- डॉ. अनुजा जोशी
आपण- माणूसच का नव्या जुन्याच्या मोजमापात, नव्या जुन्याच्या हिशेबात? मी सकाळी बघितलेल्या दृश्याप्रमाणे निर्मळ, निर्लेप, आनंदी आपल्याला का जगता येत नाही? निसर्गाचा घटक बनून का राहता येत नाही? आता या नव्या नव्या वर्षात तरी असं नितळ, पारदर्शी, प्रांजळ व नैसर्गिक जगण्याचा प्रयत्न आपण करायला हवा…
आमच्या घरासमोर रस्त्यापलीकडे दोनतीन कुंबयाची झाडं आहेत. सागवान आहेत. भला मोठा सातवीण वृक्ष आहे. आज सकाळीच यातली कुंबयाची झाडं ज्येष्ठ नागरिकांसारखी मुलांबरोबर खेळताना दिसली. मधे आजोबा-आजी असावेत आणि सभोवती मुलं बागडत असावीत तसं दृश्य होतं. झाडांची पानं कोवळ्या किरणात लिकीलिकी हलत होती. कोवळ्या कोवळ्या हालचाली नुसत्या पानापानांत दिसत होत्या. झाडातून इकडे-तिकडे सूर मारत, चेंडू घेऊन परत झाडात येतानाची झुंबड उडाली होती. म्हटलं, खरोखरच ही काही ‘सकाळभूल’ आहे की काय? म्हणून हातातला चहाचा कप सावरत पुढे गेले. बारकाईने पाहते तर एक भला मोठा सातभाई पक्ष्यांचा थवा पानापानांआडून नाचत-बागडत होता. ‘कीक् कीक् कीक् कीक् किरिक् टिरिक् किरिक् टिरिक्ऽऽ’ आरडाओरड नुसती. सातभाईंच्या आवाजाला किलबिल म्हणता येत नाही. ते वचावचा करत असतात. झुरऽऽ झुरऽऽ झुरऽऽ झुरऽऽ सरळ रेषेत सूर मारत फिरतात. आपण वहीची पानं फाडायचो. घड्या घालून छोटी-छोटी विमानं करायचो. झुईऽऽक् करून उडवायचो. ती कशी तिथल्या तिथे उडायची, सरळ रेषेत पडायची तसा दिसतो सातभाईंचा थवा नाचताना, बागडताना, दाणे टिपताना, सूर मारताना. सरळ रेषेत बाणासारखे, पिसासारखे ते सूर मारतात. रंग करडा. सुकलेल्या गवतासारखा. हाताच्या ओंजळीत मावेल एवढा हा पक्षी. आकाराने फुगरा गब्बू. डोळा भेदक. अगदी उठून दिसतो. नजरेत भरतो. शेपटीचा पंखा करत ही खाकी कागदाची विमानं झुरू झुरू झुरू फांदीतनं जमिनीवर, गवतात उड्या मारत फिरतात. घाईघाईने काहीबाही टिपतात. सातभाई कधी एकटा दिसत नाही. दहा-बारा-पंधरांचा थवाच आसपास बागडत असतो. म्हणून ते ‘सातभाई.’ वसाहतवादी जणू. समूहाने राहणारे. आज यांच्याबरोबर एक कोतवालाची जोडीही खेळायला आलेली दिसली. एखादे दादा-ताई मध्येच येऊन एखाद दुसरा चेंडू टाकून जावेत तसे. बुलबुल, सातभाईंसारखी छोटी पाखरं कोतवाल पक्ष्यांच्या राखणीत घरटी बांधतात. त्यांच्या घरट्याजवळ. कोतवाल नावाप्रमाणेच काम करतो. बारक्या पक्ष्यांच्या अंडी-पिल्लं-घरट्यांचं रक्षण करतो.
आज या खेळात मध्येच एक खार गडग्यावरून घाईघाईने पळत आली. शेपटीची गिरकी मारून, जरा या खेळणाऱ्यांची खबर घेऊन तुरूतुरू परत गेली. सातभाई पुन्हा किरीकिरी करत नाचू लागले. इतक्यात शेजारच्या किंजळीच्या झाडाचा नुकताच आलेला तांबडा फुलोरा गदगद हलला. पानांनी टाळ्या वाजवल्या. बघते तर शेपटीचा पंखा फिरवत भारद्वाज आडव्या फांदीवरून उतरत होता. त्याचं मोठ्ठं विमान खाली उतरलं तेव्हा मात्र सातभाई घाबरले. मोठा गलका झाला. कॅक् कॅक् कॅक् किरीकिरी कर्कश्श आवाज करत दूर पांगला… आता हिरवेगार आजोबा धुक्यात ओले ओले चमचमत प्रसन्न दिसताहेत. पाखरांबरोबरचा खेळ आवरून थोडावेळ कोवळ्या उन्हात निवांत बसले आहेत!
