चक्रीवादळामुळे हानी झालेल्यांना नुकसान भरपाई देण्यास सुरूवात

0
110

>> ८ तालुक्यांतील २४१ जणांना २० लाख मंजूर

तौक्ते या चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना नुकसान भरपाई देण्याच्या प्रक्रियेला गती देण्यात आली आहे. राज्यातील ८ तालुक्यांतील २४१ जणांना २० लाख ६६ हजार ६५४ रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. तर, ४ तालुक्यांतील नुकसान भरपाई वितरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

तिसवाडी तालुक्यातील ७८ जणांना ४ लाख २८ हजार ४०० रुपये मंजूर करण्यात आले आहेत. काणकोण तालुक्यातील १६ जणांना ८८ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. धारबांदोडा तालुक्यातील ५ जणांना ३० हजार रुपये, सासष्टी तालुक्यातील ५० जणांना २ लाख ७१ हजार २०० रुपये, मुरगाव तालुक्यातील ११ जणांना ३२ हजार रुपये, डिचोली तालुक्यातील ४४ जणांना १० लाख ३९ हजार ९९३ रुपये, सत्तरी तालुक्यातील १४ जणांना ६७ हजार ५८४ रुपये, आणि पेडणे तालुक्यातील २३ जणांना १ लाख ९ हजार ४७७ रुपयांचे आर्थिक साहाय्य मंजूर करण्यात आले आहे. यासंबंधीचा आदेश जिल्हाधिकार्‍यांनी जारी केला आहे.

राज्यात तौक्ते या चक्रीवादळामुळे १४६ कोटी रुपयांची हानी झाली आहे. या वादळामुळे झाडे मोडून पडल्याने घरे, वाहनांची नासधूस झाली आहे. शेती, बागायतीची हानी झाली आहे. वीज खात्याचे मोठे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तालुका पातळीवर अधिकार्‍यांच्या बैठका घेऊन वादळामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना त्वरित नुकसान भरपाई देण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया करण्याची सूचना केली होती.

मृत्युमुखी पडलेल्यांच्या
कुटुंबीयांना ४ लाख
या चक्रीवादळामुळे मृत्युमुखी पडलेल्या तीन जणांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाखांचे आर्थिक साहाय्य देण्यात आले आहे. राज्य आपत्ती निधीतून नागरिकांना नुकसान भरपाई दिली जात आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.