किशोरवयीन मुलांची शारीरिक तंदुरुस्ती

0
455
  • डॉ. सुषमा किर्तनी
    (बाल, नवजात व तरुण रोगतज्ज्ञ)

६ ते १७ वयोगटातील मुलामुलींनी दररोज एक तास मध्यम ते जोरदार शारीरिक कसरत करणे गरजेचे आहे. त्यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यांचे आरोग्य उत्तम राहते, हाडे आणि स्नायू मजबूत बनतात, ताण आणि चिंता कमी होते.

शारीरिक स्वास्थ्य हे सगळ्यांसाठीच महत्त्वाचे. पण हल्ली किशोरवयीन मुले व तरुण हे आपल्या शरीराची काळजी घेताना दिसत नाहीत. ११ ते १८ वर्षे वयोगटातील कितीतरी मुलं लठ्ठ व स्थूल झालेली आपण पाहतो. सर्वसाधारण १० वर्षांचा मुलगा जो ३२ किलो असायला पाहिजे तो आता ६० किलो वजनाचा आहे, हे दवाखान्यात आमच्या निदर्शनास येतं.

शारीरिक स्वास्थ्य व मानसिक स्वास्थ्य हे प्रत्येकाच्या आयुष्यातले सगळ्यात महत्त्वाचे पैलू. दोघांपैकी एकच चांगलं असेल तर आपलं आयुष्य काही नीट चालू शकत नाही. त्यामुळे शरीर सुदृढ राहण्यासाठी नियमित व्यायामाची आवश्यकता आहे. किशोर वयातली मुलं तसेच तरुण मुलं-मुली दोघांनाही शारीरिक कसरत खूपच फायदेशीर ठरते. यामुळे होणारे लाभ – १) आपली हाडं, स्नायू आणि सांधे निरोगी होतात. २) व्यायामाने आपले वजन व चरबी उतरते. ३) रक्तदाब कमी होतो व त्यामुळे आपली प्रकृती चांगली राहते.
किशोर वयातील मुलांना शारीरिक व्यायामाने खूप स्फूर्ती मिळते. कुठल्याही मानसिक कार्यामध्ये त्यांचा फोकस (लक्ष्य) वाढतो. त्यांचा जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. त्याचप्रमाणे हृदयरोग, मधुमेह, कर्करोग आणि अनेक आरोग्याच्या समस्या त्यांना ग्रासू शकत नाही.
किशोरवयीन मुलांना क्रियाशील आणि शक्तीवर्धक व्यायाम करणे आवश्यक असते. यामध्ये पेशी व हाडांची बळकटी वाढवण्याचे व्यायाम, वजनाचे व्यायाम यामुळे स्नायुंमधील शक्ती वाढते आणि त्यामुळे खेळताना होणार्‍या जखमांपासून बचाव होतो.

किशोरवयीन मुलांना कुठलाही खेळप्रकार खेळल्याने खूप फायदे होतात, जसे स्केटबोर्ड, फूटबॉल, योगाभ्यास, पोहणे, नृत्यप्रकार. त्यांना मध्यम ते तीव्र प्रकारच्या शारीरिक व्यायामाची गरज असते, तसेच तो नियमितपणे केला पाहिजे. ऍरोबिक व्यायाम ज्यामध्ये धावणे, पोहणे, नृत्यप्रकार- झुंबा/बॉलिवुड नृत्य सांगितले जाते.
यांच्या पाठीमागे लागणे, त्यांना व्यायाम करण्यास उद्युक्त करण्याचे काम हे शिक्षकांच्या व पालकांच्या हाती आहे. आईवडलांनी लहानपणीच शारीरिक शिक्षणाचा धडा गिरवला तरच ते फायद्याचे ठरते. मुलांना शारीरिक शिक्षणाची संधी द्या. मार्गदर्शन करा. ती मुलं एकदा का तिकडे वळली की मग त्यांच्यातील कार्यक्षमता वाढून ते खूप दणकट होतील. त्यामुळे पुढे जाऊन स्वतःच आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारतील.
मुलांना आपण सतत मार्गदर्शन करत राहिले पाहिजे. त्यांच्या चुका न काढता, त्यांनी काय केलं म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक ठरेल हे त्यांच्या लक्षात आणून देण्याचे काम पालक व शिक्षक करू शकतात. मुलांना क्लास लावणे, त्यांना क्लासला वेळेवर पोचवणे, त्यांना लागतील तितकी व शक्य होईल तशी उपकरणे घेऊन देणे, क्लबमध्ये त्यांचे नाव नोंदवणे व त्यांच्या मित्रवर्गात शारीरिक क्रियातंत्रांची संधी उपलब्ध करून देणे हे आईवडलांचे कर्तव्यच आहे.

जर एखादा मुलगा किंवा मुलगी स्थूल किंवा लठ्ठ होऊन खूपच सुस्त असेल तर आपण पहिलेप्रथम तिच्यासाठी फॅमिली डॉक्टरचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे. नंतर शारीरिक व्यायाम सावकाशपणे सुरू करणे आवश्यक ठरते. तसेच जुनाट आजार असणार्‍या किंवा विकलांग तरुणांनाही व्यायामाची गरज असतेच. त्यांनाही या गटामध्ये सामील करणं आवश्यक आहे. तसेच व्यायामानंतर दुखत असेल किंवा करताना दुखत असेल तरीही डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
किशोरवयीन मुले शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्यांचा अभ्यास, आत्मविश्‍वास आणि लठ्ठपणा किंवा जुनाट आजार या सगळ्यावर नियंत्रण राहते.
अमेरिकन अकादमीच्या मार्गदर्शनानुसार किशोरवयीन मुलं जे ६ ते १७ वयोगटातील आहेत त्यांनी दररोज एक तास मध्यम ते जोरदार शारीरिक कसरत करणे गरजेचे आहे. त्यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यांचे आरोग्य उत्तम राहते, हाडे आणि स्नायू मजबूत बनतात, ताण आणि चिंता कमी होते. तसेच जुनाट रोग जसे टाईप-२ मधुमेह, हृदयविकार, उच्चरक्तचाप, लठ्ठपणा, कर्करोग व हाडे ठिसूळ होण्याचा आजार म्हणजेच ऑस्टिओपोरोसिस यांचे प्रमाण कमी होते.

याउलट व्यायामाच्या अभावामुळे मुलांमधील शक्ती असंतुलित होते व त्यामुळे वजन वाढणे व स्थूलपणाचा धोका असतो. कोलेस्टेरॉल व ट्रायग्लिसराइड्‌स, इन्स्युलीन रेझिस्टन्स, ग्लुकोज इनटॉलरन्स यांचे प्रमाण वाढते. म्हणून शाळेत शारीरिक शिक्षणावर जास्त भर द्यायला हवा. व्यापक शालेय शारीरिक शिक्षण कार्यक्रम प्रत्येक शाळेत घेतले गेले पाहिजेत. जी मुले शारीरिकदृष्ट्या कार्यक्षम असतात त्यांची शाळेतील उपस्थिती, क्रीडाप्रकारातील चुणूक व मानसिक एकाग्रता खूपच जास्त असते. त्यांच्यामध्ये उच्च प्रतीच्या आकलन क्षमता असतात.
त्यामुळे पालकांनी व शिक्षकांनी जास्तीत जास्त मुलांना प्रोत्साहित करणे महत्त्वाचे ठरते.