>> तीन लाख घरांची पडझड, ओडिशामध्येही हाहाकार
यास चक्रीवादळाने काल पश्चिम बंगालात हाहाकार उडवून दिला. देशाच्या पूर्व किनारपट्टीवर हे वादळ मंगळवारपासून धडकले असून यास चक्रीवादळ आता ओडिशापासून पुढे सरकले असून झारखंडच्या दिशेने या वादळाचा प्रवास सुरू आहे. त्यानंतर त्याची तीव्रता कमी होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र सध्या झारखंडला हाय अलर्ट देण्यात आला आहे.
यास चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका पश्चिम बंगालमधील दिघा तर ओडिशामधील भद्रक जिल्ह्याला बसला आहे. अनेक नागरिकांना आपली राहती घरे सोडून इतरत्र सुरक्षित स्थळी हलवण्याचे कार्य बचाव पथकांमार्फत सुरू आहे. खबरदारी म्हणून परिसरातील वीज बंद करण्यात आली आहे. जोरदार पाऊस आणि वार्यामुळे पश्चिम बंगालमधल्या हुबळी आणि उत्तर २४ जिल्ह्यात ८० घरांचे नुकसान झाले असून वीज पडून दोघांचा मृत्यू झाला आहे.
दळणवळणावर परिणाम
यास चक्रीवादळाचा मोठा फटका दळणवळण व्यवस्थेवर झाला आहे. खबरदारी म्हणून ओडिशाकडे जाणारी वाहतूक वळवण्यात आली. तसेच काही वाहतूक रद्दही केली आहे. येथे जाणार्या सर्व रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्याची माहिती पूर्व रेल्वेचे महासंचालक मनोज जोशी यांनी दिली. रेल्वेमार्फत विविध ठिकाणी ऑक्सिजन पुरवठा करण्यात येत होता. तो यापूर्वीच बंद करण्यात आला आहे. वादळामुळे रेल्वेचे इलेक्ट्रिक वायरिंग तुटून वाहतुकीचा खोळंबा होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे वाहतुकीसाठी डिझेल इंजीन सज्ज करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे, विमान वाहतुकीला यास चक्रीवादळामुळे मोठा फटका बसला. मुंबईहून भुवनेश्वरकडे जाणार्या ६ प्रवासी विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
मंगळवारपासून सुरूवात
चकीवादळाच्या प्रभावामुळे पूर्व किनार्यावरील ओडिशा आणि पश्चिम बंगाल राज्यांच्या समुद्र किनारी भागात मंगळवारी रात्रीपासूनच धुमाकूळ सुरू झाला. येथील हवामानात बदल झाला होता. जोरदार वार्यांसह पाऊस पडू लागला. पहाटेपासून पावसाचा जोर वाढला. समुद्रात दोन ते तीन मीटर उंचीच्या लाटा उसळत होत्या. मेदिनीपूरसह पश्चिम बंगालमधील दक्षिणेकडील जिल्हे तसेच ओडिशाच्या बालासोर आणि भद्रक या भागांमध्ये पाणी साचले होते. वादळामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली. अनेकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे लागले. चक्रीवादळाचा जोरदार प्रकोप भारताच्या पूर्व किनार्यावरील जिल्ह्यांमध्ये सुरू होता.
ओडिशाच्या भद्रक, जगतसिंहपूर, कटक, बालासोर, ढेंकानाल, जयपूर, मयुरभंज, केंद्रापडा, क्योंझर या भागाला पावसाने झोडपण्यास सुरुवात केली. तर पश्चिम बंगालमधल्या दिघा, दक्षिण २४ परगण्यात बांकुरा, झारग्राम तसेच मेदिनीपूर इथे सकाळपासूनच पाऊस कोसळत होता.
झारखंडमध्ये हाय अलर्ट
यास चक्रीवादळाचा मोर्चा झारखंडच्या दिशेने असून झारखंडला हाय अलर्ट देण्यात आला आहे. या भागामध्ये आज जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असून मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये अशा सूचना करण्यात आला आहेत.
तीन लाख घरांची पडझड
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी, यास चक्रीवादळामुळे तीन लाखांपेक्षा जास्त घराची पडझड झाल्याची माहिती दिली असून १५ लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवले असल्याचे सांगितले. तसेच या चक्रीवादळामुळे १ कोटी लोक प्रभावीत झाले असल्याचेही बॅनर्जी यांनी सांगितले. चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना एक कोटीची मदत सरकारतर्फे बॅनर्जी यांनी जाहीर केली आहे. पाऊण लाख नागरिकांकरता मदत आणि बचाव कार्य सुसज्ज ठेवण्यात आले आहे. सखल भागात राहणार्या लोकांना शाळांमध्ये स्थलांतरित करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.