…मी खरं तर वेगळ्याच कारणासाठी दारात येऊन चहा पित बसले होते. मला नव्या वर्षाचं काहीतरी लिहायचं होतं. खूप वेगवेगळे अनुभव यंदा गाठीला बांधले गेले. आशा-निराशा, उमेद- हताशा, आनंद-दु:ख, सन्मान-अपमान, मान-अवमान, उभारी-खचलेपण,
आरोग्य-अनारोग्य असे सर्वांनाच येणारे अनुभव मलाही गेल्या वर्षाने दिले. आठवू लागले तसतसे असे लक्षात आले की, चांगले अनुभव माणसांकडूनच मिळालेले आहेत तसे सारे वाईट अनुभवही माणसांनीच आपल्याला दिलेले आहेत. एकही वाईट अनुभव निसर्गाने, झाडापेडांनी, प्राण्यापाखरांनी दिलेला आठवेना. आता हो, पाऊस खूप झाला. माझी खूप कष्टांनी लावलेली फुलझाडं, फळझाडं, भाज्या बऱ्याच यंदा कुसून गेल्या. पण हा दोष मला पावसाला द्यावा असं वाटलं नाही. अवर्षण, अतिवर्षा ही माणसाच्याच कर्तृकीची फळं आहेत. तर हे हिरवे रान, प्राणी, पाखरं कायमच एक ताजा, आनंदी व चैतन्यमयी अनुभवच हातात घेऊन आपल्यासाठी वर्षभर वावरले. अशा विचारात मी समोरच्या झाड व पाखरांच्या खेळकर दृश्यात रंगून गेले. लेख लिहायला बाहेर बसले होते, पण समोर दिसलं हे सारं आणि मनात आलं, मनातून कागदावर उतरलं ते हेच सारं… एका अर्थाने आपल्या आयुष्याचं प्रतिबिंब निसर्गाचा एखादा तुकडाही आपल्या जीवनाचं असं संपूर्ण प्रतिबिंब दाखवू शकतो. नव्या वर्षाचा एक छान मंत्रच आपण निसर्गाकडून घेऊ शकतो की, माणसांपेक्षा निसर्ग बरा. सोशल मीडियापेक्षा हा हिरवा मीडिया खूप बरा. माणसांच्या वाईट अनुभवात पोळण्यापेक्षा असे रोजच जास्तीत जास्त जमेल तेवढा वेळ झाडापेडांत, प्राण्यापाखरांत रममाण होणं हे तनामनाला स्वास्थ्य देणारं ठरेल. वनमहर्षी कै. मारुती चितमपल्लींनी त्यांच्या लेखनात रानावनातल्या विलक्षण सौख्यदायी ‘शांतता’ या पवित्र गोष्टीकडे लक्ष वेधलेले आहे. एक सुंदर, गाढ व निरोगी अशी तनामनाची शांतता रानेवने, प्राणी-पाखरेच आपल्याला देऊ शकतात.
मी पुढे विचार करू लागले की, अरे खरंच की निसर्गात कुठे कधी आपल्यासारखं एखादं वर्ष संपतं, नवं सुरू होतं? काळ अखंडपणे वाहतो आहे, तसा निसर्ग अखंडपणे फुलतो, बहरतो आहे. पाणी अखंड वाहत आहे, वारा सतत न्हाऊ घालतो आहे, झाडं सतत सावली देत उभी आहेत. मग आपण- माणूसच का नव्या जुन्याच्या मोजमापात, नव्या जुन्याच्या हिशेबात? मी वर बघितलेल्या दृश्याप्रमाणे निर्मळ, निर्लेप, आनंदी आपल्याला का जगता येत नाही? निसर्गाचा घटक बनून का राहता येत नाही? आता या नव्या नव्या वर्षात तरी असं नितळ, पारदर्शी, प्रांजळ व नैसर्गिक जगण्याचा प्रयत्न आपण करायला हवा असं मनापासून वाटलं.
यंदा नव्या वर्षात नवी उभारी, नवी भरारी हे शब्द जगून तरी पाहू…
ज्येष्ठ कवयित्री शांताबाई शेळकेंची एक सुंदर कविता आठवली. शोधून काढली.
