चिंताजनक! यंदा मान्सून सरासरीपेक्षा कमी कोसळणार : स्कायमेट

0
12

>> ‘एल निनो’च्या धोक्यामुळे यंदाच्या मान्सूनवर विपरित परिणाम शक्य

यंदा मान्सून पाऊस सरासरीपेक्षा कमी पडेल, असा अंदाज ‘स्कायमेट’ या खासगी हवामान संस्थेने वर्तवला आहे. जून-सप्टेंबर या काळातील मान्सून सामान्य प्रमाणापेक्षा कमी असेल. हे प्रमाण 94 टक्के असणार आहे. त्यामुळे देशातील अन्नधान्य उत्पादन करणाऱ्या शेतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. ‘एल निनो’च्या धोक्यामुळे यंदाच्या मान्सूनवर विपरित परिणाम होणार असल्याचे स्कायमेटने म्हटले आहे. स्कायमेटच्या या भाकितामुळे देशभरातील शेतकऱ्यांची चिंता मात्र वाढली असून, समाधानकारक पाऊस पडावा, अशी आस शेतकरी बाळगून आहे.

स्कायमेटचे व्यवस्थापकीय संचालक जतिन सिंह म्हणाले, ‘ट्रिपल-डिप’ला निनामुळे गेल्या सलग चार वर्षांमध्ये नैऋत्य मोसमी पावसाचे प्रमाण सामान्य किंवा सामान्यपेक्षा राहिले. आता ‘ला निना’ संपला आहे आणि ‘एल निनो’ची शक्यता वाढत असून, पावसाळ्यात त्याचा प्रभाव अधिक असण्याची शक्यता आहे. ‘एल निनो’च्या पुनरागमनामुळे यंदा मान्सूनवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
स्कायमेटनुसार, गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात यंदाच्या मान्सूनमध्ये अपुरा पाऊस पडेल, तर पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये सामान्य सरासरीपेक्षा कमी मान्सून पाऊस पडेल.

‘एल निनो’ आणि ‘ला निना’ म्हणजे काय?
संपूर्ण जगाच्या हवामानावर आणि पर्जन्यमानावर ‘एल निनो’चा थेट परिणाम होतो. ‘एल निनो’ या स्पॅनिश शब्दाचा अर्थ ‘बालयेशू किंवा छोटा मुलगा’ तर ‘ला निना’ म्हणजेच ‘लहान मुलगी’ असा होतो. दर दोन ते सात वर्षांनी ‘एल निनो’ परिणाम घडतो. भारतात गेल्या 50 वर्षांत पडलेले 13 पैकी 10 दुष्काळ एल निनोशी निगडित आहेत.