‘घर वापसी’ संबंधी पर्रीकरांच्या वक्तव्यावर कॉंग्रेस-राष्ट्रवादीची टीका

0
102

पणजीत मंगळवारी झालेल्या भाजपच्या प्रचार सभेतून संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी ‘घरवापसी’ संबंधी जे विधान केले होते त्या संदर्भात काल कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने त्यांच्यावर जोरदार टीका केली.यासंबंधी बोलताना कॉंग्रेसचे प्रवक्ते सुनील कवठणकर व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते ट्रोजन डिमेलो म्हणाले की, ज्या अर्थी पर्रीकर हे गोव्यात घरवापसीचे कार्य हाती घेतले जाणार नाही असे ते म्हणाले. त्याअर्थी अन्य राज्यात हे काम चालू आहे हे ते मान्य करतात असा त्याचा अर्थ होतो. मनोहर पर्रीकर हे संपूर्ण देशाचे संरक्षण मंत्री असून त्यांनी कोणतेही निवेदन करताना संपूर्ण देशासाठी करायला हवे, असे कवठणकर म्हणाले. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते ट्रोजन डिमेलो म्हणाले, अन्य सर्व ठिकाणी घरवापसीचे काम चालू राहिले तर ते लोण गोव्यात पसरण्यास उशिर लागणार नाही. अशा प्रकारच्या धर्मांधतेमुळेच नवी दिल्लीत झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला दारुण पराभवाला सामोरे जावे लागल्याचे वरील दोन्ही नेते म्हणाले.
ते पर्रीकरांचेच नाटक
गोवन कॅथोलिक वेल्फेअर युनियनचे सदस्य जुईनो डिसोझा व डॉ. सुफीन मोंतेरो यांच्या शिष्टमंडळाने संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांची घरवापसी प्रकरणी जी भेट घेतली व नंतर त्यासंबंधी जो खुलासा करण्यात आला ते पर्रीकर यांनीच रचलेले एक नाटक होते, असा आरोपही यावेळी डिमेलो यांनी केला. गोवा गुंतवणूक धोरण अजून अधिसूचित का केले जात नाही, असा सवालही यावेळी डिमेलो यांनी केला.