कुठले पुस्तक कुठला लेखक
लिपी कोणती कसले भाकित
हात एक अदृश्य उलटतो
पानामागुन पाने अविरत
गतसालाचे स्मरण जागता
दाटुन येते मनामध्ये भय
पान हे नवे यात तरी का
असेल काही प्रसन्न आशय
अखंड गर्जे समोर सागर
कणाकणाने खचते वाळू
तरी लाट ही नवीन उठता
सजे किनारा तिज कुरवाळू
स्वतः स्वतःला देत दिलासा
पुसते डोळे हसता हसता
उभी इथे मी पसरून बाहू
नवीन वर्षा तुझ्या स्वागता
शांताबाईंनी हे असं स्वागत केलंय नववर्षाचं.
खूप उत्साह, उमेदीनं भरलेलं, वाईटसाईट मागं टाकून नव्या ऊर्जेनं पुढची वाट धरणारं, बळ देणारं हे नववर्षाचं स्वागत भलं-बुरं कवळून सकारात्मकतेनं पुढं जायला सांगतं.
कविवर्य आरती प्रभूंनी मात्र आपल्या आर्त, चिंतनशील स्वभावधर्मानुसार नव्याने सुरू होण्याची एक वेगळी रीत सांगितली.
अखेरच्या वळणावर यावा
मंद सुगंधी असा फुलोरा
थकले पाऊल सहज उठावे
आणि सरावा प्रवास सारा…!
- हा सरलेला प्रवास कष्टांचा, संघर्षाचा, यातायातीचा, अडचणींचा आहे. तो पार व्हावा व पार करताना ‘मंद सुगंधी फुलोरा’ यावा अशी इच्छा आहे. ‘शेवटचा दिस गोड व्हावा’ अशी ही प्रार्थना आहे.
या सगळ्यातून काही उबदार हाती घेऊन आपणही पुढे सरायला हवं. ‘जुनं सरलं, नवीन भरलं’ असं म्हणत जुनं पान मागे टाकून नव्या वर्षाचं नवीन पान उघडून तर पाहू. किंवा ‘जुनं स्मरलं, नवीन स्फुरलं’ असं म्हणून नव्या वर्षाच्या नव्या वळणावर नवं काही लिहायला, नवं काही करायला तर लागू!
खरं तर तोच सूर्य, तोच चंद्र, वारा, पाणी तेच. सूर्योदय तसाच. सूर्यास्तही कालच्यासारखाच. पण माणसाने तोच-तोचपणा, कंटाळवाणेपणा, साचलेपणा यावर म्हणजे ‘थांबलेपणा’वर मात करण्यासाठी अनेक युक्ती शोधून काढल्या. अविरत वाहणाऱ्या काळाचे त्याने आपल्या सोयीनुसार भाग केले. खंड केले. विभागणी केली. त्यातून युगं, वर्षं, महिने, पंधरवडे, आठवडे तयार केले. घड्याळ तयार झालं. आकडे आले. काटे फिरू लागले. कालनिर्णय झाला. काळाचं मोजमाप करणं शक्य झालं. काळाचं मोजमाप, जुनं वर्ष, नवं वर्ष ही माणसाच्या कल्पकतेची चमचमती शिखरं आहेत. म्हणून तर आपण तयार केलेल्या शिखरांवरून भल्याबुऱ्याचा, सुखदुःखाचा हिशेब करायचा. सुपात दाणे पाखडावेत तसं गतवर्ष पाखडायचं. हलकं, गमावलेलं, त्रासदायक, मनस्ताप देणारं, कटू, जहाल, नुकसानकारक, लाचारीचं, आळसाचं, बथ्थडपणाचं,
नकारात्मक सगळं मागं टाकायचं. दळदार, दाणेदार तळाशी शिल्लक राहिलेलं असेल त्याची शिदोरी कनवटीला बांधून पुढचा रस्ता धरायचा. नवीन वर्षाचं स्वागत करताना आम्ही काही लिहिण्यामागील, तुम्ही काही वाचण्यामागील खरा उद्देश हाच! नकारांची पाठवणी, संस्कारांची जोडणी.
