भारताच्या लोकसंस्कृतीचं भव्य दिव्य दर्शन घडवणारा लोकोत्सव

0
177

– सिद्धी उपाध्ये

कला आणि संस्कृतीचा ‘लोकोत्सव’ सध्या पणजीत कला अकादमीच्या दर्यासंगमावर सुरू आहे. युगानुयुगांची सांस्कृतिक विरासत असलेल्या या विशाल देशाच्या विविध प्रांतांच्या अस्सल लोकसंस्कृतीचे दर्शन घडवणार्‍या या आगळ्यावेगळ्या महोत्सवाविषयी –

नवीन आंग्ल वर्षाची चाहूल लागताच आपोआप आपलं मन उत्सुक बनतं ते कला अकादमीतल्या दर्यासंगमवरचा लोकोत्सव अनुभवण्यासाठी. दरवर्षी जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसर्‍या आठवड्यात लोकोत्सव सुरू होतो आणि पुढील दहा दिवस आपल्या सर्वांच्या डोळ्यांना, कानांना, मनांना आणि रसनांना तो तृप्त करून सोडतो.
गोवा सरकारच्या कला आणि संस्कृती संचालनालयाच्या अनेक उत्तमोत्तम उपक्रमांपैकी एक प्रमुख आणि मोठा उपक्रम म्हणेज लोकोत्सव. भारतातल्या विविध राज्यांमधून शेकडो लोककलाकार, हस्तकलाकार गोव्यात येतात. आपापल्या राज्यातल्या लोककलांमधून आपलं मनोरंजन करतात. लहान – थोर सगळ्यांनाच मनसोक्त आनंद देणारा असा हा महोत्सव.

वैविध्यपूर्ण नृत्याविष्कार

एक से बढकर एक अशा नृत्याविष्कारांनी हे लोककलाकार आपल्या मनाला भुरळ घालतात, आपला उत्साह द्विगुणित करतात. कधी ढोल – ताशांच्या, सनईच्या सुरांत, चढ्या आवाजातल्या गीतांवर सादर होणारे आदिवासी नाच, तर कधी संथ लयीत वाद्यांच्या मंजुळ स्वरनादासोबत सादर होणारा नृत्याविष्कार, कधी पूर्णपणे शास्त्रीय नृत्य वाटावे असा एखादा नृत्यप्रकार तर कधी युद्धकलेतील बारकावे दाखवणारा कलाप्रकार.

या कलाकारांचे वेगवेगळे पेहेरावही पाहण्यासारखे असतात. तर्‍हेतर्‍हेच्या रंगांची उधळण जणू यात केलेली असते. कोणी पायघोळ अंगरखे घातलेले, तर कोणी वेगळ्याच पद्धतीने साडी नेसलेले. कोणी धोतर नेसलेले, तर कोणी लुंगी गुंडाळलेले. कोणी सर्पाप्रमाणे दिसणारी वेशभूषा धारण करते, तर कोणी आरसे, पिसे, तुरे मिरवत अंगावर रंगरंगोटी करून आपली शोभा वाढवते. ही नृत्ये त्या त्या प्रदेशातल्या संस्कृतीची छोटेखानी झलकच असते. वर्षारंभ, पावसाचे आगमन, पहिलं पीक, लग्न, सण समारंभ, होळी, शिकारीचा आनंद, युद्धातले नैपुण्य, शुभ संकेत, पाहुण्यांचं आगमन, जन्म, मृत्यू, प्रथा, परंपरा, यावर आधारलेली ही नृत्ये असतात.

गोवा, राजस्थान, गुजरात, ओरिसा, पश्चिम बंगाल, आसाम, मणिपूर, महाराष्ट्र, मिझोराम, हरियाणा, सिक्कीम, पंजाब, त्रिपुरा, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगढ, काश्मीर अशा भारतातल्या विविध राज्यांमधले कलाकार यामध्ये आपली कला सादर करतात. एकेका राज्यामधून ३ -४ लोकनृत्ये सुद्धा सादर होतात आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात. कधी विदेशी कलाकारांचा सुद्धा यात सहभाग असतो.

