Home Featured पाच पर्यटकांसह 25 जणांचा मृत्यू

पाच पर्यटकांसह 25 जणांचा मृत्यू

0

हडफड्यात नाईट क्लबमध्ये अग्नितांडव

साकवाडी-हडफडे येथील बर्च बाय रोमिओ लेन क्लबला शनिवारी मध्यरात्री 12 च्या दरम्यान भीषण आग लागून 25 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 5 पर्यटकांसह क्लबच्या 20 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. या दुर्घटनेत अन्य 6 जण जखमी झालेले असून, त्यांच्यावर गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. जखमींपैकी काहीजणांची प्रकृती चिंताजनक आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे अग्निशामक दलाचे म्हणणे आहे. दुसऱ्या बाजूला ही आग स्टेज पायरो टेक्निक्समुळे लागल्याचेही सांगितले जात आहे. पहाटे 3.30 वाजेपर्यंत हणजूण पोलीस व अग्निशामक दलाचे अधिकारी मृतदेह बाहेर काढण्यात व्यस्त होते. आगीत होरपळल्यामुळे मृतदेहांची स्थिती अतिशय दयनीय होती. मृतांत बहुतेक कर्मचारी किचनमधील कामगार होते. विशेष म्हणजे सदर क्लब पाण्यात असून, चारही बाजूने पाणी व आतमध्ये प्रवेश करण्यासाठी एकमेव मार्ग असल्यामुळे अनेकांचा गुदमरून मृत्यू झाला.

बर्च बाय रोमिओ लेन क्लबमध्ये जेव्हा आगीची दुर्घटना घडली, तेव्हा क्लबमध्ये सुमारे 100 जण हजर होते. वीकएंड असल्याकारणाने क्लबमध्ये मौजमजा करण्यासाठी ही गर्दी उडाली होती, असे सूत्रांचे म्हणणे आहे. आग पहिल्या मजल्यावर लागली आणि नंतर बघता बघता वणव्यासारखी आग सर्वत्र पसरली. यावेळी घाबरून या मजल्यावरील लोकांनी पळ काढला. मात्र, तळघरात असलेल्यांना पळता आले नाही. त्यामुळे तेथील दोघांचा होरपळून मृत्यू झाला, तर अनेकांचा धुराच्या लोटामुळे गुदमरून मृत्यू झाला. क्लबसाठी वापरण्यात आलेले लाकडी साहित्य तसेच क्लबमधील फर्निचर यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले. त्यामुळे क्लबमध्ये यावेळी भीतीचे वातावरण पसरून धावपळ सुरू झाली. डान्स फ्लोअरवर मोठ्या संख्येने असलेल्या लोकांनी तेथून पळ काढला. मात्र, क्लबच्या तळघरात असलेल्यांना पळता न आल्याने ते तेथे अडकून आग व धुराच्या लोटात सापडून मृत्यूमुखी पडले.
अग्निशामक दलाला आगीच्या दुर्घटनेची माहिती मिळताच दलाच्या म्हापसा, पणजी व कळंगुट येथील जवानांनी दुर्घटनास्थळी तातडीने धाव घेऊन बचाव व मदतकार्य हाती घेतले. यावेळी स्थानिक लोकही मदतीसाठी धावून गेले. मात्र, त्यापूर्वीच आगीचा मोठा भडका उडून 25 लोकांचा मृत्यू झाला होता. जखमींना तेथून इस्पितळात हलवण्यास अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले.

राज्य व केंद्र सरकारकडून मदत
हडफडे येथील अग्निकांडात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुबीयांना राज्य सरकारकडून प्रत्येकी 5 लाख रुपयांची तर जखमींना 50 हजार रु. ची आर्थिक मदत देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
केंद्र सरकारने राष्ट्रीय मदत निधीमधून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रु. तर जखमींना 50 हजार रु. ची भरपाई देण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.
या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या 25 जणांपैकी चौघेजण हे दिल्लीतील तर एक कर्नाटकमधील पर्यटक आहे. तर अन्य 20 जण हे क्लबचे कर्मचारी असून त्यापैकी काहीजण उत्तराखंड तर काहीजण झारखंडमधील आहेत. तर अन्य तिघेजण हे नेपाळी आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली. सर्व मृतांचे पार्थिव नेपाळसह त्यांच्या गावी नेण्यासाठी सरकार त्यांच्या कुटंबीयांना सर्व ती मदत करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

चौकशीचे आदेश ः मुख्यमंत्री
आगीची माहिती मिळताच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, पोलीस महासंचालक आलोक कुमार यांनी काल सकाळी घटनास्थळी धाव घेतली. नंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी, मृतांपैकी बरेच जण हे क्लबमधील स्वयंपाकी होते. त्यात तिघा महिलांचा समावेश आहे. त्यांच्यापैकी दोघांचा आगीत होरपळून तर अन्यांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाल्याची माहिती दिली. पर्यटन हंगाम ऐन भरात असताना ही आगीची दुर्घटना घडली असल्याचे सांगून दुर्घटनेबद्दल त्यांनी दु:ख व्यक्त केले. आपण चौकशीचे आदेश दिलेले असून आग कशी लागली ते चौकशीनंतरच स्पष्ट होणार असल्याचे ते म्हणाले.