खरं तर आज सोशल मीडियाने प्रचंड धुमाकूळ घातलेल्या युगात आपण जगतो. हर दिन, हर क्षण आपल्या समोरच्या स्क्रीनवर गदारोळ सुरू असलेला आपण पाहतो. मनाची शांती, एकतानता, समाधान व स्वास्थ्य- शरीराचे व मनाचेही सतत ढवळून निघून गढूळ गढूळ विषारी करत राहणारा हा भयावह काळ आहे. नाउमेद करणाऱ्या घटना हर क्षण वाट्याला येतात. निराशेचे क्षण आयुष्य गदळवून टाकतात. वंचना, फसवणूक पदरात पडते. अपमान, अवमान होत असतात. वितंडवाद, मतभेद, कलह थैमान घालत असतात. अत्याचार, दरोडे, गुन्हेगारी, शोषण, हिंसा, दंगली, धर्मविद्वेष, धर्मांधता, धर्म, संस्कृती, साहित्य, भाषेच्या नावाखाली स्वार्थाचा बाजार, मोर्चे, आंदोलनं, लाचारी, स्वाभिमानशून्यता अशा सर्व गदारोळात लोक सतत ओरडत असतात, आक्रोश करत असतात, अस्वस्थ असतात. सोशल मीडियाला चव्हाट्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. समाजकारणी, राजकारणी लोक तर उच्छादाचा विडाच उचलल्यासारखे आपल्या सामान्य जगण्यावर कायदेशीर सत्ता गाजवत असतात. पैशाने सामान्यांना विकत घेत असतात. श्रद्धा, भक्ती, निष्ठा, कृतज्ञता, नाती, प्रेम, सहृदयता, मानव्य अशी जगण्याच्या उदात्त मूल्यांची, विश्वासाची चिरफाड झालेली दिसते. विश्वासघात, मतभेद, फाटाफूट, चिरफाळ्या नि परकेपणाच्या ठेचा लागतात. बघावं जो तो तुटलेला, विदीर्ण, असंतुष्ट, तक्रारखोर, भांडकुदळ, बेपर्वा, बेजबाबदार, असंस्कृत. भौतिक प्रगतीच्या वाटेवरची आपण माणसे दिवसेंदिवस असंस्कृत, असहिष्णू, असमंजस आदिमानवासारखी बनत चाललो आहोत. एका बाजूला जगण्याचे रंगरंगीले सुंदर प्रगत विकसित दर्शन व दुसरीकडे ही भयाण अमानवी कुरूपता! आणखी खूप काही लिहिता येईल, विचारात घेता येईल.
नव्या-जुन्याच्या सांध्यावर आपल्या हातातले नाणे आपण असे उलटसुलट फिरवून पाहायला हवे.
गेल्या वर्षीच्या चुकांचा रस्ता नव्या उजेडात पुन्हा निरखून पाहायला हवा. गेल्या वर्षाचं एखादं अपयश कशामुळे आलं याचं कारण स्वतःमध्ये शोधून काढायला हवं. गेल्या वर्षी एखाद्याला बोललेला कटू शब्द माफी मागून परत घ्यायला हवा. एखाद्याचा केलेला अपमान क्षमाशीलतेने समजून घ्यायला हवा. तोडलेलं नातं पुन्हा हात देऊन जोडायला हवं.
पैसा, मानमरातबासाठी केलेली लाचारी यंदा झुगारून द्यायला हवी. सोसलेल्या अन्यायाला वाचा फोडायला हवी. आपणच सुस्त झोपवलेल्या आत्मसन्मानाला जागवायला हवं. अर्धवट सोडलेल्या संघर्षाला बळ द्यायला हवं. विषाच्या वेलीला खत दिलंय का, पैशाला मत दिलंय का तपासायला हवं. नाती तोडलीयत का, माती सोडलीय का पाहायला हवं. कामाची टंगळमंगळ केलीय का, सुखाची व फुकटची चंगळ केलीय का पाहायला हवं. शिष्टाचार मोडला, भ्रष्टाचार केला, काय किती अनिष्ट आचार-विचार केला तपासायला हवं. शिस्त मोडून किती अपघात केले, स्वैराचाराने घर मोडले, माणसं तोडली ते पाहायला हवं. नशा व व्यसने किती केली, औषधपाणी, योग आणि आसने किती केली याचा हिशेब करायला हवा. कचरा किती निर्माण केला, किती साफ केला, झाडं किती लावली, किती तोडली, किती जपली, वाढवली याचीही पडताळणी करायला हवी.
नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी सकाळीच घरासमोरच्या झाडापेडांनी, पाखरांनी एक नवी दृष्टी दिली. काळ कधीच नवा-जुना होत नाही, तो अखंड वाहत असतो. आपण जुने होतो, ते नव्याने जगू लागायला हवं असाच खेळ मांडलेला दाखवला. ‘जुनं सरलं, नवीन भरलं’ किंवा ‘जुनं स्मरलं, नवीन स्फुरलं’ अशीच ही किमया-
जीर्ण कालचा पान पतेरा
फुलून येईल – नवा फुलोरा
मुळे जुन्या मातीत शिरावी
आणि फुटावी – नवी पालवी
जुन्याच दगडामधुनी गाणी
गात नदीचे – नवीन पाणी
जुना जुना सलणारा काटा
अलगद काढू – नवीन वाटा
नवीन वाटा, नवीन हर्ष
जुनी पावले – नवीन वर्ष!
आधुनिकतेचे हे आणखी एक नवे पर्व सुरू होताना, या नववर्षाच्या सर्वांना हिरव्यागार प्रसन्न शुभेच्छा!