इच्छामरण

0
88
  • ज.अ.रेडकर
    (सांताक्रुझ)

  • महाभारतातील कथा या केवळ विरंगुळा आणि मनोरंजनासाठी रचलेल्या नाहीत, तर थोर ऋषीमुनींच्या सततच्या अध्ययनातून, निरीक्षणातून, अनुभवातून आणि तर्कसंगत विचारातून निर्माण झाल्या आहेत, म्हणूनच आजही आपल्याला त्या ताज्या वाटतात आणि अनुभवसुद्धा येतात.

महाभारतात अनेक अद्भुत कथा सांगितल्या आहेत. त्यांपैकी पितामह भीष्म यांची इच्छामरणाची कथा ही अशीच एक कथा होय. काळालाही थांबायला लावणारी ताकद पितामह भीष्मांमध्ये होती. कौरव-पांडवांच्या महायुद्धाच्या दहाव्या दिवशी पितामह भीष्म शिखंडीच्या बाणांनी घायाळ झाले तेव्हा सहस्त्ररश्मी सूर्याचा दक्षिणायनात प्रवेश होत होता आणि पितामह भीष्मांना उत्तरायणाच्या शुभ मुहूर्तावर मृत्यू हवा होता. परंतु सूर्याचे उत्तरायण होण्यासाठी तब्बल सहा महिने अवकाश होता. भीष्मांना इच्छामरणाचे वरदान लाभले होते त्यामुळे उत्तरायण होईपर्यंत ते शरशय्येवर पडून राहिले आणि नंतरच त्यांनी प्राण सोडला. या सर्वच गोष्टी आज आपणाला कपोलकल्पित वाटत असल्या तरी त्यात तथ्य नव्हतेच असे म्हणता येणार नाही. कारण अशा अद्भुत घटना आपल्या आजूबाजूला कुठे ना कुठे घडत असलेल्या आपण पाहतो आणि नंतर म्हणतो अरे खरेच की महाभारतात जे घडले ते सारे सत्यच होते तर!

महाभारतातील कथा या केवळ विरंगुळा आणि मनोरंजनासाठी रचलेल्या नाहीत, तर थोर ऋषीमुनींच्या सततच्या अध्ययनातून, निरीक्षणातून, अनुभवातून आणि तर्कसंगत विचारातून निर्माण झाल्या आहेत, म्हणूनच आजही आपल्याला त्या ताज्या वाटतात आणि अनुभवाला येतात. या कथा म्हणजे लोकशिक्षणाचा फार मोठा ठेवा आहे. ‘जिंगल बेल’, ‘ज्याक अँड जिल’ आणि ‘बा बा ब्लॅक शिप’ हेच म्हणजे खरे शिक्षण मानणार्‍या आजच्या पिढीला यात तथ्य वाटणार नाही पण प्राथमिक स्तरावर अभ्यासक्रमातून आणि अवांतर वाचनातून ज्यांनी या कथा अभ्यासल्या/वाचल्या असतील त्यांचे जीवन समृध्द तर झालेच पण इतरांचीही जीवने त्यांनी फुलवली.

भीष्मांच्या इच्छामरणाची आठवण होण्याचे कारण म्हणजे अलीकडेच गोवा शिक्षण खात्याचे निवृत्त साहाय्यक शिक्षण संचालक श्री. जयवंत श्रीनिवास नायक शिंक्रे यांचे झालेले निधन. शिक्षण खात्यात जे. एस. नायक म्हणून ते सर्वपरिचित होते. त्यांचे पूर्वज श्री क्षेत्र माशेल येथील देवभूमीचे महाजन. पोर्तुगीजांच्या छळाला त्रासून ज्या अनेक हिंदूंनी गोमंतभूमी सोडून अन्यत्र आसरा घेतला त्यांपैकीच नायक शिंक्रे हे एक घराणे होय. जयवंत नायक यांचा जन्म दक्षिण गोव्याच्या सीमावर्ती भागातील कारवार प्रांती १५ डिसेंबर १९३२ रोजी झाला. परिस्थितीशी झगडत मोठ्या जिद्दीने त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले आणि धारवाड येथील शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालयात हिंदीचे प्राध्यापक म्हणून ते रुजू झाले.

१९६१ साली गोवा पोर्तुगीज शासनातून मुक्त झाल्यावर भाऊसाहेब बांदोडकर या द्रष्ट्या नेत्याने शिक्षणाची गंगोत्री गावोगावी पोहोचवली. त्यासाठी महाराष्ट्र आणि कारवार भागातील अनेक होतकरू तरुण पुढे सरसावले. त्यांपैकी जे. एस. नायक हे एक होत. प्रारंभी ते पणजीच्या लायासिएम मध्ये ज्येष्ठ शिक्षक म्हणून रुजू झाले. त्यानंतर भाग शिक्षणाधिकारी, हायस्कूलचे मुख्याध्यापक, पर्वरी येथील शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य, विभागीय शिक्षण अधिकारी, सहाय्यक शिक्षण संचालक अशा उत्तरोत्तर वरच्या श्रेणीत त्यांनी इनामे इतबारे आपली सेवा बजावली. डिसेंबर १९९० मध्ये ते वयाच्या ५८ व्या वर्षी सन्मानाने निवृत्त झाले.

