॥ बायोस्कोप ॥ रिटर्न गिफ्ट

0
249
  • प्रा. रमेश सप्रे

मानवाला परमेश्वरानं (किंवा निसर्गानं) अनेक गिफ्टस् देऊन तयार केलंय. विशेषतः आपला मेंदू – बुद्धी नि बुद्धीच्या अगणित शक्ती. याशिवाय आणखी एक सुंदर गिफ्ट दिलीय. प्रेझेंट म्हणू या! अहो, प्रेझेंट (वर्तमानकाळ) हेच खरं प्रेझेंट नाही का?

सध्याच्या युगाला ‘विज्ञापन युग’ म्हणतात. समजलं नाही ना? म्हणजेच ‘ऍड एज्’ म्हणतात. म्हणजेच जाहिरातीचं (ऍडव्हर्टाइझमेंट) युग म्हणतात. फार पूर्वीपासून जाहिरात करण्याच्या कलेला ‘पासष्टावी कला’ म्हणतात. आधीच्या चौसष्ट कला कोणत्या याची माहिती गुगल काकांना (गुगल् अंकलना) विचारा. सध्या तरी तेच सर्वज्ञ आहेत. असो.
काही सेकंदात आपल्या वस्तूचे असलेले नसलेले (बहुधा नसलेलेच) सारे गुण वाचणार्‍या – पाहणार्‍या – ऐकणार्‍यांच्या डोळ्यातून गळ्यात उतरवण्याचं अजब कौशल्य जाहिरातींमध्ये असतं. घरातली रांगणारी पोरंटोरंसुद्धा स्तब्ध होऊन एकचित्तानं जाहिरातींकडे पाहत राहतात. असो.

आपला विषय जाहिरात नाहीये तर ‘रिटर्न गिफ्ट’ आहे. याच संदर्भात कल्पकतेला सलाम करावी अशी सध्या दाखवली जाणारी एक जाहिरात. दोन आमंत्रित दोन मोठ्या वेगवेगळ्या रंगांच्या पाण्याच्या प्लास्टिकच्या मोठ्ठ्या टाक्या स्वतः उचलून आणत वधुवरांसमोर ठेवतात. आमंत्रण नव्हे, निमंत्रण पत्रिकेत शेवटी सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती असते, ‘कृपया अहेर नि पुष्पगुच्छ आणू नयेत. आपले आशीर्वाद हाच अहेर’ हे आता नेहमीचं (रुटीन) झालंय. पण काही वर्षांपासून जेव्हा हे लिहिण्याची प्रथा सुरू झाली तेव्हा अनेकजण निमंत्रण पत्रिका खालून वाचायला सुरुवात करायचे. (जसे अनेक मध्यमवर्गीय) अजूनतरी हॉटेलमधलं मेनू कार्ड उजवीकडून (म्हणजे किंमतींकडून) वाचतात. (उर्दूसारखं.) ‘आशीर्वाद’ शब्द वाचूनच लग्नाला निश्‍चित जायचं असं ठरवणारी अनेक मंडळी असत. याच मनोवृत्तीवर आधारित अशी ही मार्मिक जाहिरात आहे.

वधूवरांसमोर ठेवलेल्या त्या अवाढव्‌य पाण्याच्या टाक्यांपासून ठेवणारे दूर झाल्यावर टाक्यांवरील शब्द दिसतात – आशीर्वाद! बरोबर आशीर्वाद नावाच्या टाक्यांची ही जाहिरात आहे. ‘आमचे आशीर्वाद हवेत ना? घ्या!’ आहे ना कल्पकता? असो. अहेराला इंग्रजीत (म्हणजे आजच्या मराठीत) शब्द आहे प्रेझेंट किंवा गिफ्ट. तर आता अहेर घेत नाहीत पण ‘रिटर्न गिफ्ट’ देतात. याला काय म्हणायचं?
एका निवासी वसाहतीत घडलेली हकीगत. फिरून झाल्यावर गप्पांचे कट्टे (पूर्वीचे फड) रंगवणार्‍या ज्येष्ठ नागरिकांच्या चर्चेत हा विषय आला. त्यातून असं ठरलं की ‘गिफ्ट’ नाही तर ‘रिटर्न गिफ्ट’ही नाही. लग्नाचा मोसम होता. म्हणजे सीझन! लग्नं झाल्यावर ज्यावेळी वधूकडची किंवा वरांकडची मंडळी लाडू नि रिटर्न गिफ्ट घेऊन घरोघरी जाऊ लागली तेव्हा त्यांना अनेक ठिकाणी एकच प्रतिसाद मिळू लागला, ‘अभिनंदन! लग्नाचा लाडू ठेवून घेतो पण रिटर्न गिफ्ट मात्र नको. कारण आम्ही मुळात गिफ्टच कुठं दिलीय.’
वसाहतीतील लोकप्रिय राजूबाब नि संजूबाब (अनु. वधु, वर यांचे पिताश्री) यांच्यापुढे एक नवी समस्या उभी राहिली. ‘रिटर्न’ केलेल्या शे-पाचशे डब्यांचं काय करायचं? दुकानदार काही रिटर्न डबे घेणार नाही. त्यांनी काय केलं हा प्रश्‍न महत्त्वाचा नाही.

