लोकप्रिय गझल गायक पंकज उधास यांचे निधन

0
4

>> मुंबईत 72 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

आपल्या जादुई आवाजाने रसिकांच्या मनावर मोहिनी घालणाऱ्या आणि विविध गझल गाणाऱ्या गायक पंकज उधास यांचे काल सकाळी 11 वाजता उपचारादरम्यान निधन झाले. ते 72 वर्षांचे होते. पंकज यांच्या कन्या नायाब उधास यांनी सोशल मीडियाच्या माध्यतूान ही माहिती दिली. गीते, गझल या प्रांतात स्वच्छंदपणे वावरणारा एक कलाकार काळाच्या पडद्याआड गेला आहे. ‘चिठ्ठी आयी है..’ ही त्यांची गझल अजरामर होती, आहे आणि राहिल यात काही शंकाच नाही.

पंकज उधास यांच्या निधनाने संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांना आजाराने ग्रासले होते. मागच्या दहा दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते; मात्र काल अखेर त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली. पंकज उधास यांच्या पार्थिवावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांची सिनेसृष्टीतील आणि संगीतातील कारकीर्द ही अतिशय मोठी होती. त्यांच्या गझल, त्यांची अनेक गाणी चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय होती.

पंकज उधास यांचा जन्म 17 मे 1951 रोजी गुजरातमधील जेतपूर येथे झाला. तीन भावांमध्ये ते सर्वात लहान होते. त्यांचे कुटुंब राजकोटजवळील चरखाडी नावाच्या गावातील एका कसब्यात राहत होते. पंकज उधास यांनी त्यांच्या संगीत विश्वातील करिअरची सुरुवात वयाच्या सहाव्या वर्षापासून केली होती. त्यांच्या घरातच त्यांना गाण्याचे संस्कार लाभले. संगीताच्या दुनियेत मुंबईत ते आले आणि इथलेच झाले. 1980 ते 1990 च्या दशका ते भारतातील सर्वात लोकप्रिय गझल गायक बनले. त्यांनी त्यांच्या मृदू आवाजाने भारतीयांचे मन जिंकले होते.

कॅसेटच्या काळातला हिट गायक
कॅसेटचा काळ असतानाचा सुपरहिट गायक अशी पंकज उधास यांची ओळख होती. ‘ना कजरे की धार’, ‘आज फिर तुमपे प्यार आया है..’ ‘जिये तो जिये कैसे’, ‘और आहिस्ता’, ‘एक तराफा उसका घर’, ‘मैं नशे मे हू’, ‘मैं पिता नही हू’ अशी किती तरी गाणी आहेत जी आजही प्रेक्षकांना आठवतात ती त्यांच्या शब्दांमुळे आणि पंकज उधास यांच्या मधुर आवाजामुळे.