प्रथम दर्शनी उग्र व तापट वाटणारा हा माणूस मनाने अत्यंत हळवा, मिस्कील आणि संवेदनशील होता हे सांगूनही कुणाला खरे वाटणार नाही, पण ते खरे आहे हे मी स्वानुभवाने सांगू शकतो. एक गोष्ट खरी आहे की कोणत्याही चुकीला त्यांच्यापाशी क्षमा नव्हती. चुका करणार्‍यांना शिक्षा व्हायलाच पाहिजे या मताचे ते होते. त्याशिवाय कारभारात आणि मानवी जीवनात शिस्त येणार नाही असे ते म्हणत असत. त्यामुळेच कामात दिरंगाई, लबाडी, खोटेपणा करणार्‍यांची ते गय करीत नसत. कठोर शब्दांचा असा काही मारा करीत की बोलता सोय नाही. शाब्दिक मार कितीही दिला तरी लेखी मार कुणाला त्यांनी दिला नाही असे त्यांना जमदग्नी अशी उपाधी देणारे त्यांचे कनिष्ठही मान्य करीत. कारण सरकारी खात्यातील कित्येक वरिष्ठ अधिकारी स्वतःचा तोरा मिरवण्यासाठी कनिष्ठांना वार्षिक गोपनीय अहवालाची भीती दाखवून वेठीला धरतात, त्यांची कारकीर्द खराब करतात. कधी कधी स्वतः भ्रष्टाचार करून तो दोष कनिष्ठांच्या माथी मारून आपण नामा निराळे राहतात. श्री. नायक यांनी असला दांभिकपणा कधी केला नाही. नियमात बसेल ते काम चोखपणे आणि प्रामाणिकपणे केले. निष्कपट, निष्कलंक आणि शुद्ध चारित्र्य यामुळे त्यांच्या स्वभावात फटकळपणा आला होता. जो प्रामाणिकपणे काम करतो तोच सडेतोडपणे बोलू शकतो. त्यांचा फटकळपणा अशाच प्रकारचा होता. सत्यम् बृयात, प्रियं बृयात यांपैकी प्रियं बृयात त्यांना कधी जमले नाही कारण सत्य कटू असते हे त्यांना माहीत होते.

हिंदी आणि इंग्रजी भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील उत्तमोत्तम पुस्तके, नियतकालिके वर्तमानपत्रे यांचे सतत वाचन करून आपले ज्ञान अद्ययावत ठेवण्याकडे त्यांचा कल असायचा. शिक्षण खात्याशी त्यांनी केलेला पत्र व्यवहार म्हणजे नव्या पिढीच्या शिक्षण अधिकार्‍यांना मार्गदर्शक धडे देणारा होता. पण अशा गोष्टी कोण सांभाळून ठेवतो आणि कसले काय! सब घोडे बारा टक्के हा आजचा जमाना आहे!
ऑगस्ट २००७ मध्ये त्यांच्या सुविद्य पत्नीचे अल्प आजाराने निधन झाले आणि त्यांच्या जीवनात एक प्रकारची विरक्ती आली. देवपूजा, धार्मिक ग्रंथांचे वाचन, मंत्र पठण यातच ते बहुतांश वेळ घालवू लागले. वयोमानानुसार त्यांची गात्रे शिथिल झाली पण आजारी होऊन इस्पितळात भरती व्हावे लागले नाही किंवा घरी अंथरुणात पडून राहावे लागले नाही. भेटीला येणार्‍या प्रत्येका पाशी एकच बोलणे असायचे की, आता खूप झाले. देवकी-कृष्णाने आपणाला शांतपणे, यातनामुक्त मृत्यू द्यावा. आपणामुळे कुणाला त्रास होऊ नये. आपले आजारपण कुणाला काढू लागू नये. इच्छा तैसे फळ असे साधू संत सांगून गेलेत ! अगदी तसेच झाले आणि जे.एस. नायक यांनी अगदी शांतपणे ८ डिसेंबर २०१२ रोजी वयाच्या ८० व्या वर्षी दुपारची वामकुक्षी घेत असताना शेवटचा श्वास घेतला. ना कुणाला व्याप, ना कुणाला ताप ना तसदी! इच्छा मरण म्हणतात ते हेच तर नव्हे?