>> जमीनमालकाविरुद्ध गुन्हा नोंद; प्रधान मुख्य वनसंरक्षकांना चौकशीचा आदेश
कोपार्डे-सत्तरी येथे सापळ्यात अडकून एका बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. कोपार्डे येथील शेख सायराबानू शेख तालब यांच्या मालकीच्या जागेत डुकाराच्या शिकारीसाठी केबलचा वापर करून सापळा लावला होता; परंतु त्या सापळ्यात बिबट्या अडकून त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी जमीनमालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून, या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे वनमंत्री विश्वजीत राणे यांनी काल स्पष्ट केले.
सविस्तर माहितीनुसार, कोपार्डे येथे शेख सायराबानू शेख तालब यांच्या मालकीची जागा आहे. ही जागा वाळपई-कोपार्डे रस्त्यापासून अगदी जवळ आहे. या जागेत रानटी डुकराच्या शिकारीच्या उद्देशाने शिकार्यांनी सापळा लावला होता; मात्र गुरुवारी रात्रीच्या सुमारास त्यात बिबट्या अडकला. बिबट्या सुटका करण्याचा प्रयत्न केला; मात्र सापळ्यासाठी केबलचा वापर केल्याने त्याचे प्रयत्न अपुरे ठरले आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती काही स्थानिक लोकांनी वाळपई वन विभागाच्या अधिकार्यांना दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. सहायक वनपाल विश्वास चोडणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार सदर घटनेचा पंचनामा केला असून, जमीनमालकाविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.
दोषींविरुद्ध कारवाई होणार : राणे
वनमंत्री विश्वजीत राणे यांनी कोपार्डे येथे वन्य प्राण्यांची शिकार करण्यासाठी लावण्यात आलेल्या सापळ्यात अडकून बिबट्याच्या मृत्यू प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, प्रधान मुख्य वनसंरक्षकांना चौकशीचा आदेश काल दिला. तसेच सापळे लावून वन्य प्राण्यांची शिकार करणार्यांची गय केली जाणार नाही. त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असेही राणे यांनी स्पष्ट केले.