>> आदिवासी समाजातील 950 लाभार्थी विद्यार्थिनींकडून रकमेवर दावाच नाही
>> रकमेवर दाव्यासाठी 90 दिवसांची मुदत; अन्यथा रक्कम सरकारी तिजोरीत
आदिवासी कल्याण खात्याकडून राबवल्या जाणाऱ्या विद्या लक्ष्मी योजनेची मागील आठ वर्षांतील सुमारे 950 लाभार्थी विद्यार्थिनींच्या मुदत ठेवीची रक्कम पडून आहे. ही रक्कम जवळपास अडीच कोटी रुपयांच्या घरात पोहोचत असून, ती 2 कोटी 37 लाख 50 हजार रुपये एवढी आहे.
दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर अनुसूचित जमातीतील (एसटी) मुलीच्या नावे ठेवली जाणारी 25 हजार रुपयांची रक्कम बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर तिला दिली जाते. वर्ष 2011-2012 ते 2018-2019 या काळातील सुमारे 950 लाभार्थी विद्यार्थिनींनी त्यांच्या नावावरील मुदत ठेवीवर दावा केलेला नाही. या योजनेच्या मुदत ठेवीवर दावा न केलेल्या लाभार्थ्यांची यादी आदिवासी कल्याण खात्याच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली असून, संबंधितांनी 90 दिवसांच्या आता आपल्या मुदत ठेवीवर दावा करावा; अन्यथा ही मुदत ठेवीची रक्कम सरकारी तिजोरीत जमा केली जाणार आहे, असे आदिवासी कल्याण खात्याने कळविले आहे.
आदिवासी कल्याण खात्याकडून आदिवासी समाजातील मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी ‘विद्या लक्ष्मी’ नावाची योजना राबविण्यात येत आहे. या योजनेनुसार दहावी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आणि पुढील शिक्षणासाठी अकरावीत कोणत्याही शाखेत प्रवेश घेणाऱ्या एसटी समाजातील मुलीच्या नावावर मुदत ठेवीद्वारे 25 हजार रुपये ठेवले जातात. सदर मुलगी शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षा 3 प्रयत्नांत किंवा पहिल्या प्रयत्नाच्या 2 वर्षांच्या आत उत्तीर्ण झाल्यानंतर तिला ही मुदत ठेवीची रक्कम दिली जाते. बारावी परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्रांसह विहित नमुन्यात सादर केल्यावर मुदत ठेव संबंधित विद्यार्थिनीच्या खात्यात जमा केली होते. सदर मुदत ठेवीच्या रकमेचा वापर विद्यार्थिनी आपल्या पुढील शिक्षणासाठी करू शकते. मागील आठ वर्षांत सुमारे 950 विद्यार्थिनींना मंजूर झालेल्या मुदत ठेवीवर दावा करण्यात आलेला नाही.
दावा न केलेल्या लाभार्थी मुलींची नावे संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली आहे. आदिवासी कल्याण संचालनालय पणजी किंवा मडगावातील उपविभाग कार्यालयात मुदत ठेवीवर दावा करणारा अर्ज लाभार्थी करू शकतात. येत्या 90 दिवसांत मुदत ठेवीवर दावा न केल्यास सदर रक्कम जप्त करून राज्य सरकारच्या तिजोरीत जमा करण्यात येणार आहे.