टीम इंडिया विश्‍वचषकाच्या अंतिम फेरीत

0
155

> > उपांत्य लढतीत पाकिस्तानचा १० गड्यांनी दारुण पराभव

 

  • यशस्वी जैसवालचे नाबाद शतक
  •  दिव्यांश सक्सेनाचे अर्धशतक
    – सुशांत, बिश्‍नोई, त्यागीचा प्रभावी मारा

भारताने एकतर्फी ठरलेल्या उपांत्य फेरीत पाकिस्तानचा १० गडी व ८८ चेंडू राखून पराभव करत १९ वर्षांखालील क्रिकेट विश्‍वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. पाकिस्तानने दिलेले १७३ धावांचे किरकोळ लक्ष्य टीम इंडियाने ३५.२ षटकात एकही गडी न गमावता गाठले.

टीम इंडियाचा सलामीवीर यशस्वी जैसवाल याने १०५ धावांची शतकी खेळी साकारली. तर, दिव्यांश सक्सेनाने ५९ धावा करत त्याला तोलामोलाची साथ दिली. गुरुवारी न्यूझीलंड व बांगलादेश यांच्यात होणार्‍या दुसर्‍या उपांत्य फेरीतील विजेत्या संघाशी भारताला अंतिम फेरीत दोन हात करावे लागणार आहेत.
पाकिस्तानने दिलेले १७३ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या यशस्वी जैसवाल आणि दिव्यांश सक्सेना या भारताच्या सलामीच्या जोडीने सावध सुरुवात केली. त्यानंतर जम बसल्यानंतर या द्वयीने धावसंख्या वाढवण्यास सुरुवात केली. विशाल धावसंख्येचा पाठलाग करण्याचा दबाव नसल्याने या दोघांनी आपला नैसर्गिक खेळ करत आततायीपणा टाळला. यशस्वी व दिव्यांशच्या जबरदस्त खेळीसमोर पाकिस्तानचे गोलंदाज हतबल झाले. पाकिस्तानच्या गोलंदाजांना निष्प्रभ केल्यानंतर भारताच्या सलामीवीरांनी विजयाची औपचारिकता पूर्ण केली. टीम इंडियाला सामना जिंकण्यासाठी ३ धावांची आवश्यकता असताना यशस्वीने षटकार ठोकून आपले शतक आणि टीम इंडियाचा विजय साकारला. यशस्वीने ११३ चेंडूत नाबाद १०५ धावा केल्या. यामध्ये ८ चौकार आणि चार षटकारांचा समावेश आहे. तर, दिव्यांश सक्सेनाने ९९ चेंडूत ५९ धावांची खेळी साकारली. यामध्ये त्याने सहा चौकार लगावले.