अग्निसुरक्षा परवाना नाही
आगीची दुर्घटना घडलेल्या क्लबकडून बऱ्याच नियमांचे उल्लंघन झाले असल्याचे दिसून आलेले असून या क्लबकडे अग्निसुरक्षा परवाना (एनओसी) नसल्याचे आढळून आले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

क्लब मालकावर कठोर
कारवाई होणार : मुख्यमंत्री

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पाहणी करून एकूण आगीचा आढावा घेतला. एकूण परिस्थिती पाहता ही दुर्घटना अतिशय संतापजनक आहे. कोणतीही अधिकृत कागदपत्रे या क्लबकडे नाहीत, अग्निशामक दलाच्या दृष्टीने कोणतीही सुरक्षा क्लबकडे नाही. नियम धाब्यावर बसून कोणी परवाने दिले असतील तर त्यांच्यावर कारवाई होणार असून सर्व बाजूने चौकशी सुरू आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

छोटेखानी रेस्टॉरन्टचे रुपांतर नाईट क्लबमध्ये
30 वर्षांपूर्वी मिठागराच्या शेतीत एक छोटेखानी रेस्टॉरन्ट होते. त्याचे नंतर या ‘बर्च बाय रोमियो लेन’ नाईट क्लबमध्ये रूपांतर झाल्याचे कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी माहिती देताना सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, खोसला नावाच्या मालकाची ही मालमत्ता त्यांनी सौरव लुथरा यांना भाड्याने चालवायला दिली होती. लुथरा ही व्यक्ती सदर क्लब चालवायचा. लुथरा आणि आमोणकर हे दोघे भागीदार होते. त्यांच्यातील वादानंतर पंचायतीने कारवाई केली होती. पंचायतीने क्लबचे बांधकाम अधिक असल्यामुळे ते पाडण्याचा आदेश दिला होता; पण न्यायालयातून स्थगिती मिळवली. आता सरकारने यावर पुढील कारवाई करावी जे घडले आहे ते भयानक आणि भीषण आहे, असे हडफड्याचे सरपंच रोशन रेडकर यांनी सांगितले.

पंतप्रधानांशी बोललो : मुख्यमंत्री
हडफडे येथील आगीच्या दुर्घटनेसंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आपणाशी बोलले व आपण त्यांना या दुर्घटनेसंबंधीची सगळी माहिती दिली. दुर्घटनास्थळी सध्या काय परिस्थिती आहे त्यासंबंधीची तपशीलवार माहिती आपण पंतप्रधानांना दिली असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.

मृत कर्मचाऱ्यांची नावे

  1. मोहित (झारखंड), 2. प्रदीप महातो (झारखंड), 3. बिनोद महातो (झारखंड), 4. राहुल तंती (आसाम), 5. सतीश सिंग (उत्तराखंड), 6. मनोजित मल (आसाम), 7. चूर्ण बहादूर पूण (नेपाळ), 8. सुरेंदर सिंग (उत्तराखंड), 9. सुभाष छेत्री (पश्चिम बंगाल). 10. जितेंद्र सिंग (उत्तराखंड), 11. सुमित नेगी (उत्तराखंड), 12. मनिष सिंग (उत्तराखंड), 13. विवेक कटवाल (नेपाळ). 14. सबिन (नेपाळ), 15. सुनील कुमार (उत्तरप्रदेश), 16. दिगंबर पाटिर (आसाम), 17. रोहन सिंग (उत्तरप्रदेश), 18. डॉमिनिक (महाराष्ट्र), 19. मनोज जोरा (महाराष्ट्र), 20. सुदीप (नेपाळ)
    मृत पर्यटकांची नावे
  2. इशाक (कर्नाटक), 2. सरोज जोशी (दिल्ली), 3. विनोद कुमार (दिल्ली), 4. अनिता जोशी (दिल्ली), 5. कमला जोशी (दिल्ली)

तीन अधिकाऱ्यांचे निलंबन

हडफडे येथील क्लबमधील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तीन अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. त्यामध्ये पंचायत संचालिका सिद्धी हळर्णकर, गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (जीएसबीसीबी) तत्कालीन सदस्य सचिव शर्मिला मोंतेरो आणि हडफडे-नागवा पंचायतीचे सचिव रघुवीर बागकर यांचा समावेश आहे. अन्य जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी सुरू असून, त्यांच्यावरही कारवाई होण्याची शक्यता आहे.

