Home Featured समाजाच्या भल्यासाठी श्रीरामनाम जप चालूच ठेवा

समाजाच्या भल्यासाठी श्रीरामनाम जप चालूच ठेवा

0

श्रीमद्‌‍ विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामी यांचे आशीर्वचन

पर्तगाळ मठाच्या सार्ध पंचशताब्दी महोत्सवाची यशस्वी सांगता

श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळ मठाचा 11 दिवसांचा सार्ध पंचशताब्दी महोत्सवाची मोठ्या थाटात आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत सांगता झाली. हा महोत्सव म्हणजे समाज बांधवांची गुरूवर असलेली भक्ती, विश्वास आणि निष्ठा आणि स्वाम्यांचा शब्द याची प्रचिती असून संपूर्ण समाजाच्या भल्यासाठी यापुढे देखील मर्यादित स्वरूपात श्रीरामनाम जप चालूच ठेवावा, असे मत पर्तगाळ मठाधीश श्रीमद्‌‍ विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामी महाराजांनी आपल्या आशीर्वचनपर भाषणातून व्यक्त केले.

सार्ध पंचशताब्दी महोत्सव आपले गुरूस्वामी श्रीमद्‌‍ विद्याधीराज तीर्थ स्वामी आणि आपण दोघांनी मिळून साजरा करायला हवा होता. पंचशताब्दी आणि सपाद पंचशताब्दी गुरू स्वामींच्या उपस्थितीत झाली होती. त्यांच्या अनुपस्थितीत हा महोत्सव होत असला तरी त्यांची पुण्याई आणि आशीर्वाद त्यामागे लाभला आहे. केवळ अडीच वर्षांत हा जो विक्रम झाला आहे ती खरी स्वप्नपूर्ती असून त्यासाठी ज्या ज्या व्यक्तींनी योगदान दिले, कष्ट सोसले, स्वाम्यांचा शब्द प्रमाण मानून रात्रंंदिवस काम केले त्यांनी थोडे दिवस विश्रांती घ्यावी. मात्र, 120 जप केंद्रातून आवश्यक त्या वेळी श्रीरामनाम जप चालू ठेवावा, आणि तो केंद्र आणि उपकेंद्रातच चालू ठेवण्यात यावा. पर्तगाळ मठातील दशमीचा पालखी उत्सव खंडित झालेला आहे. त्याला चालना देण्यासाठी 120 केंद्रांपैकी पाच पाच केंद्रांचा एकेक गट मिळून दर एकादशीला पर्तगाळ मठात येऊन दशमीच्या पालखीला हातभार लावावा आणि एकादशीला श्रीरामनाम जप करावा असे यावेळी स्वामी महाराजांनी सांगितले.
पर्तगाळ मठात 24 ते 31 डिसेंबर पर्यंत खास भजनी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून यापुढे देखील समाज बांधव आणि मठाच्या अनुयायांनी त्यात भाग घ्यावा असे आवाहन स्वामी महाराजांनी यावेळी केले.

या धर्म सभा कार्यक्रमाच्या व्यासासपीठावर केंद्रिय मठ समितीचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपे, उपाध्यक्ष शिवानंद साळगावकर, आर. आर कामत, अवधूत तिंबले, अजित कामत, सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत, कला आणि संस्कृती मंत्री रमेश तवडकर, माजी केंद्रिय मंत्री सुरेश प्रभू, प्रदीप पै, दिनेश पै, रमेश नायक, अण्णाप्पा कामत, गोपाल प्रभू उपस्थित होते.
विद्याधर भट, गोवर्धन भट, शिरीष आचार्य, गणेश भट, महेश भट, श्रीधर भट, भास्कर भट यांच्या वेदघोषानंतर मठ समितीचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपे यांनी स्वागत केले आणि स्वामी महाराजांची पाद्यपूजा केली.

मान्यवरांचा सत्कार
या महोत्सवात महा अन्नसंतर्पण, अन्नसंतर्पण, संपूर्ण उदयास्त, अर्थ सहाय्य, मंडप व्यवस्था, वीजेची सोय आणि अन्य सुविधा दिलेल्या रामनाथ संस्थान, श्री महालक्ष्मी संस्थान, योगेश शिरदोणकर, श्री महालसा संस्थान, सारस्वत बँक, मूर्तीकार अनिल सुतार, माजी केंद्रिय मंत्री सुरेश प्रभू, कला व संस्कृती मंत्री रमेश तवडकर, पैंगीणच्या सरपंच सौ. सविता तवडकर, कारवारचे आमदार सतीश सैल, श्रीनिवास धेंपे, शिवानंद साळगावकर, गोपाल प्रभू, दिनेश पै, संजय रायतुरकर, वेंकटेश शानभाग, मुरलीधर नायक, जगदीश पै, प्रसन्ना आचार्य, गिरीश पै, पी. आर. नायक, विक्रम भट, व्यंकटेश नायक, मठातील कर्मचारी, सेवेदार, स्वयंस्ेवक या सर्वांचा शाल, भेटवस्तू देऊन स्वामी महाराजांनी यावेळी गौरव केला. यावेळी श्री महालक्ष्मी देवस्थानच्या श्रीराम नाम जप स्मरणिकेचे त्याचप्रमाणे भजन सप्ताहाच्या पत्रिकेचे स्वामी महाराजांनी अनावरण केले.