तत्पूर्वी, पाकिस्तानचा कर्णधार नाझीर याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. स्विंग गोलंदाज कार्तिक त्यागीने डावातील पहिले षटक टाकले. पाकने सावध सुुरुवात करताना या षटकात एक चौकार ठोकत पाच चेंडू निर्धाव खेळले. अफगाणिस्तानविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत ६४ धावांची झुंजार खेळी करत सामनावीर पुरस्कार मिळविलेला सलामीवर मोहम्मद हुरैरा याच्यावर पाकला चांगली सुुरुवात करून देण्याची जबाबदारी होती. परंतु, सुशांत मिश्राने टाकलेल्या डावातील दुसर्‍या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर हुरैरा ‘स्क्वेअर लेग’कडे सोपा झेल देऊन परतला. कमरेपर्यंत उडालेला चेंडू पायांची हालचाल न करता खेळण्याचा प्रयत्न त्याच्या अंगलट आला. भारताने यानंतर पाकिस्तानी खेळाडूंवर दबाव टाकला. दुसरा सलामीवीर हैदर अलीने अधुनमधून चौकार ठोकत धावफलक हलता ठेवला. परंतु, दुसर्‍या टोकाने फहाद मुनीरला संघर्ष करावा लागला. तब्बल १५ निर्धाव चेंडू खेळल्यानंतर सोळाव्या चेंडूवर बिश्‍नोईने त्याचा काटा काढत भारताला दुसरे यश मिळवून दिले. तिसर्‍या यशासाठी मात्र भारताला वाट पहावी लागली. हैदर व कर्णधार रोहेल नाझीर यांनी संघाला २ बाद ३४ अशा नाजुक स्थितीतून बाहेर काढताना ६२ धावांची भागीदारी विणली. धोकादायक ठरत असलेली ही भागीदारी फोडण्यासाठी टीम इंडियाचा कर्णधार प्रियम गर्गने जैसवालकडे चेंडू सोपविला. कामचलाऊ लेगस्पिन गोलंदाज असलेल्या जैसवालने आपल्या पहिल्याच षटकात ही जोडी फोडली. टप्पा पडून बाहेर जाणारा चेंडू वेगाने कट् करण्याच्या नादात हैदरने बिश्‍नोईकडे झेल दिला. जैसवालने घेतलेली ही विकेट पाकिस्तानी डावातील ‘टर्निंग पॉईंट’ ठरला. यानंतर समन्वयाच्या अभावामुळे कासिम अक्रम याला धावबाद होऊन तंबूत परतावे लागले. हलक्या हाताने चेंडू खेळून कर्णधार नाझीरने कासिमला धाव घेण्यासाठी ‘कॉल’ केल्यानंतर कासिम अर्ध्या वाटेवर जाऊन परत ‘नॉन स्ट्राईकर’च्या दिशेने वळला. परंतु, नाझीरने कासिमपूर्वी क्रीझमध्ये बॅट टेकवत आपली विकेट राखली. अंकोलेकरने स्ट्राईकरच्या दिशेने चेंडू फेकल्यानंतर जुरेलने यष्ट्यांचा वेध घेत भारताला अजून एक यश मिळवून दिले. या ‘मजेशीर’ विकेटनंतर पाकिस्तानचे गडी ठराविक अंतराने बाद होत राहिले. त्यामुळे निर्धारित ५० षटकेदेखील त्यांना तग धरता आला नाही.

धावफलक
पाकिस्तान ः हैदर अली झे. बिश्‍नोई गो. जैसवाल ५६, मोहम्मद हुरैरा झे. सक्सेना गो. मिश्रा ४, फहाद मुनीर झे. अंकोलेकर गो. बिश्‍नोई ०, रोहेल नाझीर झे. तिलक वर्मा गो. मिश्रा ६२, कासिम अक्रम धावबाद ९, मोहम्मद हारिस झे. सक्सेना गो. अंकोलेकर २१, इरफान खान त्रि. गो. त्यागी ३, अब्बास आफ्रिदी पायचीत गो. बिश्‍नोई २, ताहीर हुसेन झे. जुरेल गो. त्यागी २, आमिर अली झे. वीर गो. मिश्रा १, मोहम्मद आमिर खान नाबाद ०, अवांतर १२, एकूण ४३.१ षटकांत सर्वबाद १७२

गोलंदाजी ः कार्तिक त्यागी ८-०-३२-२, सुशांत मिश्रा ८.१-०-२८-३, रवी बिश्‍नोई १०-०-४६-२, आकाश सिंग ७-०-२५-०, अथर्व अंकोलेकर ७–०-२९-१, यशस्वी जैसवाल ३-०-११-१
भारत ः यशस्वी जैसवाल नाबाद १०५ (११३ चेंडू, ८ चौकार, ४ षटकार), दिव्यांश सक्सेना नाबाद ५९ (९९ चेंडू, ६ चौकार), अवांतर १२, एकूण ३५.२ षटकांत बिनबाद १७६
गोलंदाजी ः ताहीर हुसेन ६-१-१७-०, कासिम अक्रम ८-०-३७-०, मोहम्मद आमिर खान ५-१-२०-०, अब्बास आफ्रिदी ७-०-५०-०, आमिर अली ५.२-०-३८-०, फहाद मुनीर ४-०-१२-०.