Home Featured दोन्ही प्रकल्पांना सर्व शक्तीनिशी विरोध करणार

दोन्ही प्रकल्पांना सर्व शक्तीनिशी विरोध करणार

0

चिंबलवासीयांनी दिला ‘युनिटी मॉल’ व ‘प्रशासन स्तंभ’विरोधातील जाहीर सभेत इशारा

‘युनिटी मॉल’ व ‘प्रशासन स्तंभ’ या प्रकल्पांच्या नावाखाली गोवा सरकार चिंबल व आजुबाजूचा निसर्ग संपन्न परिसर व तेथील सुपीक शेत जमीन बिल्डर लॉबीच्या घशात घालू पाहत आहे. मात्र, आम्ही ते होऊ देणार नसून सरकारचा हा डाव सर्वशक्तीनिशी हाणून पाडला जाईल. चिंबल येथील तोयार तलावाच्या परिसरात प्रस्तावित हे दोन्ही प्रकल्प जोपर्यंत पूर्णपणे रद्द होत नाही, तोपर्यंत साखळी उपोषण आणि आंदोलन सुरूच ठेवू असा इशारा काल चिंबलवासीयांनी पणजी-जुने गोवे बगलमार्ग महामार्गावर आयोजित केलेल्या एका भव्य सभेतून गोवा सरकारला दिला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी तसेच जाहीर सभेला उपस्थित असलेल्या जनसमुदायाने वरील दोन्ही सरकारी प्रकल्पांच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या.
या प्रकल्पाविरोधात चिंबल ग्रामस्थांनी पुकारलेल्या या लढ्याला काँग्रेस, आरजी, आप या राजकीय पक्षांसह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि पर्यावरणप्रेमींनी आपला जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. गेल्या 28 डिसेंबरपासून चिंबल येथे तोयार तळ्याच्या संवर्धनासाठी आणि प्रस्तावित मॉलच्या विरोधात ग्रामस्थांनी उपोषण सुरू केले आहे.

यावेळी बोलताना विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी, गोव्याची भूमी व चिमुकला गोवा याचे रक्षण करण्याचा जेव्हा प्रश्न निर्माण होतो तेव्हा गोमंतकीय स्वस्थ बसू शकत नाहीत. सत्ताधारी भाजप सरकार आणत असलेल्या प्रकल्पांमुळे राज्यातील नैसर्गिक सौंदर्य नष्ट होऊ लागलेले असून पर्यावरणाला धोका निर्माण होऊ लागल्याची भीती व्यक्त केली. न्यायालयाने स्थगिती आणलेली असतानाही सरकारने ‘युनिटी मॉल’ व ‘प्रशासन स्तंभ’ या प्रकल्पांचे काम चालू केले असल्याचे आलेमाव यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले. पाणथळ अशा स्थळावरील हे दोन्ही प्रकल्प रद्द करण्याची मागणीही आलेमाव यांनी यावेळी केली.
काँग्रेस आमदार ॲड्. कार्लुस फेरेरा यांनी यावेळी बोलताना हा प्रकल्प 160 कोटी रु. चा आहे. या प्रकल्पामुळे चिंबल गावात पाण्याची मोठी समस्या निर्माण होणार आहे. सरकार आमच्या जमिनी परप्रांतीयांच्या घशात घालू पाहत आहे, असा आरोप केला.

आरजीचे नेते अजय खोलकर यांनी सरकार जोपर्यंत दोन्ही प्रकल्प रद्द करीत नाही, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाहीत, असा इशारा दिला.
आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते अमित पालेकर यांनी गोवा सरकार आणू पाहत असलेल्या युनिटी मॉल व प्रशासन स्तंभ या प्रकल्पांमुळे चिंबल परिसराचे मोठे नुकसान होणार असल्याचे सांगितले.
या सभेला समाज कार्यकर्ते गोविंद शिरोडकर, रामा काणकोणकर, शंकर पोळजी, मारियाने फेर्रांव, पर्यावरणप्रेमी क्लॉड आल्वारीस, देविदास आमोणकर, सर्फराज शेख व अन्य नागरिक उपस्थित होते.