एकच पर्याय

0
128

काश्मीर खोर्‍यातील परिस्थिती दिवसेंदिवस हाताबाहेर जाऊ लागली आहे. कमकुवत राज्य सरकार, हतबल पोलीस आणि बचावात्मक भूमिका घेणे भाग पडलेले लष्कर यामुळे दहशतवाद्यांचे आणि फुटिरतावाद्यांचे मनोबल उंचावलेले दिसते आहे. गेले काही दिवस काश्मीरमध्ये बँका आणि एटीएममधून पैसा आणि पोलीस स्थानकांतून शस्त्रास्त्रे लुटण्याचे जणू पेव फुटले आहे. गेल्या सात महिन्यांमध्ये दहशतवाद्यांनी काश्मीरमध्ये किमान तेरा वेळा बँका आणि एटीएम लुटून जवळजवळ एक कोटीहून अधिक रक्कम पळवली आहे. शाळा जाळायच्या, पोलिसांच्या घरांवर आणि पोलीस स्थानकांवर हल्ले चढवायचे आणि आता बँका लुटायच्या या कारस्थानात स्थानिक युवकांनाही सामील करून घेण्यात तेथील देशद्रोही शक्तींना दुर्दैवाने यश आल्याचे दिसते. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांना एकीकडे दहशतवाद्यांशी सामना करावा लागतो आणि दुसरीकडे स्थानिकांशी. प्रत्येक कारवाईला असे दुहेरी संघर्षाचे रूप येत असल्याने त्याचा फायदा अर्थातच दहशतवाद्यांना मिळत आला आहे. या पार्श्वभूमीवर काल दक्षिण काश्मीरमधील शोपियानमध्ये जवळजवळ वीस गावांची घेराबंदी करून जी धडक कारवाई करण्यात आली, ते आजच्या परिस्थितीत एक अत्यावश्यक पाऊल म्हणावे लागेल. याच शोपियानमधील एका सफरचंदांच्या बागेत सशस्त्र दहशतवादी मोकळे फिरत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड झाला आहे. खरे तर काश्मीर खोर्‍यात इंटरनेटवर बंदी आहे. पण तरीही हा व्हिडिओ अपलोड केला गेला याचा अर्थ दहशतवाद्यांपाशी इंटरनेट बंदीतून पळवाट काढणारी अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त साधने आहेत. नोटबंदीनंतर त्यांना पैशाची चणचण भासते आहे हे तर दिसतेच आहे. त्यामुळेच बँका लुटण्याचे सत्र चालले आहे. या पैशाच्या बळावर आणि पोलिसांकडून लुटलेल्या शस्त्रास्त्रांद्वारे स्थानिक तरुणांना सामील करून घेण्याचा हा डाव आहे. हिज्बुल मुजाहिद्दीनचा एक म्होरक्या आणि बुरहान वानीचा साथीदार झाकीर राशीद भट याने एका व्हिडिओ संदेशात काश्मिरी तरुणांना हाच संदेश दिलेला होता. त्यातूनच पुलवामा, कुलगाम, अनंतनाग, शोपियानमध्ये लुटालुटीचे सत्र सुरू झाले. अनंतनागची पोटनिवडणूक नुकतीच रद्द करणे निवडणूक आयोगाला भाग पडले, याचा अर्थ तेथील परिस्थिती आता नियंत्रणापलीकडे गेलेली आहे. मागील निवडणुकीवेळची स्थिती आणि आजची स्थिती यामध्ये एवढे महद्ंतर का पडले हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. जनतेमध्ये विश्वास निर्माण करण्यातील राज्य सरकारचे अपयश त्यामुळे ठळकपणे नजरेत भरते. पाकिस्तान हे धगधगत्या काश्मीरला भारतद्वेषाची रसद पुरवणारे केंद्र आहे. त्यामुळे काश्मीर शांत करायचे असेल तर आधी पाकिस्तानवर घाव घालणे गरजेचे आहे. तरच ही रसद तुटू शकेल. काश्मीरमधील सध्याचे अविश्वासाचे वातावरण दूर करणे ही खरे तर स्थानिक राजकारण्यांची जबाबदारी होती. परंतु फारुख अब्दुल्लांनी नुकत्याच एका मुलाखतीत अमेरिकेच्या मध्यस्थीचा टाहो फोडला. हे राजकारणी काश्मीरमधील परिस्थिती शांत करण्याऐवजी खोर्‍यातील बदलत्या परिस्थितीवर केवळ स्वतःची पोळी भाजून घेण्यास सोकावलेले आहेत. नेतेच जेव्हा असे दुटप्पी वागतात तेव्हा त्यांच्या कार्यकर्त्यांनी तरी आपला जीव धोक्यात का घालावा? त्यामुळे राष्ट्रीय प्रवाहापासून काश्मीरला तोडण्याचे पाकिस्तानचे षड्‌यंत्र हळूहळू प्रत्यक्षात येताना दिसू लागले आहे. सामान्य काश्मिरी जनता देशद्रोही निश्‍चित नाही. तिच्या अपेक्षा माफक आहेत. परंतु तरुणाईला आपल्या बाजूने वळवून एक धगधगते वातावरण निर्माण करण्यात देशद्रोही शक्ती सफल ठरत आहेत. त्यांची नांगी ठेचण्यासाठी कालच्यासारखी धडक कारवाई हा एकच पर्याय उरतो!