या कार्यक्रमाच्या पूर्वी हडफडे या ठिकाणी झालेल्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्रसन्ना प्रभू यांनी सत्कार मूर्तींचा परिचय केला. तर अयोध्या येथील श्री राम मंदिराचे एक घटक असलेल्या गोपाळ प्रभू यांनी आपल्या भाषणात देशात रामराज्य यायला हवे त्याचबरोबर सर्व मंदिरांत मोफत देवदर्शन व्हायला हवे असे मत व्यक्त केले. सूत्रसंचालन अनिल पै यांनी केले. या महोत्सवाचे निमंत्रक असलेले प्रदीप पै यांनी शेवटी आभार मानले. त्यानंतर महेश काळे यांचा ‘स्वर संध्या’ हा कार्यक्रम संपन्न झाला.

लाखो भाविकांची उपस्थिती
गेले 11 दिवस चाललेल्या या महोत्सवात गोवा तसेच कर्नाटकातील तीन लाखांपेक्षा अधिक भाविकांनी त्याचप्रमाणे गोव्यातील विविध शाळा, उच्च माध्यमिक विद्यालयांतील विद्यार्थी, शिक्षकांनी पर्तगाळचा जीर्णोंद्धारीत मठ परिसर आणि प. पू. श्रीमद्‌‍ विद्याधीश तीर्थ स्वामी महाराजांचे दर्शन घेतले.
550 वर्ष पूर्तीनिमित्त या ठिकाणी 77 फूट उंचीचा भव्य असा प्रभू श्रीरामाचा कास्य पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. 24 स्वाम्यांची परंपरा लाभलेल्या या आदर्श धामात प्रभू श्रीराम, श्री वीर विठ्ठल मंदिर, श्री इंदिराकांत भवन, थीम पार्क, प्रदक्षिणा मार्ग, मंदिरांना जोडणारी मार्गिका, मुख्य दालन परिसर, सुसज्ज असे सभागृह, मुख्य प्रवेशद्वार, भाविक व वैदिकांसाठी निवास स्थाने, अतिथीगृहे, प्रशस्त क्षयनगृह, गोशाळा, रथबिदीचा विस्तार, जवळ जवळ 550 सीसीटीव्हींची सोय, अत्याधुनिक प्रॉजेक्शन मॅपिंगची सोय करण्यात आली असून मठ वास्तुला भेट देणाऱ्या भाविकांनी या सर्व परिसराचे तोंड भरून कौतुक केले आहे.

स्वामींच्या कार्याचा गौरव
या अकरा दिवसांच्या कालावधीत मठाधीश श्रीमद्‌‍ विद्याधीश तीर्थ स्वामी, त्यांचे पट्टशिष्य श्रीमद्‌‍ विद्याराजेश्वर तीर्थ स्वामी, चित्रापूर मठाचे मठाधीश श्रीमद्‌‍ सद्योजत शंकराश्रम स्वामी, कवळे मठाचे मठाधीश श्रीमद्‌‍ शिवानंद सरस्वती यांनी मठाला भेट देऊन विद्यमान स्वामींच्या कार्याचा मुक्त कंठाने गौरव केला. या स्वामी महाराजांच्या उपस्थितीत मठ वास्तूचा जीर्णोद्धार, प्रभू श्री रामाची मूर्ती तयार करण्यासाठी परिश्रम घेतलेले अभियंते, 120 केंद्रे आणि 104 उपकेंद्रांतील श्रीरामनाम जपकार, देणगीदार, सेवादार, मठाचे कर्मचारी या सर्वांचा श्रीमद्‌‍ विद्याधीश तीर्थ स्वामी महाराजांच्या हस्ते शाल, प्रभू श्रीरामाची प्रतिकृती व स्मरणिका भेट देऊन सन्मान करण्यात आला.

