उत्तम वकील होण्यासाठी…

0
392

– ओंकार व्यंकटेश कुलकर्णी, खडपाबांध, फोंडा

‘जीआरके टॉक्स’ या कारे कायदा महाविद्यालयाने आयोजित केलेल्या व्याख्यानमालेचे चौथे पुष्प गुंफण्यासाठी गोवा राज्य सरकारचे ऍडव्होकेट जनरल श्री. आत्माराम नाडकर्णी आले होते. प्रसंगी कारे महाविद्यालयात ‘ई-सेल’ व ‘आय-सेल’चे उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांना खर्‍या जगातील कायद्यांचे प्रशिक्षण देण्यासाठी यांचे प्रयोजन करण्यात आले. ‘सेंटर फॉर इन्क्युबेशन अँड बिझिनेस एक्सलरेशन’ या संस्थेमार्फत ‘ई-सेल’ हाताळले जाईल. या सेल अंतर्गत विद्यार्थ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले जाईल व पुढे व्यवसाय किंवा कायदा क्षेत्रातील नोकरी पत्करताना त्यांना मदत केली जाईल.विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष श्री. गणेश दैवज्ञ व उपाध्यक्ष श्री. नितीन कुंकळकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
वकिली व्यवसाय करत असताना अनुभवलेल्या अनेक किश्शांचे दाखले देत श्री. आत्माराम नाडकर्णी यांनी आपले व्याख्यान रंगविले. पुस्तकी ज्ञान व न्यायालयातील अनुभव यात बराच फरक असतो. कोणत्याही चांगल्या वकिलाच्या हाताखाली काम करूनच हे शिकता येते, निव्वळ पुस्तकी ज्ञानाच्या जोरावर न्यायालयीन लढाई जिंकता येत नसल्याचेही नाडकर्णी म्हणाले.
प्रत्येक न्यायाधीश वेगळा असतो. त्याची विचारसरणी वेगळी असते. त्यामुळे एकाच मुद्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो, असेही ते म्हणाले. उत्तम वकील होण्यासाठी न्यायाधीशांनी, ज्येष्ठ वकिलांनी व कायदे पंडितांनी लिहिलेले आत्मचरित्र वाचणे गरजेचे असते, असे श्री. नाडकर्णी यांचे मत आहे.
या व्याख्यानमालेतील पुढील व्याख्यान २३ जानेवारी रोजी महाविद्यालयाच्या सभागृहात घेण्यात येणार आहे.