डिसेंबरपर्यंत सात किनार्‍यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार

0
89

गोव्यातील महत्त्वाच्या व पर्यटकांची वर्दळ असणार्‍या  हणजूण, बागा, कळंगुट, मिरामार, कोलवा, माजोर्डा, पाळोळे आदी किनार्‍यांवर येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार असल्याचे पर्यटन मंत्री दिलीप परूळेकर यांनी काल या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. त्यासाठीचा डीपीआर तयार करण्यात आलेला असून निविदा प्रक्रिया चालू असल्याची माहिती त्यांनी दिली.

गुन्हेगारांकडून पर्यटकांना छळण्याचे प्रकार होऊ लागलेले असून खास करून महिला पर्यटकांची छेडछाड काढणे यासारखे प्रकार हल्लीच्या काळात घडू लागल्याच्या पार्श्‍वभूमीवर हे कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. एकदा हे कॅमेरे बसवले की पर्यटन खात्याच्या कार्यालयाला वरील किनार्‍यांवर काय चालले आहे ते कळू शकेल, असे परूळेकर यांनी स्पष्ट केले. किनार्‍यांवरील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठीच सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे ते म्हणाले.
पर्यटन धोरणाचे काम चालू
दरम्यान, पर्यटन मास्टर प्लॅन व पर्यटन धोरण तयार करण्याचे काम सध्या चालू आहे. पर्यटन उद्योगाशी संबंधित लोकांकडून आम्ही त्यासाठीच्या सूचना मागवल्या होत्या. या लोकांनी केलेल्या सूचनांचा मास्टर प्लॅन व पर्यटन धोरण यात समावेश करण्याचे काम चालू असल्याची माहितीही परूळेकर यांनी दिली.