खाण व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी सर्व पर्यायांचा विचार सुरू

0
214

>> सुदिन ढवळीकर यांची माहिती

राज्यातील खाण व्यवसाय अविरत सुरू ठेवण्यासाठी सर्व पर्यायांचा विचार केला जात आहे, अशी माहिती सभागृहाचे नेते, सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी विधानसभेत काल दिली. राज्यातील खाण व्यवसाय १६ मार्चपासून बंद पडू नये म्हणून योग्य तोडगा काढण्याची मागणी बहुतांश आमदारांनी विधानसभेत केली.
कॉँग्रेसचे आमदार, माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे व इतरांनी मांडलेल्या खाणीसंबंधीच्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना मंत्री ढवळीकर यांनी वरील माहिती दिली. सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाचा ऑगस्ट २०१४ मधील खाण लीज नूतनीकरणाचा आदेश बाजूला ठेवून १६ मार्च २०१८ पासून खाण व्यवसाय बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. नव्याने खाण लीजांचे नूतनीकरण व पर्यावरण दाखले घेण्याचे निर्देश दिला आहे. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी खाण व्याप्त भागातील आमदारांची एक बैठक घेऊन तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. खाण व्यवसाय क्षेत्रातील उद्योजक व इतरांशी चर्चा केली जाणार आहे.

मुख्यमंत्री पर्रीकर आजारी असल्याने पूर्वी ठरलेली २४ रोजीची बैठक होऊ शकणार नाही. सरकारकडून राज्यातील खनिज डंपचा लिलाव केला जाणार आहे. तसेच उत्खनन केलेल्या खनिजाची निर्यात करून खाण व्यावसायिकांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न जाणार आहे. खाणीसंबंधी लोकांच्या भावनांची निश्‍चित दखल घेतली जाणार आहे. सरकारकडून सर्व आमदार, खाण व्यावसायिकांची लवकरच बैठक घेतली जाणार आहे. तसेच नवीन खाण धोरण तयार केले जाणार असल्याचेही मंत्री ढवळीकर यांनी सांगितले.

खाण हा प्रमुख उद्योग आहे. त्यावर राज्यातील लाखो नागरिक, व्यावसायिक आपला उदरनिर्वाह करीत आहेत. १६ मार्चपासून खनिज व्यवसाय बंद झाल्यास मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारने खाण बंदीच्या प्रश्‍नात वेळीच गंभीरपणे लक्ष देऊन तोडगा काढण्याची गरज आहे. सरकारने सर्वोच्च न्यायालयात ङ्गेरआढावा याचिका दाखल करावी, असे आमदार राणे यांनी सांगितले. राज्यातील खाण व्यवसाय अखंडीतपणे सुरू ठेवण्यासाठी ४० आमदारांचे शिष्टमंडळ दिल्लीला नेऊन केंद्र सरकारकडे प्रश्‍न मांडून तोंडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असून यासाठी योग्य कायदा तयार करण्याची गरज असल्याचे उपसभापती मायकल लोबो यांनी सांगितले.

खाण लिजांचे नव्याने नूतनीकरण केल्यास खाण व्यवसाय पूर्ववत होण्यासाठी जास्त कालावधी लागण्याची शक्यता आहे. यावर योग्य विचारविनिमय करून तोडगा काढण्याची गरज आहे, असे नीलेश काब्राल यांनी सांगितले. आमदार लुईझीन ङ्गालेरो, दीपक पाऊसकर, प्रसाद गावकर, ऍलेक्स रेजिनाल्ड, प्रवीण झांट्ये, राजेश पाटणेकर, ग्लेन टिकलो, मिलिंद नाईक, कार्लुस आल्मेदा, रवी नाईक, विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांनी चर्चेत सहभाग घेतला.

आझाद मैदानावर खाण अवलंबितांचे धरणे
आझाद मैदानावर राज्यातील खाण व्याप्त भागातील हजारो नागरिकांनी धरणे धरले. कायदेशीर मार्गाने खाण व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी उपाय योजना हाती घेण्याची ’ागणी केली. सरकारने खाण प्रश्‍नी तोडगा काढण्यास दुर्लक्ष केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी सभेत दिला आहे. भाजपचे आमदार नीलेश काब्राल, आमदार प्रवीण झांट्ये, विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर, आमदार प्रतापसिंह राणे, रवी नाईक व इतरांनी आझाद मैदानावर जमलेल्या या नागरिकांची भेट घेऊन चर्चा केली.