ही रिटर्न गिफ्टची कल्पना आजची नाही. अगदी रामायणकाळापासूनची आहे. फक्त त्यावेळी त्याला प्रत्युपहार म्हणत असत. कारण गिफ्टना म्हणत ‘उपहार.’ प्रसंग आहे रामराज्याभिषेकानंतरचा. उपस्थित आमंत्रितांनी अनेक मौल्यवान उपहार दिले. त्यांना त्याचवेळी श्रीराम-सीतेकडून प्रत्युपहारही दिले गेले. सर्वांची ही प्रेमाची देव-घेव संपल्यावर सीतेच्या लक्षात आलं की हनुमान तसाच उभा आहे. त्याला काहीच दिलेलं नाही. ती रामाला म्हणते, ‘हनुमानाला काहीतरी द्यायला नको का?’ यावर राम उद्गारतो ‘काय द्यायचं? त्याचं आपल्यावरचं ऋणच एवढं मोठं आहे की काहीही दिलं तरी ते अपुरच ठरणार.’ शेवटी श्रीरामानं हनुमंताला बोलवून प्रेमानं दीर्घ आलिंगन दिलं नि वरदान दिलं चिरंजीवित्वाचं.
महाभारतात पांडवांच्या ‘राजसूय’ यज्ञात राजेमंडळींनी दिलेले उपहार नि त्यांना दिले गेलेले प्रत्युपहार पाहूनच यज्ञाचा कोषाध्यक्ष दुर्योधन नि मामा शकुनी यांचे डोळे दिपून गेले होते. राजसूय यज्ञात यामुळे त्यांच्या मनात अंकुरली असूया.. तिचा प्रवास सूड नि युद्धाकडे सुरू झाला.
तर रिटर्न गिफ्टला असा मोठा इतिहास आहे. पण सध्याची केवळ औपचारिकता मात्र अस्वस्थ करणारी आहे. एक गंमतीदार प्रसंग पहा.

एक मोठ्या शहरातून आलेला सधन कुटुंबातील छोटा मुलगा. पहिली दुसरीतला. आजोबांकडे सुटीत आला होता. आजुबाजूच्या मुलांचा दोस्त बनला. एका मित्राकडे त्याच्या वाढदिवसाला गेला. सारा समारंभ झाला. आलेली मुलं परत गेली. हा मात्र रेंगाळून पुन्हा पुन्हा विचारू लागला, ‘मी जाऊ? जाऊ मी?’ मित्राच्या घरच्यांना आश्‍चर्य वाटलं त्याच्या पुन्हा पुन्हा विचारण्याचं. त्यांना वाटलं रात्र झाली म्हणून हा एकटा जायला घाबरत असेल. म्हणून मित्र नि त्याची आई त्याला घरी पोचवायला आले. त्यांनी सांगितलं हा पुन्हा पुन्हा ‘मी जाऊ?’ असं विचारत होता. कारण विचारल्यावर तो आपल्या आईला म्हणाला, ‘त्यांनी रिटर्न गिफ्ट कुठं दिली? ते विसरले असतील म्हणून मी तसं म्हणत होतो’. यावर सगळेजण मनापासून हसले. असो.

मानवाला परमेश्वरानं (किंवा निसर्गानं) अनेक गिफ्टस् देऊन तयार केलंय. विशेषतः आपला मेंदू – बुद्धी नि बुद्धीच्या अगणित शक्ती. याशिवाय आणखी एक सुंदर गिफ्ट दिलीय. प्रेझेंट म्हणू या! अहो, प्रेझेंट (वर्तमानकाळ) हेच खरं प्रेझेंट नाही का? हा व्याकराणतला प्रेझेंट टेन्स नाही, तर प्रेझेंट टाइम. आजचा दिवस किंवा खरं तर चालू क्षण. आपल्या आनंदाचं निधान, शांतीची संधी चालू क्षणच नाही का?’ ‘मी उद्या आनंदात राहीन किंवा काल आपण किती आनंदात होतो…’ अशा शब्दांना काही अर्थ नाही. कारण आपण सारे मरेपर्यंत जिवंत असतो ते अखंड वर्तमानातच! हे आपल्याला मानव म्हणून मिळालेलं प्रेझेंट (गिफ्ट) आपण आकर्षकतेनं सार्थकतेनं सजवून परत करायला नको का? ही खरी ‘रिटर्न गिफ्ट.’ हाच संदेश केशवसुतांनी दिला नाही का?- ‘प्राप्तकाल (वर्तमानकाल) हा विशाल भूधर, सुंदर लेणी तयात खोदा, निजनामे त्यावरती नोंदा.’ सर्वांसाठी काहीतरी चांगलं ‘आज करे सो अब’ करून त्या परमेश्वरी.. कल्याणकारी शक्तीला अर्पण करुया. करत राहू या.