एक पाऊल पुढे!

0
139

आपली नवप्रभा आज सुवर्णमहोत्सवाच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकत आहे. वर्षांमागून वर्षे झरझर मागे सरली. अर्थातच हा प्रवास सोपा नव्हता.

वर्तमानपत्रांचे बदलत चाललेले स्वरूप, बदलती प्राधान्ये, बदलता वाचक, त्याच्या बदलत्या आवडीनिवडी, दूरचित्रवाणीपासून इंटरनेटपर्यंतच्या नवनव्या माध्यमांचे आक्रमण, वृत्तपत्रसृष्टीतील अटीतटीची स्पर्धा, त्यातून वाचकांना दाखवली जाणारी आमिषे या सार्‍याला केवळ गुणवत्तेच्या आधारे तोंड देऊन नवप्रभा गोव्याच्या माध्यमविश्वामध्ये भक्कमपणे टिकून आहे ती आपल्यासारख्या निष्ठावान वाचकांच्या बळावर हे आम्ही नेहमीच अभिमानाने अधोरेखित करीत आलो आहोत. आणि का बरे करू नये? हा वाचक नुसता वाचक नाही. तो विचार करणारा, सुज्ञ, सुजाण वाचक आहे. तो एकांगी नाही. कुठल्या एका विचारधारेच्या अधीन नाही. वेगवेगळ्या विचारधारांचा, पण विवेकबुद्धी शाबूत असलेला, सतत समाजाच्या हिताची चिंता वाहणारा, त्याला दिशादिग्दर्शन करणारा, जनमत घडवणारा हा वाचक आहे आणि अशा या जाणकार, प्रगल्भ वाचकाचे वैचारिक नेतृत्व नवप्रभेने आजवर स्वीकारलेले आहे. नवप्रभा आपल्या या वाचकाला नेहमीच सन्मानाने वागवीत आलेली आहे. त्याच्या विचारांना मुक्त वाव देत आलेली आहे. त्याच्या व्यथा-वेदनांशी समरस होत आलेली आहे. म्हणूनच आजवर हे नाते टिकले आणि सतत वाढत राहिले. अनेक दैनिके आली तरी रोज नवप्रभा विकत घेऊन वाचणारी मंडळी गोव्यात हजारोंच्या संख्येने आहेत. कोणत्याही वर्तमानपत्राच्या दृष्टीने यासारखी भाग्याची गोष्ट दुसरी नसेल. हे गोव्याच्या मातीत जन्मलेले आणि गोव्याच्या मातीचा अभिमान मिरवणारे दैनिक आहे. म्हणूनच यंदा या
गोमंतभूमीच्या कीर्तीपताका दशदिशांना ङ्गडकवणार्‍या काही प्रतिभावंत सुपुत्रांच्या आपल्या गोव्याविषयीच्या, गोवेकरांविषयीच्या भावनांना शब्दांकित करण्याचे आम्ही ठरविले. हा ‘गोमंतगौरव’ आपल्याला आवडेल असा विश्वास वाटतो. सुवर्णमहोत्सवाकडे वाटचाल करणारी आपली नवप्रभा दिवसेंदिवस तरूणच होत जाईल अशी ग्वाही आम्ही आपल्याला यापूर्वी दिली होती. अंकाचे बाह्यांग आणि अंतरंग यातील सततच्या बदलांद्वारे एक आनंददायी वाचकानुभव आपल्याला देण्याची धडपड आम्ही करीत आलो आहोत. आमच्या मर्यादांची आम्हाला जाणीव आहे, परंतु तरीही उपलब्ध तुटपुंज्या साधनांनिशी उत्तमोत्तम गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा सतत प्रयत्न राहिला आहे. दरवर्षी वर्धापनदिनाच्या निमित्ताने काही बदल आम्ही करीत असतो. यंदाही आपल्याला तोे या संपादकीय पानापासूनच जाणवेल. दैनंदिन जीवनातील अध्यात्माचे अर्थगर्भ असे विवेचन करणारे प्रा. रमेश सप्रे ‘आयुष’ पुरवणीतून नित्य आपल्या भेटीला येत असतात. आता ते संपादकीय पानावर पाच संतांच्या तत्त्वज्ञानाचा अर्थ उलगडणारे ‘पंचरत्न हरिपाठ’ हे आगळेवेगळे दैनंदिन सदर लिहिणार आहेत. ज्येष्ठ विनोदी साहित्यिक विजय कापडी हे तर आमचे हक्काचे लेखक. यावेळी एका नव्या बाजाचे कोरे करकरीत सदर घेऊन ते आपल्या भेटीला आलेले आहेत! सर्वांत महत्त्वाचे म्हणजे नवप्रभेच्या गेल्या ४६ वर्षांच्या वाटचालीकडे यापुढे मागे वळून पाहत त्यातील अमृतकण आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत. आमच्या निष्पक्षतेचे तर आपण साक्षीदार आहातच. भाषिक वादाने दुभंगलेल्या या गोव्यामध्ये मराठी आणि कोकणी या दोन्ही देशी भाषांच्या अभिमान्यांना नवप्रभा हे आपले व्यासपीठ वाटतेे. नवोदित साहित्यिकांचे तर हे हक्काचे व्यासपीठ आहे. अनेक नवे लेखक नवप्रभेने घडवले. असे प्रतिभावंत लेखक, असा सुजाण वाचक हे वैभव हाताशी असेल तर आणखी काय हवे, नाही का?