न्यूझीलंडच्या विजयात टेलरचे शतक

0
124

रॉस टेलरचे शतक तसेच हेन्री निकोल्स व कर्णधार टॉम लेथम यांच्या अर्धशतकांच्या बळावर यजमान न्यूझीलंडने पहिल्या एकदिवसीय सामन्यात काल बुधवारी टीम इंडियाचा ४ गडी व ११ चेंडू राखून पराभव केला. भारताने विजयासाठी ठेवलेले ३४९ धावांचे विशाल लक्ष्य यजमानांनी ४८.१ षटकांत ६ गडी गमावून गाठले.

न्यूझीलंडने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पृथ्वी शॉ व मयंक अगरवाल या नव्या सलामी जोडीने भारताला अर्धशतकी सलामी दिली. कर्णधार विराटने आपले ५८वे वनडे अर्धशतक ठोकताना ५१ धावा जमवल्या. श्रेयस अय्यरने प्रथमच वनडेत शतकी वेस ओलांडताना १०७ चेंडूंत ११ चौकार व १ षटकारासह १०३ धावांची खेळी साकारली. पाचव्या स्थानावरील नव्या भूमिकेशी जुळवून घेताना लोकेश राहुलने केवळ ६४ चेंडूंत ३ चौकार व तब्बल ६ षटकारांसह नाबाद ८८ धावा जमवल्या. केदार जाधवने १५ चेंडूंत नाबाद २६ धावा करत धावगती वाढवण्यास हातभार लावला.

विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना गप्टिल व निकोल्स यांनी ८५ धावांची खणखणीत सलामी देत विजयाचा भक्कम पाया रचला. गप्टिल व पदार्पणवीर टॉम ब्लंडेल (९) काही धावांच्या फरकाने बाद झाल्याने न्यूझीलंडचा संघ २ बाद १०९ अशा अडचणीत सापडला. निकोल्सने टेलरच्या मदतीने तिसर्‍या गड्यासाठी ६२ धावांची भागी रचत संघाचा कोसळता डोलारा सावरला. रॉस टेलरचा चोरटी धाव घेण्याचा मोह न आवरल्यामुळे निकोल्सला वैयक्तिक ७८ धावांवर धावबाद होऊन परतावे लागले.

कर्णधार लेथम व रॉस टेलर यांनी चौथ्या गड्यासाठी केलेली १३८ धावांची भागीदारी भारताच्या पराभवाचे प्रमुख कारण ठरली. लेथमने केवळ ४८ चेंडूंत ८ चौकार व २ षटकारांसह ६९ तर टेलरने ८४ चेंडूंत १० चौकार व ४ षटकारांसह नाबाद १०९ धावा केल्या. टेलरचे हे २१वे वनडे शतक ठरले. भारताकडून कुलदीप यादवने २ गडी बाद केले. परंतु, यासाठी त्याला ८४ धावा मोजाव्या लागल्या.