करमळीत रेल्वेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू

0
155

धावजी ओल्ड गोवा करमळी येथे रेल्वेचा धक्का बसल्याने नौदल अधिकारी राहुल कुमार यांचा मृत्यू झाला असून रेल्वेच्या धक्क्यामुळे मांडवी नदीत पडलेल्या त्यांच्या मैत्रिणीचे बुडून निधन झाले. ही घटना शनिवारी रात्री १२.३० च्या सुमारास घडली.

नौदल अधिकारी राहुल कुमार (२८, हजारीबाग, रांची) हे कोलकात्याहूaन आलेला मित्र भास्कर घोष आणि त्यांची मैत्रिण मॉमी गांगुली यांच्यासमवेत धावजी करमळी येथील रेल्वे पुलावर फिरायला गेले होते. राहुल कुमार यांनी धावजी येथे रेल्वे पुलावर जाण्यापूर्वी पणजीतील राजभवन, चर्च व इतर पर्यटन स्थळांना भेट दिली होती. करमळी येथून मडगावच्या दिशेने जाणार्‍या एका रेल्वे गाडीचा दोघांना धक्का बसल्याने राहुल कुमार रेल्वे रुळावर कोसळला. तर, त्यांची मैत्रीण मॉमी गांगुली मांडवी नदीत कोसळली. भास्कर हा रेल्वे रुळाच्या दुसर्‍या बाजूला उभा होता. नौदलाच्या हेलिकॉप्टरच्या साहाय्याने मांडवी नदीत पडलेल्या गांगुली हिचा शोध घेण्यात आला. मांडवी नदीतून मॉमी हिचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. राहुल कुमार याच्या मृत्यूप्रकरणी कोकण रेल्वे पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे. तर, मॉमी गांगुली हिच्या मृत्यूप्रकरणी ओल्ड गोवा पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे.