हैदराबादचा धुव्वा उडवित गोव्याची आघाडी

0
102

ह्युगो बौमास आणि फेरॅन कोरोमीनास यांनी नोंदविलेल्या प्रत्येकी दोन गोलांच्या जोरावर एफसी गोवाने हैदराबाद एफसीचा ४-१ असा धुव्वा उडवित हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) सहाव्या मोसमात गुणतक्त्यात आघाडी घेतली. बुधवारी नेहरू स्टेडियमवर गोव्याने हैदराबादचा ४-१ असा धुव्वा उडविला.

मुख्य प्रशिक्षक सर्जिओ लॉबेरा यांना क्लब व्यवस्थापनाने निरोप दिल्यानंतरही गोव्याने हा निकाल साध्य केला. त्यांच्या कार्यकाळात आत्मसात केलेल्या आक्रमक खेळाचे प्रदर्शन गोव्याने केले. ह्युगो बुमूस आणि फेरॅन कोरोमीनास यांनी प्रत्येकी दोन गोल केले.
गोव्याने १६ सामन्यांत दहावा विजय मिळविला असून तीन बरोबरी व तीन पराभव अशा कामगिरीसह त्यांचे ३३ गुण झाले. गोव्याने एटीके एफसीला (१५ सामन्यांतून ३०) मागे टाकत आघाडी घेतली.
एटीकेपेक्षा गोव्याचा एक सामना जास्त झाला आहे. गतविजेता बेंगळुरू एफसी १५ सामन्यांतून २८ गुणांसह तिसर्‍या, तर मुंबई सिटी एफसी (१५ सामन्यांतून २३) चौथ्या स्थानावर आहे.
खाते उघडण्याची शर्यत अपेक्षेप्रमाणे गोव्याने जिंकली. यात त्यांना दैवाची साथ मिळाली. १९व्या मिळालेला कॉर्नर ब्रँडन फर्नांडीसने घेतला, पण हैदराबादच्या मॅथ्यू किल्गॅलॉन याने चेंडू थोपविला. हा चेंडू जवळपास २५ यार्ड अंतरावर असलेल्या मंदार राव देसाई याच्यापाशी गेला. त्याने मारलेला चेंडू पेनल्टी क्षेत्रातील बुमूस याच्यापाशी गेला. बुमूसने मग नेटच्या डाव्या कोपर्‍यात चेंडू मारत गोल केला.

दोन मिनिटांत हैदराबादला बरोबरीची संधी मिळाली होती. मार्को स्टॅन्कोविचने घेतलेल्या कॉर्नरवर मार्सेलिनीयोने मारलेला चेंडू गोलपोस्टला लागला. नेटसमोर आलेला चेंडू गोव्याच्या अहमद जाहौहने चपळाईने बाहेर घालविला. पुढील कॉर्नरवर काही विशेष घडले नाही.

मार्सेलिनीयोने दुसर्‍या सत्रात हैदराबादचे खाते उघडले, पण त्यानंतर स्पेनचा स्ट्रायकर कोरोमीनासने दोन गोल केले. यात तीन मिनिटे बाकी असताना हैदराबादचा गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमनी याने कोरोमीनासला पाडले. त्यामुळे मिळालेली पेनल्टी कोरोमीनासने सत्कारणी लावली.

हैदराबादला १६ सामन्यांत १२वा पराभव पत्करावा लागला. एक विजय व तीन बरोबरी अशा कामगिरीसह त्यांचे ६ गुण व शेवटचे दहावे स्थान कायम राहिले.