गोव्याच्या पराभवाचा चौकार

0
101

येथील डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी क्रिकेट स्टेडियमवर काल शुक्रवारी झालेल्या सय्यद मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात केरळने गोव्याचा ९ गड्यांंनी पराभव केला. गोव्याचा हा सलग चौथा पराभव ठरला.

केरळने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेताना गोव्याला फलंदाजीस पाचारण केले. निर्धारित २० षटकांत गोव्याला ८ गडी गमावून केवळ १३८ धावा करता आल्या. केरळने यानंतर विष्णू विनोद याला गमावून १५.५ षटकांत विजय प्राप्त केला. गोव्याच्या डावाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर अमोघ देसाई भोपळाही फोडू शकला नाही. ताशी १४० कि.मी. पेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी करताना पदार्पणवीर आसिफने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. स्वप्निल अस्नोडकरही आसिफच्या वेगाचा बळी ठरला.

बाद होण्यापूर्वी स्वप्निलने १ चौकार व १ षटकारासह १२ धावा केल्या. मधल्या फळीत सगुण कामत (२४), कीनन वाझ (३६), दर्शन मिसाळ (२३) यांनी उपयुक्त योगदान दिले. श्रीनिवास फडते (५) पुन्हा एकदा अपयशी ठरला. तळाला लक्षय गर्ग याने केवळ ४ चेंडूंत नाबाद १४ धावा करत गोव्याला १४०च्या आसपास नेले. माफक लक्ष्याचा पाठलाग करताना केरळने संजू सॅमसन (नाबाद ६५) व अरुण कार्तिक (नाबाद ३७) यांच्या बळावर विजय साकार केला. विष्णू विनोदने केवळ १९ चेंडूंत ३४ धावांती वेगवान खेळी केली.