क्रोधावर नियंत्रण हवे

0
241
  • गौरी भालचंद्र

आपल्या मनासारखी एखादी गोष्ट झाली नाही किंवा आपल्याला एखादी गोष्ट पटली नाही की अगदी सहज राग येतो… अनेकदा कारण नसतानाही आपण रागाच्या भरात उलटसुलट बोलून मोकळे होत असतो… या सार्‍याचा परिणाम आपल्या कामावर आणि नात्यावरही होत असतो…

दीर्घ श्वास घेण्याची नेहमी प्रॅक्टिस केली तर तुमचा मनावर ताबा यायला सुरुवात होते. संताप आल्यावर जागच्या जागी जर तुम्ही दीर्घ श्वास घेतला तर तुमचे स्वतःवर नियंत्रण येते आणि तुम्हाला शांतपणे विचार करता येतो. एक सांगू… बर्‍याचदा माणसाचा अहंकारदेखील पटकन राग येण्यामागे कारणीभूत असतो. सतत चिडचिड करणं, एखाद्याचं ऐकून न घेता त्याला प्रतिक्रिया देणं, समोरच्या व्यक्तीला हवं तसं बोलणं ही वागणूक राग दर्शवते.

काही लोक पटकन रागावतात आणि लवकर शांतही होतात. यामुळे बोलण्यावर नियंत्रण राहत नाही. ज्याचा परिणाम शरीर आणि मनःस्वास्थ्यावर होऊ शकतो. शिवाय रागाच्या भरात अशी माणसं नको ते निर्णय घेतात. राग अनावर झाल्यामुळे माणसाची सारासार बुद्धी काम करेनाशी होते. यासाठी रागावर नियंत्रण मिळवणं गरजेचं आहे.

रागामुळे, मनात असलेल्या क्रोधामुळे चुकीचे शब्द निघून वादाला आमंत्रण मिळू शकते. त्याऐवजी शांत बुद्धीने थोड्या वेळानंतर सुसंवाद घडवून आणावा. कधी कधी रेल्वे, बस, ट्राफिक यामध्ये उशीर झाला की, लगेच आपल्याला राग येतो अशावेळी मन शांत ठेवण्याकरिता आपल्या मोबाईलमधील आवडीचे गाणे लावून मन प्रसन्न ठेवून रागावर नियंत्रण ठेवता येते आणि शारीरिक व मानसिक ताणतणाव रहित जीवन जगता येते.

आपल्या मनासारखी एखादी गोष्ट झाली नाही किंवा आपल्याला एखादी गोष्ट पटली नाही की अगदी सहज राग येतो… अनेकदा कारण नसतानाही आपण रागाच्या भरात उलटसुलट बोलून मोकळे होत असतो… या सार्‍याचा परिणाम आपल्या कामांवर आणि नात्यावरही होत असतो बर्‍याचदा …
एक सांगते खरोखर समोरच्या व्यक्तीला काहीही बोलण्याआधी एकदा विचार करा. जे तुम्ही बोलणार आहात ते ऐकून समोरच्या व्यक्तीवर काय परिणाम होतील? जे तुम्ही बोलणार आहात ते बरोबर आहे का? आणि जर बरोबर असले तरीही बोलताना कधीही मोठ्या आवाजात न बोलता नम्रतेने अदबीने बोलण्याचा प्रयत्न करायला हवा आपण… जसा जमेल तसा … .
ज्या गोष्टीवर राग आला आहे, त्याबद्दल विचार नका करू. त्या क्षणी तुम्हाला आनंद देणार्‍या गोष्टींचा विचार करा. मला माहीत आहे सांगणे सोपे असते.. पण प्रयत्न करणे पण कठीण नसते… ज्याच्यामुळे राग आला त्याला माफ करा आणि पुढे चला. कोणती गोष्ट मनामध्ये जास्त वेळ ठेवून त्याबद्दल विचार केला की ती गोष्ट आपल्याला पुढे जाऊ देत नाही. एक व्यक्ती रागानं बोलत असते, तेव्हा दुसर्‍यानं शांतपणे ऐकून घेतलं तर वाद टाळता येतो. तुम्ही कितीही चिडला असाल तरी प्रत्युत्तर देण्याचं टाळा.. वादात कोण जिंकलं यापेक्षा घरातील शांती टिकवणं महत्त्वाचं आहे.

कधी कधी नात्यासाठी आणि घरातील शांतता टिकवून ठेवण्यासाठी क्षमा मागणे कमीपणाचे नाही तर समजूतदारपणाचे लक्षण आहे आणि घरामध्ये शांती असणं हा तुमचा मुख्य उद्देश मानला तरच आपण रागावर नियंत्रण ठेवण्यात यशस्वी होऊ शकतो…
एकेकदा तर राग दुसर्‍यांवर काढल्यावर आपल्याला वाटते की आपण असे करायला नको होते. मात्र त्यावेळी आपण आपला राग दुसर्‍यांवर व्यक्त केलेला असतो. आपले मन तर शांत होते; पण आपण रागाच्या भरात ज्याला बोलतो, ज्याच्यावर राग काढतो त्यांच्या मनाचे काय? आणि कधी कधी समोरच्यानेही आपल्या मनाचा विचार करावा लागतो पण हे करायला त्याला सांगणे हे आपल्या हातात नसते. ते त्यालाच वाटावे लागते तो चुकला असेल तर… पण तसे बर्‍याचदा होत नसते म्हणून आपणच आपल्यावर संयम ठेवून वाद न होण्याकडे आपला कल ठेवून सावधगिरीने वागावे लागते .. त्यातच आपले हित असते
तुम्हाला कितीही राग आला असला तरी आवाज न चढवता आणि टोचून न बोलता प्रेमाने बोलण्याचा प्रयत्न करावा..