‘कोरोना’साठी आरोग्य विमा

0
125
–  शशांक मो. गुळगुळे
प्रत्येक विमा कंपनीला ‘कोरोना कवच’ नावाची फक्त कोरोनाच्या आजारापासून संरक्षण देणारी पॉलिसी कार्यान्वित करण्याच्या सूचना नियंत्रक यंत्रणेने दिल्या असून, कोरोना कवच पॉलिसी आता कार्यरत झाली आहे.
‘कोरोना’चा विषाणू भारतात नव्यानेच गेल्या मार्चपासून आला, त्यामुळे आरोग्य विमा पॉलिसित या अनपेक्षितपणे आलेल्या आजाराचा समावेश नव्हता. पण या महाभयंकर रोगाचे स्वरूप पाहून विमा कंपन्यांच्या नियंत्रक असलेल्या यंत्रणेने म्हणजे इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटी या यंत्रणेने विमा कंपन्यांना सूचना दिल्या की, आरोग्य विमा पॉलिसीत हा आजार समाविष्ट नसला तरी हा आजार झालेल्यांना कोरोनाचे विमा संरक्षण द्या व त्यांचे दावे कमीत कमी वेळात संमत करा. प्रत्येक विमा कंपनीला ‘कोरोना कवच’ नावाची फक्त कोरोनाच्या आजारापासून संरक्षण देणारी पॉलिसी कार्यान्वित करण्याच्या सूचना नियंत्रक यंत्रणेने दिल्या असून, कोरोना कवच पॉलिसी आता कार्यरत झाली आहे.
कोरोना रुग्णाला खाजगी हॉस्पिटले प्रचंड बिल आकारतात, त्यामुळे विमा संरक्षण असणे गरजेचे झाले आहे. या नव्या पॉलिसीत पीपीई (पर्सनल प्रोटॅक्टिव्ह इक्विप्मेंट)- हातमोजे, मास्क व अशा प्रकारच्या अन्य वस्तू यांचाही खर्च कोरोना कवच या नव्या पॉलिसीत मिळतो. या अगोदर हा खर्च मिळत नव्हता.
१८ ते ६५ वयाच्या व्यक्ती ही पॉलिसी उतरवू शकतात. तीन महिन्यांपासून ते २५ वर्षांपर्यंतच्या पाल्याचाही पालकांना विमा उतरविता येतो. कुटुंबासाठी एका ठराविक रकमेची पॉलिसीही उतरविता येते. या उतरविलेल्या रकमेपर्यंत कुटुंबातल्या कोणालाही खर्च संमत होऊ शकतो. या पॉलिसीचा कालावधी साडेतीन, साडेसहा आणि साडेनऊ महिने इतका आहे. पॉलिसी घेतलेल्या दिवसापासून पहिले १५ दिवस विम्याचा दावा संमत केला जात नाही. हा विमा किमान ५० हजार रुपयांचा उतरवावा लागतो व याहून जास्त रकमेचा उतरवायचा असेल तर तो रु. ५० हजाराच्या पटीतच उतरावा लागतो. कमाल ५ लाख रुपयांपर्यंत हा विमा उतरविता येतो. कोरोनाची पॉलिसी घेणार्‍याला जर अगोदरपासून मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, फुफ्फुसात गाठी तसेच कर्करोग असे काही गंभीर स्वरूपाचे आजार असले तर सार्वजनिक उद्योगातील न्यू इंडिया ऍश्युरन्स कंपनी ३० टक्के प्रिमियम जास्त आकारते. इतर आरोग्य विमा पॉलिसींमध्ये उतरविलेल्या रकमेच्या १ टक्का रक्कम कमाल हॉस्पिटलचे खोलीभाडे म्हणून संमत असेल. हॉस्पिटलचे खोलीभाडे जर कमाल संमत होणार्‍या भाड्याहून जास्त असेल तर ते पॉलिसीधारकाला भरावे लागते. कोरोना कवच पॉलिसीत हॉस्पिटलच्या खोलीभाड्यावर काहीही मर्यादा ठेवलेली नाही.
कोरोना कवच पॉलिसीत रुग्णाला एकूण पंधरा दिवस विमा उतरविलेल्या रकमेच्या ०.५ टक्के इतकी रोख रक्कम दररोज देण्याचा पर्यायही उपलब्ध आहे. रुग्णाची सरकारमान्य चाचणी केंद्रातून कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली की रुग्णाला या पॉलिसीतून खर्च मिळायला सुरुवात होऊ शकते. कोरोनाचा प्रार्दुभाव सौम्य असेल व रुग्णाला घरीच विलिगीकरण करून उपचार देण्यात येत असतील तर या उपचाराचा दावाही संमत केला जातो.
फ्युचर जेनेरली इंडिया इन्शुरन्स कंपनी, सार्वजनिक उद्योगातील ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी व युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी यांचा प्रिमियम कमी आहे, तर गो डिजिट जनरल इन्शुरन्स, स्टार हेल्प ऍण्ड अलाईड इन्शुरन्स या कंपन्या जास्त प्रिमियम आकारतात.