सर्व मृतांची ओळख पटली

या अग्नितांडवात मृत्यूमुखी पडलेल्या सर्वांची ओळख पटली असून, त्यापैकी 20 जण हे क्लबचे कर्मचारी, तर 5 पर्यटक आहेत. मृत पावलेल्या पर्यटकांपैकी 4 जण हे दिल्लीचे, तर एक जण हा कर्नाटकचा रहिवासी आहे. तसेच मृत पावलेले सर्व कर्मचारी हे झारखंड, आसाम, महाराष्ट्र, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, उत्तरप्रदेश आणि नेपाळचे रहिवासी आहेत.

पाच जणांचे मृतदेह कुटुंबीयांकडे सोपवले

या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या 25 जणांपैकी 5 जणांचे मृतदेह कुटुंबीयांकडे सोपवण्यात आले आहेत.

दुर्घटनेप्रकरणी चौघांना अटक

या दुर्घटनेतील 25 जणांच्या मृत्यू प्रकरणी हणजूण पोलिसांनी 4 जणांना अटक केली आहे. त्यात क्लबचे मुख्य महाव्यवस्थापक राजीव मोडक, महाव्यवस्थापक विवेक सिंह, बार व्यवस्थापक राजीव सिंघानिया आणि गेट व्यवस्थापक रियांशु ठाकूर यांचा समावेश आहे. अटकेनंतर या चौघांनाही हणजूण पोलीस स्थानकातून अन्यत्र हलवण्यात आले आहे. क्लबचे मालक सौरभ लूथरा आणि गौरव लूथरा यांच्याविरोधातही एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा संशय

बर्च बाय रोमिओ लेन या क्लबमध्ये जी आगली, ती शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, असा संशय अग्निशामक दलाने व्यक्त केला आहे. सदर क्लबकडे अग्निशामक दलाचा अग्निसुरक्षा परवाना नव्हता. तसेच अग्निसुरक्षा ऑडिसाठी कोणीही अर्जच केला नव्हता, अशी माहिती अग्निशामक दलाचे प्रमुख नितीन रायकर यांनी काल दिली.

मृतदेह गावी पोहोचवा; नातलगांची मागणी

या दुर्घटनेत मृत पावलेले सर्व म्हणजे पर्यटक आणि क्लबमधील कर्मचारी हे परराज्यातील रहिवासी आहेत, तसेच काही जण हे नेपाळमधील आहेत. अचानक ओढवलेल्या या संकटामुळे मृतांच्या नातेवाईकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. परराज्यातील या सर्वांचे मृतदेह त्यांच्या त्यांच्या गावी पोहोचवावेत, अशी मागणी मृतांच्या नातलगांनी राज्य सरकारकडे केली आहे.

राष्ट्रपतींकडून शोक
गोव्यातील आगीच्या दुर्घटनेविषयी राष्ट्रपती दौप्रदी मुर्मू यांनीही शोक व्यक्त केला असून या दुर्घटनेमुळे आपणाला तीव्र दु:ख झाले असल्याचे म्हटले आहे. मृतांच्या कुटुंबीयांप्रती त्यांनी संवेदना व्यक्त केल्या आहेत.

दुःखदायक घटना : पंतप्रधान
हडफडे येथील आगीची दुर्घटना अत्यंत दुःखदायक असून या आगीत ज्यांचा मृत्यू झालेला आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आपण सहभागी असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या समाजमाध्यमावरील पोस्टद्वारे म्हटले आहे. या दुर्घटनेतील जखमी लवकर बरे व्हावेत यासाठी आपण प्रार्थना करीत असल्याचेही मोदी यांनी म्हटले आहे. या दुर्घटनेबाबत आपण मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याशी बोललो आहे. या दुर्घटनेत जे मृत्यूमुखी पडले आहेत अथवा जखमी झाले आहेत त्यांच्या कुटुंबियांना गोवा सरकार सर्व ते साहाय्य करीत असल्याचे मोदी यांनी या पोस्टद्वारे म्हटले आहे.

वेदनादायी घटना ः अमित शहा
अग्निकांडात 25 जणांचे बळी जाणे व अनेकजण जखमी होणे ही वेदनादायी घटना आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे. राज्य सरकारच्या प्रशासनाने बचाव कार्य करण्याबरोबरच आवश्यक ती मदत पुरवण्याचे काम हाती घेतले असल्याचे गृहमंत्री शहा यांनी म्हटले आहे.

हे सरकारचे अपयश : राहुल गांधी
गोव्यातील अग्निकांडात 25 पेक्षा जास्त लोकांचे बळी जाण्याची जी दुर्घटना घडली आहे ती अत्यंत दु:खदायी अशी घटना असल्याचे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे. मृतांच्या कुटुंबियांप्रती आपण भावना व्यक्त करीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. राज्य सरकारचे हे एक अपयश आहे. राज्य सरकार जनतेला चांगले प्रशासन व सुरक्षा पुरवू शकत नाही हे या अपघातावरून सिद्ध झाले असल्याचे गांधी यांनी म्हटले आहे.