दुर्मीळ वाद्यांचा स्वरानुभव

ह्या महोत्सवामध्ये अनेक प्रकारची वाद्ये पाहण्याची, ऐकण्याची संधी रसिकांना मिळते. खमयचा, सुरनई, खडताल, ढोलक, पुंगी, मंजिरी, पेटी, म्हशीच्या शिंगापासून बनवलेला पेपा, विविध प्रकारच्या बासर्‍या, शहनाई, थाळी, अशी विविध वाद्यं आपल्या सूर तालाने दर्शकांना प्रभावित करतात. विविध प्रकारची, कधी न पाहिलेली वाद्यं आपण इथं पाहू शकतो, त्यांचा स्वरानुभव घेऊ शकतो.
विविधरंगी पोशाख, वेगवेगळे नृत्य प्रकार, विविध रंगरूपाचे कलाकार, त्यांच्या वेगवेगळ्या भाषा, गाणी, नाच, वाद्यं, हे सगळं पाहायला अतिशय रम्य वाटतं. ही कला समोर बहरत असताना आपल्या मनाला एका प्रकारची उभारी मिळते. एक संपला की लगेच दुसरा नाच सुरु झाल्याने कधी एकातून दुसर्‍यात गेलो हे कळतच नाही. भारतातल्या ‘विविधतेत एकता’ ह्या तत्त्वाची खात्री पटते, त्याचं महत्त्व जाणवतं आणि मन अभिमानाने भरून येतं.

हस्तकलाकारांचे कलाकौशल्य

लोककलाकारांप्रमाणेच हस्तकलाकारही या लोकोत्सवात सामील होतात. या युगात केवळ हस्तकौशल्याने अप्रतिम आविष्कार घडवणारे हे कलाकार. यंत्राची वा आधुनिक उपकरणांची मदत ना घेता, वडिलोपार्जित चालत आलेली कला आणि त्यातून केलेला व्यवसाय हेच यांचं जीवन. अशा हस्तकलाकारांसाठी देखील लोकोत्सव फार महत्वाचा उपक्रम. प्रचंड संख्येने लोक त्यांच्या दालनांना भेटी देतात. कमालीची विक्री देखील होते. आम्हा गोमंतकीयांना भारतभरातल्या वैविध्यपूर्ण गोष्टी एकाच मांडवाखाली मिळतात हे आमचं भाग्यच.

खवय्यांसाठीही ही पर्वणीच

खवय्यांसाठी देखील लोकोत्सव ही एक पर्वणीच असते. भारतातल्या विविध प्रदेशांतले चविष्ट पदार्थ तुमच्या अगदी डोळ्यांसमोर बनवले जातात आणि गरमागरम असे तुम्हाला चाखायला मिळतात. वाह!! नुसता विचार करून सुद्धा जिभेला पाणी सुटतं आणि सलग दहा दिवस हव्या त्या पदार्थावर यथेच्छ ताव मारता येतो, मनपसंत खाता येतं आणि खिलवताही येतं. म्हणून लोकोत्सव हा खवय्यांसाठीही महत्त्वाचाच.
घरगुती वापराच्या अनेक वस्तूंचा खजिनाही इथे उपलब्ध असतो तो वेगळाच. सजावटीच्या वस्तूंपासून ते घरगुती मसाले, पापड, लोणची, मोरांबे, साठवणीच्या/बेगमीच्या दृष्टीनेही उपयोगी तसेच झटपट पदार्थ बनवण्याकरता सुद्धा अनेक प्रकारची पीठं, डाळी, आणि अनेक गृहोपयोगी वस्तूंची लयलूटच असते.

काय घ्यावे, किती घ्यावे

महिला वर्गाची तर भारीच चंगळ असते. कपड्यांचे इतके प्रकार, इतकी विविधता क्वचितच कुठे मिळत असेल. हव्या त्या प्रकारचे, हव्या त्या पद्धतीचे कपडे, तयार कपडे, शिवण्यासाठीचे कापड, बॅगा, पर्सेस, दागिने, चपला, अशा अगणित नावीन्यपूर्ण वस्तूंचा हा खजिना पाहिल्यावर महिलांची खरेदी संपतच नाही असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

दरवर्षी आगळेवेगळे, सुरेख, नजरेत भरण्यासारखे असे नेपथ्य लोकोत्सवासाठी उभारले जाते. कधी एखाद्या गावाकडचा देखावा तर कधी किल्ल्याची भव्यता, कधी समुद्रकिनार्‍याची शोभा, तर कधी मंदिर, मशीद, चर्चचा साज. कमालीची सौंदर्यदृष्टी नेपथ्यकार वापरतो आणि अनेकांच्या मदतीने आणि मेहनतीने तयार होतो लोकोत्सवाचा मंच. हेही लोकोत्सवाच्या अनेक आकर्षणांपैकी एक. याची भव्यता दर्शकांना वेगळ्या विश्वात घेऊन जाते.

