चायनीज विज्डम्

0
139

– कु. श्रेयस गावडे
‘चायना’ हा शब्द कानावर पडल्यावर पहिलाविचार आपल्या डोक्यात येतो तो म्हणजे‘मेड इन चायना’चा टॅग किंवा डिलिशियस ‘चायनीज फास्ट फूड’! हो ना? आज एका अर्थानं जगावर राज्य करणार्‍या या दोन चायनीज संपत्ती आहेत. आणि सामाजिक जीवनात हे अगदी खरंय… दुसर्‍यासाठी भेटवस्तू खरेदी करताना आपल्याला ‘मेड इन चायना’ हा टॅग चालतो! गमतीचा भाग सोडा, पण वैयक्तिक जीवनात स्वतःला भेटवस्तू जर द्यायची असेल तर काळाच्या कसोटीवर खरं उतरलेलं; ‘मेड इन चायना’ असलेलं अन् वर्तमानकाळात विचारवंतांचं लक्ष अधिकाधिक आकर्षित करू लागलेलं नवनीत म्हणजेच- ‘चायनीज विज्डम्’! जशी आपली संस्कृत सुभाषितं, इंग्रजी सुवचनं(कोटेशन्स) तशाच चिनी म्हणी व मार्गदर्शक सुविचार! अशाच काही चिनी सुविचारांचा आपण विचार करुया.* सुविचार ः ‘‘एका माणसाला जर एक मासा दिला गेला, तर त्या दिवसापुरता तो तृप्त होईल… पण त्याला मासे पकडण्याची कला (आर्ट ऑफ फिशिंग) जर शिकवली तर तो जीवनभर स्वतःचं पोट भरू शकेल!’’
वरील सुविचारावरून एक रूपक कथा आठवली.
– दोन शिक्षक असतात जे दोन वर्गांना शिकवितात. एक शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना रोज एक मासा देत असे जो घरी नेऊन मुले शिजवून खात असत. तर दुसरा शिक्षक आपल्या मुलांना नदीकाठी नेऊन मासे पकडण्याची कला शिकवून, प्रत्येक विद्यार्थी स्वतः मासा पकडून, घरी नेऊन खात असे. एके दिवशी दोन्ही शिक्षकांची बदली दुसर्‍या गावात होते. तेव्हा, रोज एक मासा देणार्‍या विद्यार्थ्यांची पंचाईत होते तर मासे पकडण्याची कला माहीत असलेले विद्यार्थी, जरी त्यांचे शिक्षक नसले तरीही आनंदात जगतात.
अगदी साधी अन् सोपी जरी ही रूपक कथा वाटली, तरी आपल्याला जीवनाचा महत्त्वाचा धडा शिकवून जाते. ही गोष्ट सध्याची वस्तुस्थिती बनत चाललीय. शाळेत किंवा कॉलेजमध्ये प्रश्‍नांची उत्तरं डिक्टेट केली जातात, रेडिमेड नोटस् दिले जातात. घरीही मुलांना मदत करण्याच्या नावाखाली मुलांचा गृहपाठ करून ‘घेण्याच्या’ ऐवजी पालक गृहपाठ करून ‘देतात’! कारण पालकांच्या दृष्टीनं कटकट नको, शॉर्टकट चालेल. घरात मुलांजवळ बसून, चर्चा करून, वाद संवाद करणे याला आज वावच उरलेला नाही. घरी मुलांना, शाळेत विद्यार्थ्यांना, समाजात अनुयायांना तयार गोष्टी देणं हे कितीही सोपं असलं तरी अगदीच अयोग्य आहे! त्यामुळे मुलांच्यातील प्रयत्न-प्रयोग-प्रयास करण्याची वृत्ती लोप पावतेय. याप्रसंगी श्रीसमर्थ रामदासांची ओवी आठवते-
‘‘प्रसंग हा तुफान रे| प्रयोग प्रयत्न मान रे|
अखंड सावधान रे| अखंड सावधान रे|’’
कित्ती खरंय हे! काळाची ही खूप मोठी गरज आहे, की मुलांना ‘आर्ट ऑफ फिशिंग’ शिकवणे जी खरी इन्व्हेस्टमेंट ठरेल मुलांच्या संपूर्ण जीवनासाठी!
म्हणून दुसरी पद्धत आपण वापरू या. यातून आपल्यातील निर्मितिक्षमता वाढेल, जे कल्पना, शिक्षण व संशोधनासाठी अत्यावश्यक आहे.
शिक्षण क्षेत्रात प्रत्येक मुलाला रोज एक मासा दिला गेल्यामुळे, दोन अधिक दोन म्हणजे चार हेच गणित डोक्यात बसलंय. पण याचीही अनेक उत्तरं असू शकतात. उदा. दोन अधिक दोन म्हणजेच पाच उणे एक किंवा चाळीस भागिले दहा.. इ. इ.
प्रश्‍नांची उत्तरं किंवा नोटस् तयार मिळाल्यामुळे सर्वांत मोठा बळी जर कुणाचा गेला असेल तर तो म्हणजे वाचनाचा! ‘वाचाल तर वाचाल’ ही एकेकाळची मनाची वृत्ती होती ती आज ‘मरेन पण वाचणार नाही’ अशी झाली आहे. त्यामुळे सगळीकडे पाहायला मिळणारे दृश्य म्हणजे परीक्षेच्या आदल्या दिवशी प्रश्‍नोत्तरे घोका आणि दुसर्‍या दिवशी उत्तरपत्रिकेत ओका! ही अनेक विचारवंतांनी व्यक्त केलेली शोकांतिका आहे.
म्हणून आपण सर्वजण ‘आर्ट ऑफ फिशिंग’कडे वळू या. मासे पकडण्याची कला हे फक्त एक प्रतीक आहे. जीवनात सर्वच बाबतीत हे शब्दशः घेण्याची गरज नाही. तंत्र व मंत्र आत्मसात करायला आजच्या तरुण पिढीला शिकवलं पाहिजे. नुसतंच यंत्रवत् जीवन नको रे बाबा! त्यामुळे आपल्याला पाहिजे तेव्हा, पाहिजे तसं अन् शक्यतर पाहिजे तितकं समाधान मिळू शकेल. व्यक्तिमत्त्वाचा सर्व बाजूंनी विकास होईल. व्यक्तिमत्त्वाचा विकास म्हणजे केवळ देहबोलीचा विकास नसून चांगली व्यक्ती व देशाचा नागरिक बनण्यासाठी केलेला स्वतःचा विकास आहे आणि हेच आवश्यक आहे.
जीवनाचा रसिक अनुभव, उत्स्फूर्त जीवनशैली, सर्व कलांचा मुक्त आविष्कार यासाठी मासे पकडण्याची कलाच शिकायला हवी. यातच खरा आनंद आहे.
‘‘ऊे ुहरीं र्ूेी श्रळज्ञश | ींहशप र्ूेी ुळश्रश्र श्रळज्ञश ुहरीं र्ूेी रीश वेळपस’’. याचा अनुभव यायला मग वेळ लागणार नाही. प्रत्येक कृती खुलत आणि फुलत जाईल; त्यात सहजता येईल! यातच खरा जिवंतपणा – खरं जीवन – आणि खरं चैतन्य दडलंय. मग करुया ना सुरुवात आत्ताचपासून…!