अमित शहा यांची शुक्रवारी म्हापशात होणार प्रचारसभा

0
6

>> भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांची माहिती

भाजपचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या जाहीर प्रचारसभेची तारीख अखेर निश्चित झाली असून, भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी म्हापसा येथे शुक्रवार दि. 3 मे रोजी संध्याकाळी 5 वाजता ही प्रचारसभा होणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी काल पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.

गेल्या आठवड्यात सदानंद शेट तानावडे यांनी 1 ते 3 मे या दरम्यान म्हापशात अमित शहा यांची सभा होणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर काल अखेर या सभेची तारीख निश्चित झाली.
भाजपने लोकसभा निवडणूक प्रचारासाठी शुक्रवार दि. 3 मे रोजी संध्याकाळी 5 वाजता म्हापसा येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची जाहीर प्रचारसभा आयोजित केली आहे, अशी माहिती सदानंद शेट तानावडे यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली. तसेच, एनडीएची जाहीर सभा गुरुवार दि. 2 मे रोजी संध्याकाळी 5.30 वाजता फोंडा येेथे होणार आहे, असे तानावडे यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दक्षिण गोवा मतदारसंघातील सभेनंतर दक्षिण गोव्यात भाजपला भरघोस पाठिंबा मिळू लागला आहे, असा दावाही त्यांनी केला.

उत्तर गोवा हा गेली 25 वर्षे भाजपचा बालेकिल्ला राहिला असून, भाजपचे उमेदवार श्रीपाद नाईक यांचे या मतदारसंघावर वर्चस्व राहिले आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण गोवा मतदारसंघावर अधिक लक्ष दिले असून, त्या ठिकाणी विजयश्री खेचून आणण्यावर अधिक भर दिला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा झाली होती. याशिवाय मुख्यमंत्री, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि अन्य नेते जोरदार प्रचार करत आहेत. असे असले तरी भाजपने उत्तर गोव्याकडे दुर्लक्ष केले नाही. या मतदारसंघातही प्रचार सुरू असून, आता या मतदारसंघात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची प्रचारसभा आयोजित केली आहे. आता या सभेत ते काय बोलणार आणि कोणावर टीकास्त्र डागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

फेक व्हिडीओ प्रकरणी आणखी दोघांना अटक

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सुरु असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण संपवणार असे ते बोलत असल्याचे सांगितले जात होते; मात्र, हा व्हिडीओ बनावट असल्याचे अमित शहा यांनी स्पष्ट केले होते. यानंतर आता या प्रकरणी अहमदाबाद सायबर क्राईमच्या पथकाने काँग्रेस आणि आम आदमी पार्टीशी संबधित दोघांना अटक केली आहे. तसेच यापूर्वी आसाम पोलिसांनी एकाला अटक केली होती.

लोकसभा निवडणुकीत 400 जागा मिळाल्यानंतर भाजपा आरक्षण रद्द करेल, असा खोटा प्रचार काँग्रेसकडून करण्यात येत आहे. पण यामध्ये काहीही तथ्य नाही. काँग्रेसचा हा दावा खोटा आणि निराधार आहे. भाजपाने कधीही अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाचा विरोध केला नाही. या आरक्षणाला भाजपाचा पाठिंबा आहे, अशी प्रतिक्रिया अमित शहा यांनी सदर बनावट व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दिली होती.