संस्कृतीचं आरस्पानी दर्शन

लोकजीवनात कुठल्याही प्रदेशाच्या संस्कृतीचं आरस्पानी प्रतिबिंब दिसत असतं. तिथल्या समाजमनाचा तो आरसा असतो. त्या आदिम संस्कृतीचा तो चेहरा असतो. शहरीकरणाचा स्पर्श न झालेल्या लोक मनाचा तो आंतरिक उन्मेष असतो. आपापल्या प्रदेशातल्या निसर्गाचा, तेथल्या प्रथा – परंपरांचा, पूर्वापार चालत आलेल्या पद्धतींचा चालता – बोलता किंवा गाता – नाचता दस्तऐवज म्हणजे लोकोत्सव.
आजच्या धकाधकीच्या जीवनात, २१ व्या शतकात, मोबाईल, इंटरनेटच्या विश्वात, आपली आदिम संस्कृती टिकवायची असेल तर अशा प्रकारचा उपक्रम आत्यंतिक गरजेचा आहे. या कलाकारांना, कलाप्रकारांना राजाश्रय, लोकाश्रय मिळायला हवा. अशा महोत्सवातून हे लोककलाकार ह्या कलांना आणि आपल्या लोकसंस्कृतीला जिवंत ठेवतात. नाही तर आपल्या मुलांना कुठे माहित असतं, ’धालांच्या मांडाचं’ महत्त्व? ’वीरभद्र’ पहिला जातो तो कुठल्या तरी कार्यक्रमातल्या मंचावरच, ’मोरुलो’ एखाद्या वेशभूषा स्पर्धेसाठी आणि ’गडे’ – वृत्तवाहिनीवरील सांस्कृतिक कार्यक्रमाच्या प्रसारणामध्ये.

आधुनिकीकरणाच्या विळख्यामध्ये, स्पर्धेच्या युगामध्ये लोक जनजातींना आपली जीवनशैली बदलावी लागली. बदलावीशी वाटली आणि बदलली गेली देखील. यात चुकीचं आहे असं नव्हे, परंतु ह्या बदलामुळे आणि समाजातल्या स्पर्धेमुळे, प्रसारमाध्यमांमुळे त्यांच्या जीवनाचा हरेक पैलू वेगळा झाला. किंबहुना प्रत्येक बदल स्वीकारला गेल्यामुळे संपूर्ण जीवनच बदललं. आदिम संस्कृतीकडे जुळलेली मुळं हलू लागली आहेत, असा भास होतो. ती उखडली जाण्यापूर्वीच ठोस पावलं उचलली जाण्याची गरज आहे. अन्यथा हे सर्व कलाप्रकार कधीकाळी अस्तित्वात होते हे आपल्याला पुस्तकांमध्ये वाचावं लागेल.

अशा बदलत्या परिस्थितीत जेव्हा लोकोत्सवासारख्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या कार्यक्रमातून त्या कलाकारांना आपली कला एवढ्या भव्य व्यासपीठावर आणि उदंड रसिकांच्या उपस्थितीत जेव्हा अभिमानानं सादर करता येते, तेव्हा त्या कलाकारांनाही नक्कीच भरून पावत असेल!

यंदाचा लोकोत्सव प्लास्टिकमुक्त

कला आणि संस्कृती संचालनालयाने यंदा सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत, प्लास्टिकमुक्त लोकोत्सव करण्याचे ठरवते आहे. त्यामुळे स्टॉलधारकांनी, ग्राहकांनी, खवय्यांनी, कोणीही प्लास्टिक वापरू नये. शक्यतो कापडी किंवा कागदी पिशवी वापरावी. पर्यावरण सांभाळण्यात आपलाही खारीचा वाटा आपण उचलूयात अशी विनंती.

चला तर, पुढचे दहा दिवस हातातली सगळी कामे बाजूला ठेऊया, वेळ काढूया आणि कला अकादमीच्या दर्या संगमावर कला आणि संस्कृती खात्याच्या लोकोत्सव २०१८ ला जाऊया. भरगच्च अशा रंगतदार कार्यक्रमांचा, नृत्याचा, संगीताचा आस्वाद घेऊया. चवदार खाद्य पदार्थावर भरपूर ताव मारूया आणि हस्तकलाकारांच्या कारिगरीची कदर करत मस्त खरेदी करूया. पण पर्यावरण संभाळूया! राजस्थानी कलाकार वाद्यं लावून सज्ज झालेत. म्हणताहेत, पधारो म्हारे देस…!!

