माणसांचं जग- ५३ वात्सल्याची मूर्ती ः उषाबाई

0
198
  •  डॉ. जयंती नायक

उषाबाईचंसुद्धा तसंच झालं. पन्नाशीत पोहोचण्याच्या आधीच ती गेली. तिच्या नाजूक देहानं खूप यातना भोगल्या. वात्सल्याच्या, मायेच्या त्या नाजूक मूर्तीच्या वाट्याला का बरे या यातना आल्या हा मला नेहमीच प्रश्न पडतो…

उषाबाई या जगातून जाऊन आज वीस वर्षांहून अधिक काळ लोटला तरी तिच्या आठवणी माझ्या हृदयात अजूनही ताज्या आहेत. खरं तर शिक्षक म्हणून तिचं-माझं नातं माझ्या अगदी लहानपणीचं. त्याला आता पन्नास वर्षांचा काळ उलटलेला आहे. परंतु त्यावेळी तिनं दाखवलेली आपुलकी, मला दिलेलं प्रेम, वात्सल्यपूर्ण वागणूक, माझ्या शिक्षणाचा घातलेला पाया मी कधीच विसरू शकणार नाही.
उषाबाई तशी माझी अधिकृत शिक्षिका नव्हती. म्हणजे तिच्या शाळेत माझी विद्यार्थी म्हणून अधिकृत नावनोंदणी झाली नव्हती. परंतु तिनं मला आपल्या शाळेत सुमारे सहा महिने शिकवलं होतं, तेसुद्धा माझ्या हाताला पकडून शाळेत घेऊन जाऊन.

त्याची गोष्ट अशी ः मला लहानपणापासून शिकायची खूप आवड. माझा मोठा भाऊ- जो माझ्यापेक्षा सुमारे तीन वर्षांनी मोठा होता- अभ्यास करताना मी त्याच्या सोबत पाटी घेऊन बसून काही ना काही पाटीवर गिरवत बसायची अथवा तो जे काय करतो ते मी करायला बघायची. हे मला आईनं सांगितलं होतं, कारण त्यावेळचं मला काही आठवत नाही. तर अशा पद्धतीनं मी चार वर्षांची असताना सर्व बाराखडी, तसेच पावकी-निमकीपर्यंतचे पाढे काढायला शिकली, अन् मग भावाबरोबर गावच्या शाळेत जायचा हट्ट करू लागली. त्यावेळी सहावं वर्ष झाल्याशिवाय शाळेत अडमिशन मिळत नव्हती. तरी आईच्या विनंतीवरून अन् माझा चुणूकपणा आवडून गुरुजींनी मला शाळेत बसवून घेतलं. पेडणे परिसरातील सैरोजी नावाचे गुरुजी त्यावेळी होते. माझी शिकायची आवड बघून त्यांना माझं खूप कौतूक वाटलं. शाळेत जायला मिळाल्यामुळे मला खूप आनंद झाला, परंतु तो थोडेच दिवस टिकला. सैरोजी गुरूजींची शालेय वर्ष सुरू होताच बदली झाली अन् त्यांच्या जागी जोशी आडनावाचे मास्तर आले.
जोशी मास्तर म्हणजे एकदम खडूस, मारकुटे शिक्षक होते. ‘छडी वाजे छम् छम्’ केल्याशिवाय त्यांना शिकवताच येत नसे. ते माणूसघाणे होते. त्यांनी आल्या आल्या पहिलं काम केलं ते म्हणजे मला आणि माझ्यासारखीच अधिकृत ऍडमिशन न घेता शाळेत जाऊन बसणार्‍या दोन-तीन मुलांना शाळेत घ्यायचं बंद केलं.
शाळेत येऊ नको म्हटल्यावर मी रडून उच्छाद मांडला. आईनं जोशी मास्तरांना कितीतरी विनंती केली, वडिलांनी पण जाऊन त्यांना विनंती केली, परंतु ते नमले नाहीत. मला काही त्यांनी शाळेत येऊ दिलं नाही.

