प. बंगालमधील एका 36 वर्षीय स्थलांतरीत कामगाराचा पोलीस कोठडीत झालेल्या कथित मारहाणीमुळे मृृत्यू झाल्याच्या प्रश्नावरून वाद निर्माण झाला आहे. मृत कामगाराचे नाव देवानंद साना असे असून तो पश्चिम बंगालचा रहिवासी आहे. चोरीच्या संशयावरून स्थानिक नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते, असा आरोप आहे.
मृताच्या कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार देवानंद याला 26 डिसेंबर रोजी बांबोळी येथील मानसोपचार व मानवी वर्तन संस्था येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याची प्रकृती बिघडल्यानंतर त्याला गोवा वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले. उपचार चालू असताना गोमेकॉत 30 डिसेंबर रोजी त्याचे निधन झाले. पोलीस कोठडीत असताना देवानंद याला पोलिसांकडून जबर मारहाण झाली असावी असा त्याच्या कुटुंबियांचा आरोप असून याविषयी निष्पक्षपणे चौकशी व्हावी, अशी कुटुंबीयांनी मागणी केली आहे.