गेली. स्वतःच तुळशीची पाने तोडून त्याचा लेप तयार केला आणि मुनींना दिला. नारदांनी तिच्याकडेही चिंधी मागितली.

द्रौपदी ही पांडवांची पत्नी. आपल्या पराक्रमाच्या जोरावर जगातील सर्वांत महाग साडी पांडवांनी द्रौपदीला आणून दिली होती. तिन्ही लोकांत ज्या वस्त्रास मागणी होती, असे वस्त्र पांडवांनी द्रौपदीला आणून दिले होते. नारदमुनी आले तेव्हा तेच वस्त्र द्रौपदी नेसलेली होती.

नारद मुनींनी चिंधीची मागणी करताच क्षणाचाही विलंब न करता ते महागडं वस्त्र द्रौपदीनं फाडलं आणि त्याची चिंधी नारदांच्या हाती ठेवली.

झालेला प्रकार पाहून मुनीही अवाक् झाले. सगळाच प्रकार अनाकलनीय, अकल्पित होता. तिन्ही लोकांत ज्या वस्त्रास मागणी होती ते वस्त्र द्रौपदीने फाडलं होतं. का? तर कृष्णाला चिंधी हवी होती म्हणून?…
वास्तविक पाहता कृष्णाचं आणि द्रौपदीचं रक्ताचं नातं नव्हतं. कृष्णाची मानलेली बहीण होती ती! पण त्या नात्याचाही मान राखण्यासाठी द्रौपदीनं हे केलं होतं.
झालेला प्रकार नारदांच्या तोंडून ऐकून आणि नारदांच्या हातातली चिंधी पाहून कृष्णालाही अतीव आनंद झाला.

मुनींनी मग कृष्णाच्या बोटावरील जखमेवर तो लेप लावला व त्यावर द्रौपदीने दिलेली तिच्या शेल्याची फाडलेली चिंधी बांधली. आणि काय आश्चर्य!! रक्ताच्या धारा वाहणं थांबलं!

म्हणूनच द्रौपदी कृष्णाला प्रिय होती. तिने आपला भरजरी शेला फाडताना त्याच्या किंमतीचा विचार केला नाही. तिला फक्त कृष्णाच्या बोटाला झालेली जखम दिसत होती व ती बरी करण्याकरता तुळशीचा लेप व चिंधी हवी होती, एवढेच तिच्याकरता महत्त्वाचे होते. कृष्ण तिला प्रिय होताच.

पुढं याच चिंधीची परतफेड कृष्णानं वस्त्रहरणाच्या प्रसंगावेळी केली, हे सर्वांना माहीतच आहे. दुःशासन द्रौपदीच्या अंगावरील साड्या ओढून ओढून दमला… पण ती साडी संपेचना! त्याला तरी कुठे माहीत होतं म्हणा, की द्रौपदीच्या साडीला पुरवठा कृष्णाच्या चिंधी बांधलेल्या करंगळीतून होत होता ते!!!

तात्पर्य ः द्रौपदीने आपल्या मानलेल्या भावाला (कृष्णाला) बांधलेली जरतारी शेल्याची चिंधी, गरीब बहिणीने भावाच्या हाताला बांधलेला धागा किंवा शाळकरी ताईने तयार केलेली राखी, राजपूत रमणीने बाजूच्या राजाला पाठवलेले राखीचे ताट, श्रीमंत बहिणीने भावाला बांधलेली सोन्याची किंवा चांदीची राखी काय किंवा आज इंटरनेटच्या माध्यमातून बहिणीने भावाला पाठवलेली ई-शुभेच्छापत्रासहित राखी काय… या सर्वांमागे भावना एकच आहे… ती म्हणजे भावाबहिणींचे परस्परांवरील प्रेम!!

एकमेकांना जोडणारा असा हा सण इतर कुठल्याही संस्कृतीत नाही. सामाजिक ऐक्याची भावना जागृत ठेवण्यासाठी अशा प्रकारचे सण, उत्सव खूप महत्त्वाचे ठरतात. रक्ताच्या नात्याव्यतिरिक्त आपल्या मनाप्रमाणे नाती जोडण्यास या सणामुळे समाजास वाव मिळतो. ज्या समाजात अशा प्रकारची एकरूपता, ऐक्य असते असा समाज सामर्थ्यशाली बनतो… हाच या राखी पौर्णिमेचा संदेश आहे.

आपल्या देशात प्रेम, आपुलकी अजूनही कायम असल्याने रक्षाबंधन या सणाचे महत्त्व अजूनही कायम आहे. हिंदू संस्कृतीनुसार श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. उत्तर भारतात हा सण राखी म्हणून प्रसिद्ध आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटास राखी (किंवा रेशमी धागा) बांधून भावास दीर्घ आयुष्य व सुख लाभो म्हणून प्रार्थना करते.

रक्षाबंधन हे इतरांच्या व आपल्या जीवनामध्ये पवित्रता व मांगल्य निर्माण करणारे बंधन आहे. इंद्राच्या राणीने आपल्या मनगटावर एक धागा बांधला होता. ज्याच्या सामर्थ्याने वज्राप्रमाणे राक्षसाचा पराभव केला. तेव्हापासून त्याची स्मृती म्हणूनही मनगटावर राखी बांधण्याची पद्धत आहे.