संगीत मैफली संस्मरणीय
दररोज पहाटे नित्य पूजा, श्रीराम नाम जप, विद्वान रामकृष्ण भट यांचे वाल्मिकी रामायणावर पारायण, प्रवचन, शिबिकोत्सव, अष्टावधान, नौकाविहार, जलद्वीपोत्सव, मखरोत्सव या कार्यक्रमांबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमांची जणू मेजवानीच या महोत्सव काळात भाविकांना मिळाली. त्यात प्रतिथयश गायक कलाकार अनुप जलोटा, भालचंद्र प्रभू, रघुनंदन भट, शंकर महादेवन, विश्वजित बोरवणकर, शरयू दाते, मैथिली ठाकूर, महेश काळे, पुतुर नरसिंह नायक, उपेंद्र भट, मुंबईच्या अमृता शेणवी, कविता शेणवी, अर्चना कामत, शंकर शानभोगे यांच्या कार्यक्रमा बरोबरच गोव्यातील 15 देवस्थानांनी तयार केलेला नांदी कार्यक्रम, लोकविश्वास प्रतिष्ठानच्या दिव्यांग मुलांनी सादर केलेला गीत रामायण, युवा कलाकारांचा युवा गाती श्रीराम गीता, किरण कामत यांचे भक्ती संकीर्तन, कर्नाटकातील 55 युवा कलाकारांनी सादर केलेली गुरूवंदना आणि काणकोणाो सुपुत्र डॉ. प्रवीण गावकर यांनी 77 कलाकारांना घेऊन सादर केलेला ‘स्वर झंकार’ या सर्वांनी रसिकांची मने जिंकली. या संपूर्ण महोत्सव काळात भेट देणाऱ्या भाविकांच्या अन्न पाण्याची, भोजनाची व्यवस्था करणारे, त्याचप्रमाणे वाहतूक आणि अन्य महत्त्वाच्या गोष्टींवर नियंत्रण ठेवणाऱ्या स्वयंसेवक, पोलिस, वाहतूक पोलिसांनी एका प्रकारे विक्रमच केला असल्याच्या प्रतिक्रिया या भागातून ऐकायला मिळत आहेत.

पंतप्रधानांची उपस्थिती
या सार्ध पंचशताब्दी महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रिय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक, काणकोणचे आमदार तथा कला आणि संस्कृती मंत्री डॉ. रमेश तवडकर, केंद्रिय मठ समितीचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपे, उपाध्यक्ष शिवानंद साळगावकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.

या अकरा दिवसांत धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम, थीम पार्कजवळ खास वृक्षारोपण स्वामींच्या हस्ते करण्यात आले. सामाजिक सेवेचा भाग म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजन यावेळी करण्यात आले. एकाच वेळी कर्नाटक आणि गोव्यातील पाच रक्तपेढीने या रक्तदान शिबिरात भाग घेताना जवळ जवळ 632 जणांनी रक्तदान करताना एक नवा विक्रम केला.

वैद्यकीय शिबिराचे आयोजन
दोनापावल येथील मणिपाल इस्पितळाच्या सहकार्याने आयोजित केलेल्या वैद्यकीय शिबिराचा बऱ्याच जणांनी लाभ घतला. डॉ. शेखर साळकर आणि राजेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या वैद्यकीय शिबिरात शल्यचिकीत्सक डॉ. निखिल सोनटक्के, अस्थितज्ज्ञ डॉ. सुशांत मुन्निगट्टी, जनरल मेडिसिन डॉ. मिथिला आणि गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. पवन यांनी रुग्णांची तपासणी केली. या वैद्यकीय शिबिराचे समई प्रज्वलित करून डॉ. साळकर यांनी उद्घाटन केले. यावेळी प्रदीप पै, दिनेश पै, राजेश नाईक आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. पर्तगाळ मठाधीश श्रीमद्‌‍ विद्याधीश तीर्थ स्वामी महाराजांनी शिबिराला भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

सकाळच्या सत्रात नित्य हवन, श्री राम नाम जप पारायण, प्रवचन, सभा कार्यक्रम आणि देणगीदार, सेवादार आणि मठ कर्मचाऱ्यांचा सत्कार झाल्यानंतर रात्री महेश काळे यांचा ‘स्वर संध्या’ कार्यक्रम संपन्न झाला.
दरम्यान, केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी पर्तगाळ मठाला भेट देत श्रीमद्‌‍ विद्याधीश तीर्थ स्वामींचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. त्यानंतर त्यांनी पैंगीणचे श्री परशुराम मंदिर, पणसखंडे येथील श्री व्यंकटेश देवस्थान व श्रीस्थळ येथील श्री मल्लिकार्जुन मंदिराला भेट दिली.

मैथिली ठाकूर यांच्या गायनाने दुमदुमली पर्तगाळ नगरी

श्री गोकर्ण पर्तगाळ मठाच्या सार्ध पंचशताब्दी महोत्सवात बिहारच्या युवा आमदार असलेल्या गायिका मैथिली ठाकूर यांनी आपल्या ओजस्वी गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध करताना संगीताच्या तालावर संगीतप्रेमींना अक्षरशः नाचविले. मैथिली ठाकूर यांच्या गायनाने अवघी दुमदुमली पर्तगाळ नगरी असा अनुभव या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या रसिकांनी घेतला.

श्री सार्ध पंचशताब्दी महोत्सवाच्या 10 व्या दिवशी ‘भजन संध्या’ या कार्यक्रमात मैथिली ठाकूर यांनी हिंदी, मराठी आणि कन्नड भजने सादर करून रसिकांची मने जिंकली. पर्तगाळ मठाधीश श्रीमद्‌‍ विद्याधीश तीर्थ स्वामी महाराजांनी स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांचे कौतुक केले. यावेळी स्वामींनी मठातर्फे खास श्री प्रभू रामाची प्रतिकृती भेट देऊन त्यांचा गौरव केला.