हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) एफसी गोवा संघासमोर बुधवारी हैदराबाद एफसीचे आव्हान असेल. सर्जिओ लॉबेरा यांच्या अनुपस्थितीत गोवा नेहरू स्टेडियमवर आपली मोहिम पुढे नेईल. त्यांचे लक्ष आघाडी घेण्यावर असेल.
आघाडीवरील स्थानामुळे एएफसी चँपीयन्स लीग गटात प्रवेश मिळणार असल्यामुळे गोवा या शर्यतीत पिछेहाट होऊ नये म्हणून प्रयत्न करेल. गोवा क्लब व्यवस्थापनाने लॉबेरा यांना निरोप दिला आहे. क्लिफर्ड मिरांडा यांची हंगामी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. तांत्रिक संचालक डेरीक परेरा यांच्या साथीत ते काम पाहतील.
परेरा यांनी सांगितले की, संघ एकत्र ठेवण्यावर मी लक्ष केंद्रीत केले आहे. नेहमीच सांघिक खेळ करायचा, एका वेळी एका सामन्याचा विचार करायचा असे धोरण आहे. आमच्या संघात गुणवत्ता आहे, पण दृष्टिकोन योग्य असला पाहिजे. मी मैदानावर पाऊल टाकले तेव्हा खेळाडूंमध्ये सकारात्मक उर्जा असल्याचे जाणवले. परिस्थितीचा विचार करता मला खेळाडूंचा आदर वाटतो. प्रत्येक दिवशी खेळाडूंचा दृष्टिकोन असाच राहिला आहे आणि याचे समाधान वाटते.
गोव्याचा संघ यंदा फॉर्मात आहे. त्यांनी १५ सामन्यांत ३२ गोल केले आहेत. घरच्या मैदानावर त्यांचा यानंतर आणखी एकच सामना आहे. त्यामुळे बाद फेरीपूर्वी खेळातील त्रुटी दूर करण्याचा त्यांचा प्रयत्न राहील.
मध्य फळीतील एदू गार्सिया चार पिवळ्या कार्डमुळे निलंबीत आहे, पण प्रभावी मध्यरक्षक अहमद जाहौह संघात परतेल. त्यामुळे चार खेळाडूंच्या बचाव फळीला पाठबळ मिळेल.
हैदराबादला एकदाही क्लीन शीट राखता आलेली नाही ही प्रशिक्षक जेव्हीयर लोपेझ यांच्यासाठी सर्वाधिक चिंतेची बाब आहे. त्यांच्याविरुद्ध सर्वाधिक ३३ गोल झाले आहेत. आधीच्या सामन्यात त्यांना बेंगळुरू एफसीविरुद्ध ०-१ असे पराभूत व्हावे लागले. त्यावेळी हैदराबादने पेनल्टी दवडली. याशिवाय बेंगळुरूचा गोलरक्षक गुरप्रीत संधू याने त्यांच्या अनेक संधी दवडल्या.
जानेवारीत खेळाडूंच्या बदल्यांच्या कालावधीत हैदराबादने काही खेळाडू लोनवर दिले, तर सौविक चक्रवर्ती आणि हितेश शर्मा असे काही खेळाडू मिळविले.
मागील सामन्यात निखील पुजारीने प्रभावी खेळ केला. संघाचा निरोप घेतलेल्या लॉबेरा यांना सलामी देण्याची गोव्यासाठी ही सुवर्णसंधी असल्याचे त्याला वाटते. तो म्हणाला की, लॉबेरा यांनी भारतीय फुटबॉलसाठी अनेक विलक्षण गोष्टी केल्या. त्यांच्याविरुद्ध खेळण्याची ही सर्वोत्तम वेळ आहे. त्यांच्या मोहिमेत अडथळा आणण्याची ही संधी चांगली आहे.
गोवा धडाका राखणार की हैदराबाद त्यांच्या मोहिमेत अडथळा आणणार याची उत्सुकता आसेल.