अर्थसंकल्पाच्या कार्यवाहीसाठी दरमहा 2 आढावा बैठका

0
10

>> मुख्यमंत्र्यांची माहिती; प्रत्येक खात्याला महसूल संकलनाचे उद्दिष्ट

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी वार्षिक अर्थसंकल्पाच्या अंमलबजावणीच्या संदर्भात सरकारच्या सर्व सचिवांची एक महत्त्वपूर्ण बैठक काल घेतली. राज्याच्या आर्थिक वर्ष 2023-24 च्या अर्थसंकल्पातील नवीन योजना, आर्थिक, प्रशासकीय नियोजन, कायद्यातील नवीन सुधारणा या गोष्टींकडे प्राधान्यक्रमाने लक्ष देण्याची सूचना करण्यात आली आहे. आपण अर्थसंकल्प कार्यवाहीच्या विषयावर चर्चेसाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी आढावा बैठक घेणार आहे, तर मुख्य सचिव प्रत्येक महिन्याच्या अखेरच्या सोमवारी आढावा बैठक घेणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना काल दिली.

राज्य सरकारच्या सर्व सचिवांना अर्थसंकल्पाच्या कार्यवाहीसाठी खाते प्रमुखांची बैठक घेऊन नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. खात्याच्या नवीन योजनांची कार्यवाही, प्रकल्पासाठी आर्थिक नियोजन, पायाभरणी, प्रकल्प उद्घाटन, कायद्यातील सुधारणा आदी गोष्टींबाबत सविस्तर माहिती देण्याची सूचना करण्यात आली आहे. अर्थसंकल्पात घोषित करण्यात आलेल्या एखाद्या योजनेची कार्यवाही कुठल्या महिन्यापासून केली जाणार आहे, याबाबत आराखडा तयार करण्याची सूचना केली आहे. सरकारचे सचिव आणि खातेप्रमुखांना कामाचे ‘लक्ष्य’ निश्चित करून त्याच्या पूर्ततेसाठी कार्यरत होण्याची सूचनाही केली आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

कर्ज कमी, महसूल अधिक असे लक्ष्य
राज्य सरकारचा महसूल वाढविण्यावर भर देण्याची सूचना करण्यात आली आहे. गत 2022 मध्ये साधारण 30 टक्के महसूल वाढ करण्यात यश प्राप्त झाले आहे. प्रत्येक खात्याला महसूल गोळा करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. महसूल, जीएसटी, पीडब्लूडी आदी खात्यांच्या महसुलात वाढ झाली आहे. राज्य सरकारचा महसूल वाढवून कर्जाचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.