कॉंग्रेसची मृत्युघंटा

0
72

कॉंग्रेसचा पिढीजात वारसा असलेले एकेकाळचे राहुल गांधी यांचे निकटवर्ती युवा नेते जितिनप्रसाद यांनी काल पक्षत्याग करून भाजपात प्रवेश केला. उत्तर प्रदेशात पुढील वर्षी होणार असलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला ह्याचा जेवढा फायदा मिळेल त्यापेक्षा अधिक हे कॉंग्रेसचे नुकसान आहे, कारण गेल्या वर्षी पक्षाला रामराम ठोकलेल्या ज्योतिरादित्य शिंदेंनंतर हा दुसरा तरुण, तडफदार नेता पक्ष सोडून चालता झाला आहे. जितिनप्रसाद यांचे वडील जितेंद्र प्रसाद हे राजीव गांधींचे राजकीय सचिव होते. जवळजवळ वीस वर्षे त्यांनी राजीव यांना साथ दिली होती. परंतु राजीव यांच्या मृत्यूनंतर जेव्हा सोनिया गांधी पक्षाध्यक्षपदाच्या निवडणुकीला उभ्या राहिल्या, तेव्हा त्यांच्या विरोधात उमेदवारी दाखल करायला त्यांनी मागेपुढे पाहिले नव्हते. त्यानंतर वर्षभरातच त्यांचे निधन झाले. त्यांचाच राजकीय वारसा जितिनप्रसाद चालवीत आले होते. माधवराव शिंदे, राजेश पायलट आणि जितेंद्रप्रसाद राजीव यांना जवळचे होते. तीच परंपरा राखत ज्योतिरादित्य शिंदे, सचिन पायलट आणि जितिनप्रसाद ही दुसरी पिढी राहुल यांच्या सोबत वावरत होती. मनमोहन सरकारच्या काळात त्यांना महत्त्वाची मंत्रिपदेही मिळाली, परंतु राहुल यांची धरसोड वृत्ती, ठामपणाचा अभाव यामुळे देशभरामध्ये कॉंग्रेसची जी वाताहत होत गेली, त्यातून पक्ष पुन्हा उभारी घेण्याची शक्यताच धूसर होत चालली असल्याने गेल्या वर्षी ज्योतिरादित्य शिंदे पक्ष सोडून गेले आणि आता जितिनप्रसाद चालते झाले आहेत. राहता राहिले आहेत सचिन पायलट. त्यांनी राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदी अशोक गेहलोत यांची निवड पक्षाने करताच बंडखोरीचे पाऊल उचलले होते, परंतु त्यांना तेव्हा शांत केले गेले. मात्र, आता ज्योतिरादित्य आणि जितिनप्रसाद यांच्यानंतर अर्थातच सचिन पायलट यांच्याकडे देशाचे लक्ष लागले आहे.
जितिनप्रसाद हे खरे तर लोकसभेच्या दोन आणि विधानसभेची एक अशा तीन निवडणुका लागोपाठ हरले आहेत. परंतु तरीही भाजपाला ते हवेसे वाटले असतील तर नवल नाही, कारण त्यांचे भाजपात पदार्पण म्हणजे राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील कमजोरीवर नव्याने शिक्कामोर्तब होण्यासारखे आहे. शिवाय उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांच्यासारखा ब्राह्मण चेहरा भाजपाला हवाच होता, कारण तेथील ब्राह्मणांची लोकसंख्या बारा टक्के आहे आणि जातीने ठाकूर असलेल्या योगी आदित्यनाथ यांच्यावर त्या समाजाची नाराजी दिसून येत आहे. स्वतः जितिनप्रसाद यांनीही ब्राह्मण चेतना संवाद सारख्या उपक्रमांमधून आपल्या राजकीय पुनरुज्जीवनाचे प्रयत्न चालवले होतेच. त्यामुळे भाजपाने जितिनप्रसाद यांना जवळ करून कॉंग्रेसला – विशेषतः पुढील महिन्यात पुन्हा पक्षाची कमान स्वीकारण्याच्या तयारीत असलेल्या राहुल गांधींना झटका दिला आहे.
जितिनप्रसाद आणि कॉंग्रेस नेतृत्वामधील संबंध खरे तर गेली तीन चार वर्षे ताणलेलेच होते. कॉंग्रेसने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाशी युती केली तेव्हापासून जितिनप्रसाद यांची आपल्याला विश्वासात घेतले जात नसल्याची भावना बनलेली होती. पुढे समाजवादी पक्षातून कॉंग्रेसमध्ये आलेल्या नेत्यांना आपल्यापेक्षा अधिक महत्त्व दिले जात असल्याचेही त्यांना दिसू लागले. प्रियांका गांधींनी गेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशच्या पक्ष सरचिटणीसपदाची धुरा स्वीकारली तेव्हा स्थानिक पक्षसमित्या निवडतानाही आपली मते विचारात घेतली जात नसल्याचे जितिनप्रसाद यांना अनुभवायला मिळाले. ह्या सगळ्या नाराजीचा स्फोट २३ बंडखोर नेत्यांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधींना जे खरमरीत पत्र गेल्या वर्षी लिहिले त्यात झाला होता. जितिनप्रसाद यांनीही त्यावर सही केली होती. शेवटी सोनियांनी नमते घेत बंडखोरांशी तडजोड करण्याचा प्रयत्न केला. जितिनप्रसाद यांच्यावर नुकत्याच झालेल्या पश्‍चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची जबाबदारी कॉंग्रेसकडून सोपवण्यात आली होती, परंतु हा आपल्याला उत्तर प्रदेशच्या राजकारणापासून दूर करण्याचा डाव आहे असा त्याचा अर्थ जितिनप्रसाद यांनी काढला. शिवाय दिल्लीत बसून आपण घेतलेल्या निर्णयांना बंगालमधील कॉंग्रेस नेतृत्वाने वाटाण्याच्या अक्षता लावल्याचे पाहून ते अधिक अपमानित झाले होते. ह्या सार्‍या वर्षानुवर्षे साचलेल्या नाराजीतून ते उगवत्या सूर्याला दंडवत घालत भारतीय जनता पक्षात डेरेदाखल झालेले आहेत.
कॉंग्रेसचे एकाहून एक दिग्गज नेते बुडत्या जहाजातून गळत चालले आहेत, परंतु त्याला भाजपापेक्षा खरे तर स्वतः कॉंग्रेस नेतृत्वच अधिक जबाबदार आहे. कॉंग्रेसमुक्त भारताची मोहीम भाजपापेक्षा कॉंग्रेस नेतृत्वाने स्वतःच हाती घेतली आहे की काय वाटावे अशा तर्‍हेने सध्या पक्षाचा कारभार चाललेला आहे. त्यामुळे ही पडझड अटळ आहे. जुन्या खोडांचे सोडा, परंतु दमदार तरुण चेहरेही पक्षापासून दूर चालले आहेत ही कॉंग्रेससाठी मृत्युघंटाच म्हणायला हवी!