माझं शाळेत जाण्याचं खूळ काही जात नव्हतं. रोज सकाळी भाऊ शाळेत जायला निघाला म्हणजे मी भोकांड पसरायची. आईला काय करावं ते सुचत नव्हतं. एके दिवशी आई माहेरी गेली असता शेजारच्या गिंड्याची सून जी गावातील शाळेत शिक्षिका होती, तिला आईनं बोलता बोलता माझ्या शाळेच्या खुळासंबंधी अन् जोशी मास्तरांच्या वागण्यासंबंधी सांगितलं. मला शाळेत जायची एवढी आवड आहे हे ऐकून तिला खूप कौतुक वाटलं. तिनं आईला सांगितलं की मला इथे म्हणजे मामाकडे आणून पोचव. तिला मी माझ्या शाळेत घेऊन जाईन.

ऐकून आईला आनंद झाला. माझा आनंद तर गगनात मावेनासा झाला. याच्या आधी आई-पापाला सोडून मी कधी एकटी कुठं राहिली नव्हती. मला स्वतःचं काहीच करता येत नव्हतं. केससुद्धा बांधता येत नव्हते. तरी मी आनंदाने मामाकडे राहण्यासाठी जायला निघाले.
आईने दुसर्‍या दिवशी मला मामाकडे नेऊन पोचवलं, अन् मग माझं उषाबाईच्या शाळेत जाणं सुरू झालं. तिच्या अन् मामाच्या घरापासून शाळा दीड-दोन किलोमीटरच्या अंतरावर होती. एवढं अंतर मी कधी चालत गेले नव्हते. मला दमायला व्हायचं. मग उषाबाईसुद्धा माझ्यासोबत थांबायची. माझा चालताना हात पकडायची.

मला पावकी-निमकीपर्यंत पाढे येत होते. तिच्या शाळेत तिनं मला छान छान गोष्टीची पुस्तकं वाचायला दिली. छान-छान गोष्टी सांगितल्या. चित्रं काढायला शिकवली. बागकाम शिकवलं. त्या चिमुकल्या वयात मला जे जमेल त्याचं शिक्षण दिलं. महत्त्वाचं म्हणजे माझ्यावर माया केली. माझं भरभरून कौतुक केलं. एवढंच कशाला, शिक्षणाची आवड मनात घट्ट केली. सकाळी शाळेत जायच्या वेळेला मावशीनं कधी माझे केस विंचरायला उशीर केला अन् ती मला न्यायला आली तर तिने स्वतःच माझे केस विंचरलेलेसुद्धा आहेत. कोणतीही गोष्ट शिकवली की मी लगेचच आत्मसात करते याचं तिला भारी कौतुक होतं.

उषाबाईनं दिलेलं एवढं प्रेम, माया, कौतुक माझ्या जीवनात कधी कोणा शिक्षकांकडून, किंबहुना मावश्यां-माम्यांकडूनसुद्धा मिळालेलं नाही. लहानपणी झालेल्या उषाबाईच्या सगुण करस्पर्शामुळेच माझं अकेडेमिक जीवन समृद्ध झालं अशी माझी श्रद्धा आहे. एका श्रीमंत सारस्वत कुटुंबातील असूनसुद्धा तिनं मला एवढी आपुलकीची वागणूक दिली याला मी माझे ऋणानुबंधच समजते.

‘गोरीगोरीपान, फुलासारखी छान’ या गाण्यातील वर्णनाप्रमाणे उषाबाई गोरीगोरीपान होती. नाजूक बांधा, थोडीशी बुटकी, सोनेरी कुरळे लांब केस… या केसांच्या गुढघ्यापर्यंत रुळणार्‍या लांब वेण्या. तपकिरी डोळे, चेहर्‍यावर निरंतर हसू. ती दिसायला जणू बाहुलीसारखीच दिसायची. तिचं रूप मी माझ्या स्मृतिपटलावर जपून ठेवलेलं आहे.

लहानपणी आजोबा गोष्ट सांगताना सांगायचे, जी माणसं चांगली असतात त्यांना देव आपल्याजवळ लवकर बोलावतो. उषाबाईचंसुद्धा तसंच झालं. पन्नाशीत पोहोचण्याच्या आधीच ती गेली. तिच्या नाजूक देहानं खूप यातना भोगल्या. वात्सल्याच्या, मायेच्या त्या नाजूक मूर्तीच्या वाट्याला का बरे या यातना आल्या हा मला नेहमीच प्रश्न पडतो…