असा असेल यंदाचा लोकोत्सव…

लोकोत्सव २०१८ हा नेहमीप्रमाणे खास असणार आहे. यंदा राजस्थान आपल्या मांगणीयार, भवई, कठपुतळी, बहुरुपिया, कालबेलिया आदींसह पदार्पण करणार आहे. उडिशा घेऊन येत आहे गोटीपूआ आणि संभलपुरी. आसामचे लोककलाकार पेश करणार आहेत, बिहू आणि बार्डोइ. पुंग ढोल चोलम आणि थांगता मणिपूरचे. पश्चिम बंगालचा पुरुलिया छाऊ तर सिक्कीमचा सिंघीचाम. गुजरातचे बहुरुपिया, केरवानो वेष व सिद्धी धमाल. चरकूला व मयूर नृत्य उत्तर प्रदेशचे. लावणी व कोळी नृत्याची धमाल घेऊन महाराष्ट्राचे कलाकार येणार आहेत. कर्नाटक – ढोलूकुनीथा आणि लंबाणी नृत्य, तर छत्तीसगढ पंथीनृत्य सादर करणार आहे. हरयाणा – घुमर फाग तर त्रिपुरा होजागिरी पेश करणार आहे. उत्तराखंड छपेली सादर करणार आहे, तर दक्षिण मध्य सांस्कृतिक क्षेत्र नागपूर आणि झारखंड सुद्धा आपल्या विविध नृत्याविष्कारांसह लोकोत्सवामध्ये सहभागी होणार आहेत. याशिवाय दररोज आपल्या गोमंतकातील काही लोकनृत्ये खास भर घालतील.

हे सर्व नृत्यप्रकार कला अकादमी संकुलातील दर्यासंगमावर हजारो प्रेक्षकांचं मनोरंजन करतील, तर कला अकादमीच्या खुल्या रंगमंचावर सुद्धा १३ जानेवारी पासून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा नजराणा रसिकांसाठी खुला असेल. त्यामध्ये गोव्यातील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांचे, गोमंतकातील तसेच गोव्याबाहेरील कलाकारांचे कार्यक्रम रोज संध्याकाळी ७ वाजता सादर होतील, ज्यामध्ये पाश्चात्य संगीताची मैफल, बाउल नृत्य व संगीत, शंखासूर काला, लेपचा गीत आणि नृत्य, दशावतारी आख्यान, तियात्र, भवाई – गीत-नृत्य, पेरणी जागर अशा कार्यक्रमांचा समावेश आहे.

हस्तकलेचे गाळे दरवर्षीप्रमाणे प्रचंड वैविध्याने नटलेले असतील. यामध्ये मोजडी, बांधणी, चामड्याच्या वस्तू, पॅचवर्क, मण्यांच्या वस्तू, आरसे, वेतकाम, लघुचित्रं, फॅब्रिक, हातमाग, लाकडी खेळणी व सामान, नकली दागिने, खादी उत्पादने, गोव्याच्या हस्तकलाकारांनी बनवलेल्या वस्तू अशा तर्‍हेतर्‍हेच्या वस्तू ग्राहकांना भुरळ घालतील.

कला आणि संस्कृती संचालनालय दरवर्षी लोकोत्सवामध्ये गोवेकरांसाठी कार्यशाळा घेते, ज्यामध्ये लाखेच्या बांगड्या बनवणे, पतंग बनवणे, विविध प्रकारचे नाच, मुखवटे बनवणे, पाककला अशा प्रकारच्या नवनवीन कार्यशाळा घेतल्या जातात. यंदा मृत्तिका कला, पटुआ चित्रकला, कागदापासून विविध वस्तू बनवणे व पाककला अशा कार्यशाळा घेण्यात येणार आहेत.

कला आणि संस्कृती संचालनालय गेली १८ वर्षे हा उपक्रम राबवत आहे. अतिशय स्तुत्य, कौतुकास्पद आणि सुनियोजित असा लोकोत्सव दरवर्षी राबवणं हे अत्यंत जबाबदारीचे काम आहे. कला आणि संस्कृती कर्मचारी शिस्तबद्धरित्या, संघटितपणे ही जबाबदारी पेलतात हेही तेवढेच महत्वाचे आहे. अनेक महिन्यांची मेहनत त्या मागे असते हे वेगळं सांगायलाच नको. किंबहुना एक लोकोत्सव संपला की, लगेच पुढच्या वर्षाच्या लोकोत्सवाची तयारी सुरु होते असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये.
एवढा मोठा उपक्रम करण्यास कला आणि संस्कृती खाते समर्थ असले तरी अनेक संस्थांचा यात सहभाग असतो, अनेकांचा हातभार लागतो. यंदाच्या लोकोत्सवामध्ये पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, उदयपूर, कला अकादमी, गोवा क्रीडा प्राधिकरण, पणजी महानगरपालिका, दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर, कला आणि संस्कृती संचालनालय, झारखंड, ट्राइब्स इंडिया, तसेच विविध प्रायोजकांचाही सहभाग लाभला आहे.