विविध कंपन्यांचे प्रिमियम दर पुढीलप्रमाणे-
वेगवेगळ्या कंपन्यांच्या प्रिमियमच्या दरात बराच फरक आहे. ग्राहकांनी सार्वजनिक उद्योगातील कंपन्यांना प्राधान्य द्यावे.
आरोग्याची काळजी घेणारे जे कर्मचारी आहेत त्यांना प्रिमियममध्ये ५ टक्के सवलत द्यावी अशा सूचना विमा उद्योग नियंत्रण यंत्रणेने दिल्या आहेत. काही कंपन्या कुटुंबाचा विमा उतरविल्यास तसेच ऑनलाईन विमा उतरविल्यास काही सवलत देतात.
वरिष्ठ नागरिकांना प्रिमियम चढ्या दराने आकारला जातो. कारण यांचा विमा उतरविणे म्हणजे विमा कंपन्यांना जोखीम असते. ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी वरिष्ठ नागरिकांना साडेनऊ महिन्यांच्या कालावधीसाठी ३ लाख रुपयांच्या विम्यासाठी १८६४ रुपये अधिक कर असा प्रिमियम आकारते. फ्यूचर जेनेरेली रुपये २५४२ अधिक कर, गो डिजिट २६ हजार १९५ अधिक कर असे प्रिमियम आकारतात. केंद्र शासनाच्या आरोग्य संजीवनी पॉलिसीपेक्षा कोरोना कवच विमा पॉलिसीला जास्त प्रिमियम भरावा लागतो. कोरोना रुग्णाना देण्यात येणारी औषधे महाग असल्यामुळे कंपन्यांना प्रिमियम जास्त घ्यावा लागतो. कोरोना कवच पॉलिसीची कमाल मर्यादा जी ५ लाख रुपये निश्‍चित करण्यात आली आहे ती फार कमी आहे. कारण कित्येक खाजगी रुग्णालये कोरोना रुग्णाचे बिल १० लाख रुपयांहून अधिकही करतात. त्यामुळे रुग्णाला ५ लाख रुपयांच्या वरची सर्व रक्कम स्वतःच्या खिशातून भरावी लागते. मुंबईतील अंधेरी येथे एका कोरोना रुग्णाला दाखल केले. तो दाखल केल्यानंतर २ तासात वारला. त्याचा मृतदेह नातलगांना देण्यापूर्वी या हॉस्पिटलने ५८ हजार रुपये बिल वसूल केले. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने व आर्थिकदृष्टीनेही कोरोना कवच विमा सद्यस्थितीत तरी उतरवावा. काही विमा कंपन्या रुग्णांनी पॉलिसी उतरवू नयेत म्हणून प्रिमियमची रक्कम फार जास्त ठेवतात. कारण यात दावे दाखल होण्याचे व ते संमत करण्याचे प्रमाण फार मोठे असते व या पॉलिसीतून कंपन्यांना फायदा होण्याची शक्यताही नाही. रुग्ण एवढ्या प्रचंड प्रमाणात कोरोनामुळे मृत्युमुखी पडत असतात.
विमा कंपन्यांनी फायद्याचा विचार करू नये. साडेतीन महिन्यांच्या पॉलिसींचा प्रिमियम दर साडेनऊ महिन्यांच्या पॉलिसींच्या प्रिमियम दरापेक्षा जास्त आहे. कारण विमा कंपन्यांना असे वाटते की, कोरोनाची साथ साडेनऊ महिन्यांपर्यंत आटोक्यात येईल. या अपेक्षेने या कालावधीसाठी कमी दराने प्रिमियम आकारला जातो.
जर तुमची नेहमीची आरोग्य विमा पॉलिसी १० लाख रुपयांची असेल तर तुम्ही कोरोना कवच नाही घेतले तरी चालेल. पण जर तुमची नेहमीची आरोग्य विमा पॉलिसी कमी रकमेची असेल तर कोरोना कवच संरक्षण नक्कीच घ्यावे. सुदैवाने तुम्हाला कोरोना झाला नाही तर भरलेल्या प्रिमियम रक्मेवर आयकरात सवलत नक्कीच मिळेल हा फायदा आहेच!
विम्याची रक्कम ३ लाख रुपये
वयोगट- ३१ ते ३५ वर्षे ६१ ते ६५ वर्षे
पॉलिसीचा कालावधी साडेतीन महिने साडेनऊ महिने साडेतीन महिने साडेनऊ महिने
१) बजाज इलायन्स जनरल ६४८ १०८० २७६० ४७०
२) फ्युचर जेनेरली ४३६ ६६४ १६७८ २५५२
३) गो डिजिट जनरल ४२५५ ८०८५ १७०२७ २६१९५
४) इफ्को टोकिओ जनरल ८६१ २०१५ १५२९ ३५७९
५) नॅशनल इन्शुरन्स ९५५ १६७० २८७५ ५०३५
६) न्यू इंडिया ऍश्यूरन्स ९६८ १०७५ ६७७२ ७५२४
७) ओरिएन्टल ४६१ ९३२ ९२३ १८६४
८) रहेजा क्युबीई जनरल ७७५ १३७५ २००० ३६००
९) स्टार हेल्थ ऍण्ड अलाईड २६९१ ३६३३ ३७८७ ५०८६
१०) युनायडेट इंडिया ४६४ ११९२ २०३० ५८९०